श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ विविधा ☆ लोकसाहित्य – राजस बाळराजा – भाग – 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆ 

‘जात्याला ईश्वर मानून आपले मन त्याच्याशी मोकळे करताना स्त्रियांनी आपल्या भाव-भावनांच्या शेकडो गोण्या उकललेल्या आहेत’, असं सरोजिनी बाबर म्हणतात. या गोण्यांपैकी एक महत्वाची गोणी म्हणजे ‘बाळराजा’वर गायलेल्या ओव्यांची. मुलाला जन्म देण्यात स्त्री जीवनाची सार्थकता आहे, असं मानणारी बाई मूल व्हायला थोडा वेळ लागतो आहे, हे बघताच लगेचच  नवस-सायासावर उतरते.

देवाच्या देवळात नंदीला कोरा शेला। सावळ्या सखीनं पुत्रासाठी नवस केला।। (इथे कधी कधी ओवी गाणारी आपलं नावही घालते. जसं की मागते तान्हे बाळ उषाताई किंवा मंदाताई  वगैरे… वगैरे…

नवसानं किंवा निसर्गानं सखीला दिवस जातात. मग सुरू होतो डोहाळगीतांचा कल्लोळ. बाळ झालं की त्याचं किती कटुक करू आणि किती नको, असं आईला होऊन जातं. ती म्हणते, ‘पालख पाळणा। मोत्याने गुंफला। त्यात ग निजला नंदूबाळ।।’ इथेही जी ती आई आपल्या मुलाचे नाव घेते. बाळराजा असंही कुठे कुठे म्हंटलेलं दिसतं. पालख पाळणा म्हणजे पालखीसारखा पाळणा. सतत हलता. पालखी नाही का सतत पढे पुढे जाते, तसा पाळणा हलत असतो. ‘पालख पाळणा’ऐवजी कुठे कुठे सोन्याचा पाळणा’ असंही म्हटलेलं दिसतं.

तुकारामांनी म्हंटलय ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने… शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू.’ इथे स्त्री गीतांतून शब्दरत्नांचं वैभव अनेक ठिकाणी लखलखताना दिसतं. काही काही ओव्यातून शब्द शस्त्रेही झालेली दिसतात.

झोप आली की बाळाला दूध हवं. मग आई गाईला सांगते, ‘ये ग तू ग गाई। चरून भरून। बाळाला दूध देई। वाटी भरून।।’ बाळाला दूध पाजलं. वाटी रिकामी झाली. इतक्यात तिथे मांजर आलं. मांजराने वाटी चाटली. पण वाटी रिकामी. तशी ते रागावलं. पण बाळावर मांजरसुद्धा रागावलेलं आईला खपत नाही. मग ती म्हणते,  ‘रिकामी वाटी। मंजर चाटी।। मंजर गेलं रागानं। तिथेच खाल्लं वाघानं।।’

बाळाचं इतकं कौतुक, इतकं कौतुक आईला वाटतं की त्याच्या हगण्या ओकण्याचंही कौतुक करणार्‍या ओव्या ती गाते. बाळाची ओकी काशी? तर दह्याची कवडी जशी. बाळाची शी कशी? तर हळदीचा पिंडा जशी, असं ती म्हणते.

बाळ मोठं होऊ लागतं. ‘दुरडी दळण।  लागयतं कोण्या राजाला ग। दुरडी दळण दळणारी अभिमानाने म्हणते, ‘बाळयाच्या घरी  माझ्या। गोकुळ नांदतं ग।।’ दळणारीच प्रश्न करते आणि दळणारीच उत्तरही देते. पूर्वी एकत्र कुटुंब असायचं. घर मुला-मोठ्यांनी गजबजलेलं शिवाय समृद्धही म्हणून ती म्हणते, माझ्या बाळाच्या घरी गोकुळ नांदतं. गोकुळ या शब्दातून घराचा ऐसपैसपणा, समृद्धी, आनंद सगळच सूचित होतं. पण हा शब्द काही तिने विचारपूर्वक, ठरवून वापरलेला नाही. तो उत्स्फूर्तपणे दळता दळता, गाता गाता आलाय. उत्स्फूर्तता हे लोकसाहित्याचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. बहिणाबाई म्हणतात, ‘दळण मी दळितसे, जात्यातून पडे पिठी। तसं तसं माझं गाणं, पोटातून येतं ओठी।। जात्यातून पीठ पडावं इतक्या सहजपणे, ‘दळिता, कांडिता, अंगण झाडता, सडा-संमार्जन करता’ स्त्रियांनी ओव्या गायल्या आहेत.

उगवता सूर्यही बाईला तान्ह्या बाळासारखा वाटतो. ती म्हणते, ‘ उगवला नारायण। उगवता तान्हं बाळ। शिरी सोन्याचं जावळ।।’ आता तो आणखी थोडा वर येतो. तिच्या उंबरठ्याशी येतो. मग ती म्हणते,’ सूर्य तो नारायण। अग चढूनी आला वरी। राजस बाळासंग। कर दूधभाताची न्याहारी।।’ यात माया आहेच. पण सकाळी उठून ‘दुरडी दळण दळून, सडा संमार्जन करून आपली न्याहारीही तयार करून झाली आहे.’ हेही ती मोठ्या खुबीनं सांगते.

सूर्य उगवताना उगवती लाल झाली आहे. त्याची लालस छटा अंगणावरही पडली आहे. ती म्हणते, ‘उगवला नारायण। उगवती झाली लाल।

राजस बाळ माझं। खेळे अंगणी मखमल।।’  बाळ राजस आहे आणि अंगण मखमलीसारखं.  बाळाच्या आईनं ते इतक्या निगुतीनं सारवलय की बाळाच्या पायाला त्याचा स्पर्श मखमलीसारखा वाटावा. इथे मऊ अंगणासाठी आणि त्यावर पसरलेल्या लालस छ्टेसाठी मखमल हा शब्द किती सहजपणे आलाय.

बाळ मोठं होतं. दुडुदुडू धावू लागतं. चुरुचुरू बोलू लागतं  आई अप्रूपानं  म्हणते, ‘झोपाळ्याची कडी। कशी वाजते कुरूकुरू। बोलतो चुरूचुरू। नंदूबाळ।।’ इथे प्रत्येक आई आपल्या मुलाचं नाव घेते. लोकसाहित्य परिवर्तनशील होतं ते असं. इथे झोपाळा सतत हलतो आहे. बाळ सतत बोलतो आहे. हे सातत्य.  तसच साम्य आहे, कडीचा कुरुकुरू आवाज आणि बाळाच्या चुरूचुरू बोलण्याचा आवाज. म्हणजे ध्वनीसाम्यही  इथे आहे. प्रथम जिने ही ओवी म्हंटली, ती तिची वैयक्तिक रचना होती. नंतर बर्‍याच आपल्या बाळाबद्दल, त्याचं नाव घेऊन ही ओवी म्हणू लागल्या आणि वैयक्तिक रचना सामाजिक झाली. लोकसाहित्याचं हेच वैशिष्ट्य.

क्रमश:  पुढील लेखात राजस बाळराजा – भाग 2

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments