श्रीमती उज्ज्वला केळकर
☆ विविधा ☆ लोकसाहित्य – राजस बाळराजा – भाग – 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆
बाळ आणखी मोठं होतं. दूरवर शहरात जाऊ लागतं, तरी आईच्या दृष्टीने तो तान्हं बाळच. ‘काई गावाला ग गेलेल्याची।. वाट ग बघितो दारातून। काई ग माझा ह्यो तान्हा बाळ। हिरा ग झळकतो शहरातून।।’ आशा या बाळाचं कौतुक करताना, त्याच्या सामर्थ्याबद्दल सांगताना ती म्हणते, ‘ल्क्ष्मीबाईनं लई फैलाव मांडिला। बाळांनी माझ्या पैसा राउळी बांधिला।।’ ज्या ल्क्ष्मीचा डंका पिटला जातोय, तिचं देऊळ माझ्या बाळानं पैसे घालून बांधलय. इथे कुठे कुठे बाळाच्याऐवजी बंधुजीदेखील म्हंटलेलं दिसतं. (म्हणणारी आपल्या भावनेनुसार मूळ ओवीत असा बादल करत जाते. लाकसाहित्य परिवर्तनशील असतं, ते असं.) आशा आपल्या कौतुकाच्या, अपूर्वाईच्या बाळासाठी ती सूर्य नारायणाकडे औक्ष मागते.
‘सकाळी उठूनी हात मी जोडिते सूर्याला। बाळाला माझ्या औक (औक्ष) मागते हिर्याला।।’ कुठे कुठे बाळाऐवजी बंधूला, सख्याला किंवा चुड्याला म्हणजेच भ्रताराला असा पाठभेद आहे. कुठे कुठे भावाला औक्ष आणि चुड्याला चंद्रबळ (सामर्थ्य) असंही म्हंटलय.
मुलाप्रमाणेच मुलीचही कौतुक आईनं केलय. मुलीच्या पोटात माया असते, असं ती म्हणते. मुलगा म्हणजे दारचा मोगरा आणि मुलगी म्हणजे दारची जाई, असं ती सांगते. कुणी विचारतं, बाई तुला मुलं किती? ती उत्तरते, ‘एक गं पुतळी दोन मोती।।’ मुलगी झाली म्हणून कुणी हिणवलंच तर ती म्हणते, ‘लेकापरिस लेक कशास व्हावी उणी। एका खाणीतली रत्न दोन्ही।। बाळी खेळून आली. तिचं कौतुकानं वर्णन करत ती म्हणते, ‘काई वाळं नि गं साखळयांनं। माझी पायरी दणाणली। काई गं बंटुली माझी बाळ। बाळ खेळून गं आली।।’ आपली मुलगी म्हणजे नक्षत्रच. चांदणीसारखी सुंदर असेही उल्लेख अनेक ओव्यातून आलेले आहेत.
कधी कुणी मुलगी झाली, म्हणून हिरमुसली, तर तिची समजूत घालताना दुसरी एखादी म्हणते,
‘काई लेकीच्या ग आई। नको म्हणूस ग हलईकी। काई ग लेकाच्या आईला। कुणी केलीया ग पालखी।।’ तिला सुचवायचं आहे, मुलाच्या आईची स्थिती काय मुलीच्या आईपेक्षा वेगळी थोडीच आहे?
आईचे मुलावर किती प्रेम, किती माया, त्याच्यासाठी जीवदेखील द्यायची तिची तयारी. याबद्दलची मुलाला काळीज कापून देणार्या आईबद्दलची लोककथा सर्वांना माहीत आहे. असंच एक व्यावहारिक मन हेलावून टाकणारं सत्य एका ओवीतून व्यक्त झालय. केळीचा घड काढताना आधी केळ तोडली जाते , ही वस्तुस्थिती. ती ओवीत आशा शब्दात प्रकट होते,
‘काई जल्मानि ग मंदी… केळी गं बाईचा जन्म न्यारा… काई पोटीच्या बाळापाई… आधी ग देती आपला गळा…’
वरील ओव्यातून आलेले ‘काई’, ‘गं’ किंवा अन्य काही ओव्यातून आलेले ‘बाळयाचा’ किंवा ‘बापयाचा’ मधील ‘या’ किंवा ‘अग’ यासारख्या शब्दांना विशिष्ट अर्थ नसतो. हे शब्द सूर धरण्यासाठी, लयीसाठी त्यात येतात.
बाळाबद्दल आई अगदी भरभरून बोलते. विशेष म्हणजे त्यात कुठेही तक्रारीचा सूर नाही की नकारात्मक भाव नाही. इतर नात्याच्या वर्णनात कधी कधी नापसंतीचा सूर दिसतो. पण इथे मात्र बाळ कसंही असलं, किरकिरं, अशक्त, रोगट, रडवं असलं, व्रात्य, खोडकर असलं, तरी त्याचं कौतुकच केलेलं दिसतं. बाळाचं कौतुक करणार्या ओव्या पूर्वी बायका चढाओढीनं म्हणायच्या, हल्ली अंताक्षरी गायली जाते, तशा.
क्रमश: पुढील लेखात हवशा भ्रातार
© श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈