सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? विविधा ?

व्यास पौर्णिमा… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

(नुकत्याच  झालेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त)

महर्षी व्यासांचा जन्म आषाढ शुद्ध पौर्णिमेला झाला म्हणून या दिवसाला व्यास पौर्णिमा किंवा गुरु पौर्णिमा असे म्हणतात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले आहे

      नाना कथा रुपे भारती

      प्रकटली असे त्रिजगती

      आविष्करौनी महामती

      व्यासाचिये

म्हणूनच आपण सगळे रोज त्यांना प्रातःवंदना देताना म्हणतो

      अश्वत्थामा बलिर्व्यासो

      हनुमानश्च बिभीषण:

      कृप: परशुरामश्च

      सप्तैते चिरंजीविन:

      सप्तैतान् स्मरेनित्यम्

      सर्वव्याधिविवर्जितम्

या सात चिरंजीवांचे स्मरण जो करेल तो निरोगी असेल. आचार्य किशोरजी व्यास म्हणतात “महर्षी व्यास हे जगातील साहित्यिकांचे मेरुमणी आहेत”. त्यांनी भरपूर ग्रंथसंपदा निर्माण केली. त्यांचे मूळ नाव द्वैपायन .वेदांचा विस्तार केला म्हणून त्यांना वेद व्यास असे म्हणतात. पूर्वी एकच वेद होता. पण तो मोठा असल्यामुळे लोक वाचू शकत नव्हते. त्यातील ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावे या तळमळीने व्यासांनी त्याचे चार भाग केले. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, आणि सामवेद. एके दिवशी नैमिषारण्यात निमंत्रितांसाठी धर्मसभा भरली. धौम्य ऋषी म्हणाले, वेदांचा अमूल्य ज्ञाननिधी आता सुरक्षित झाला. द्वैपायनाच्या या कार्याचा आम्ही कृतज्ञतापूर्वक गौरव करतो. आणि आजपासून त्याला या युगाचा व्यास निर्धारित करतो. त्याचप्रमाणे ज्या पीठावरून त्याने सर्वांच्या शंकांचं समाधान केलं ते पीठ यापुढे “व्यासपीठ” म्हणून संबोधित करण्यात येईल. यापुढे महत्त्वाच्या सभांमध्ये देखील ज्ञानी वक्त्यांसाठी किंवा पारंपारिक विषयांच्या सभांमध्ये निर्माण केलेल्या पीठालाही व्यासपीठ हीच अधिकृत संज्ञा असेल. सामान्य विषयांच्या चर्चेसाठी उपयोगात आणले जाणारे पीठ मंच असतील. (उदाहरणार्थ, राजकीय मंच, काव्य मंच वगैरे ).आणि अभिनयासाठी असलेले ते रंगमंच. अशा भिन्नपीठांसाठी विविध संज्ञांचा प्रयोग करावा. ब्रम्हर्षी वशिष्ठ हे व्यासांचे पणजोबा. त्यांनी आपल्या पणतवाला हृदयाशी कवटाळले. आनंदाश्रूंचा अभिषेक केला.  त्यांच्या खांद्यावर व्यासपदाचा सन्मान असलेलं वस्त्र पांघरले.  द्वैपायन आता व्यास झाले. हा अनुपम सोहळा अनुभवताना सारे सभागृह आनंदाश्रूंनी न्हाऊन निघाले. ते मूळ व्यासपीठ म्हणजेच व्यास गद्दी नैमिषारण्यात अजूनही सुस्थितीत आहे.

पण वेदातील तत्त्वज्ञान सुद्धा लोकांना समजेना. अशा लोकांसाठी त्यांनी पुराणे लिहिली. सर्वांना कथा आवडतात .पुराणांमध्ये विश्वातल्या प्रत्येक विषयावर त्यांनी लिहिलं. त्यांनी अठरा पुराणे रचली. उपनिषदे लिहिली.

     परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम्

     अष्टादश पुराणानि व्यासस्य वचन द्वयं

त्यानंतर त्यांनी महाभारत रचले. त्यावेळी त्यांनी 18 पर्व आणि 18 अध्याय यांचा प्रयोग केला होता. महाभारताचे युद्ध 18 दिवस चालले. या युद्धाच्या वेळी 18 औक्षहिणी सैन्य होते .दोन्ही बाजूंनी फक्त अठरा महारथी होते. जेव्हा महाभारत युद्ध संपले त्यावेळी सर्व लोक मारले गेले .फक्त 18 लोक शिल्लक होते. गीतेचे अध्याय देखील अठराच आहेत. महाभारताला पाचवा वेद असेही म्हणतात.

आपला अंध पुत्र धृतराष्ट्र याला महाभारत युद्ध पाहता यावे म्हणून संजयला दिव्यदृष्टी देऊन महर्षी व्यासांनी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद ऐकवला. तीच भगवद्गीता. विश्व साहित्यात तिचे निर्विवाद उच्च स्थान आहे. गीतेचा पाठ करण्यापूर्वी खालील श्लोक म्हणतात

     ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता

      नारायणेन स्वयम्,|

      व्यासेन प्रथितां पुराणमुनिना

      मध्ये महाभारतम् ||

      अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम्

      अष्टादशाध्यायिनीम्ब|

      त्वामनुसंदधामी भगवद्गीते

      भगवद्वेषिणीम्||

याचा अर्थ:- भगवान नारायणांनी स्वतः पार्थाला म्हणजे अर्जुनाला सांगितली होती आणि जी महाभारतात प्राचीन ऋषी व्यासांनी रचली होती, हे देवी माते, पुनर्जन्माचा नाश करणारी ,अद्वैताच्या अमृताचा वर्षाव करणारी आणि अठरा प्रवचनांनी युक्त अशा या गीतामाते,मी तुझ्यावर ध्यान करतो. आणि त्यानंतर महर्षी व्यासांना नमस्कार करण्यासाठी खालील श्लोक म्हणायचा असतो.

      नमोस्तुते व्यास विशालबुद्धे

      फुल्लारवींदयातपत्रनेत्र

      येन त्वया भारतातैलपूर्ण:

       प्रज्वलितो जनमय: प्रदीप:

याचा अर्थ :- हे व्यास, व्यापक बुद्धीच्या आणि फुललेल्या कमळाच्या पाकळ्यांसारख्या डोळ्यांनी ज्यांच्या हातून महाभारताच्या तेलाने भरलेला ज्ञानाचा दिवा प्रज्वलित झाला आहे अशा तुला नमस्कार असो.

“व्यासो$च्छिस्टं जगत्सर्वम्” असे म्हणतात.  व्यासांना सर्व विषयांचे ज्ञान होते. संपूर्ण जगात एकही गोष्ट अशी नाही की जिला व्यासांनी स्पर्श केलेला नाही. ते अलौकिक मानसशास्त्रज्ञ होते.

अखेर ते थकले. त्यांना मुक्त व्हावे असे वाटू लागले. ते गंगेच्या तिरावर आले. त्यांचे गुरु देवर्षी नारद मुनी त्यांना भेटायला आले. ते म्हणाले ,”मी भगवंताचा निरोप सांगण्यासाठी आलो आहे. तुमची स्थिती भगवंतांनी ओळखली. आता त्यांचा निरोप आहे. जोपर्यंत भगवंत आज्ञा देत नाहीत तोपर्यंत आपण पृथ्वीवरच राहावं.” महर्षी व्यास मनापासून हसले. ते म्हणाले, भगवंतांची आज्ञा शिरसावंद्य. मी इथेच राहीन. माझं एकच ध्येय आहे, लोककल्याण आणि भगवंतांचं सतत नामस्मरण.

        अचतुर्वदनो ब्रह्मा,द्विबाहूरपरो हरि:,

       अभाललोचन: शंभुर्भगवान् बादरायण:

त्यांना चार मुखे नाहीत पण ते ब्रह्मा आहेत. दोन बाहू असले तरी हरी आहेत. कपाळावर तिसरा डोळा नाही पण शंकर आहेत. असे हे बादरायण आहेत. अशा या वंदनीय महर्षी व्यासमुनी यांना कोटी कोटी नमन.

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments