सुश्री सुलभा तेरणीकर
विविधा
☆ वेळ झाली भर माध्यान्ही… ☆ सुश्री सुलभा तेरणीकर ☆
माघातल्या एका प्रसन्न सकाळी जाग येई ती उतू गेलेल्या दुधाच्या खरपूस वासाने. उठून पाहिले, तर गच्चीवर सुरेख रांगोळीच्या चौकटीत शेणाची गोवरी तापून लाल झालेली असे आणि त्यावर बोळक्यातले दूध फेसाळत बाहेर पडताना दिसे. आईची अशी व्रतवैकल्ये, कुलाचार, सण वर्षभर चालत असत. त्यासाठी मात्र घरातल्यांचे दिनक्रम मोडत नसत, की बुडत नसत. बरेवाईट प्रसंग येऊन गेले; पै-पाहुणे, आजारपण येत गेले तरी घरातला दिनक्रमाचा रोजचा परिपाठ सुरळीत राहिला, तशी तिची नेमनियमांची मालिकाही राहिली. शाळा, कॉलेज, ऑफीस, अभ्यास हुकवून चालायचा नाही, हा दंडक पाळतच ती सुरु राहिली.
आजदेखील कसोशीने ती सर्व पाळत असते, कोणतेही अवडंबर न माजवता, अगदी सहजपणे.
श्री विष्णूंसाठी नैवेद्य म्हणून अधिक महिन्यातले तेहतीस दिवस रोज ताजा अनरसा होई खरा; पण त्या वेळी हजर असणाऱ्याच्या वाट्याला अचूक जाई. कृष्णजन्माच्या वेळी मध्यरात्री उठून ती हरी विजयातला कृष्णजन्माचा अध्याय वाचत असे. आम्हाला सकाळी सुंठवडा व पेढ्यांचा प्रसाद मिळत असे. रात्रीच्या नि गूढ शांततेत सारी झोपलेली असता, स्वतः मात्र हळूच आवाज न करता ती कृष्णजन्माची साक्षी होत असे. आता मात्र आम्ही त्यात सहभागी होतो. पण, पूर्वी क्वचित चेष्टाही करीत असू, जोरदार चर्चादेखील; पण छानसे हसून ती आमची धार बोथट करीत असे.
पुढे व्रतवैकल्यांसंबंधीची बरीच माहिती मी जमवली. जाणकारांकडून, पुस्तकांतून घेतली. व्रतरत्नाकर, हेमाद्रि व्रतखंड, व्रतोत्सव, पृथ्वी चंद्रोदय, उत्सवसिंधू इत्यादी ग्रंथसंभारातून दिलेल्या माहितीचे भांडार जमा झाले. आपल्या अभ्युदयासाठी, सुखसमृध्दीसाठी; वंशविस्तार, दीर्घायुष्य, धन, मान्यता, कीर्ती, आरोग्य यांसाठी आपल्या पूर्वजांनी व्रत नियमांमध्ये जीवनाला असे काही बांधून घेतले आहे;जसा वाहत्या नदीतीरावरचा रेखीव घाट असावा. व्रत निवडायचे स्वातंत्र्य. हेतू काम्य अथवा निष्काम. प्रसन्न करायच्या देवदेवता वेगवेगळ्या, व्रताचा दिवसही खास. त्यांची सामग्रीही आगळीवेगळी.
व्रतांची नामाभिधाने अगदी वैशिष्ट्यपूर्ण… पक्षसंधिव्रत, फलत्याग व्रत, नदी व्रत, लक्षपद्म व्रत, वरुणव्रत, भानुव्रत, बिल्वत्रिरात्री व्रत, नक्षत्रव्रत, व्योमव्रत, सप्तसागरव्रत, समुद्रव्रत, मुखव्रत , प्रतिमाव्रत पाताळव्रत अशी कितीतरी व्रतांची नावे- ज्यात निसर्गाला सहभागी करून घेतलेले आहे.
व्रताची तिथीही निश्चित केलेली आणि त्यांनाही सुंदर चेहरा, ओळख आणि नावे बहाल केलेली दिसतात. मनोरथ पौर्णिमा, पुष्प द्वादशी, नील ज्येष्ठा, फळ तृतीया, रोहिणी अष्टमी, भद्रा सप्तमी, श्री पंचमी, नाम नवमी, मंदार षष्ठी, यम चतुर्थी… प्रत्येक महिन्यातील, ऋतूंमधला एकेक दिवस स्वतंत्र अस्तित्वाचा! प्रत्येकाचे विधान आगळेवेगळे सांगितलेले.
उपवास, पूजा-अर्चना, दान ही प्रमुख अंगे तर आहेत; शिवाय निसर्गदेवतेला प्रसन्न करण्याच्या तऱ्हादेखील निरनिराळ्या असत. ऐश्वर्य हवे, तर त्याग आला. काही हवे, तर काही द्यावे; ही भावना सूचित केलेली असे. फुलांनी, धान्यांनी, मधतूपाने, धूपदीपांनी पूजा करायची. घरादारासाठी समृद्धीची कामना करणाऱ्यांनी एकभुक्त राहायचे. भोजनादी दानधर्म, बांधवांना सहभागी करून घ्यायचे, अशा बहुविध संकल्पना गुंफून आपल्या पूर्वजांनी योजलेल्या व्रतांची अखंड साखळी सर्व वर्षभर अखंडपणे माझ्यासमोर निनादत राहिली. प्रदीर्घ आयुष्य, बहरलेला वंशवृक्ष, समृद्धी, कुटुंब आणि समाजहित, निसर्गाशी जवळीक असे विविध रंग साधलेले पाहताना मन विस्मयाने भरले. … नक्षत्रे, आकाश, पाणी, सूर्य, चंद्र, पशू, पक्षी, धनधान्य, यांच्याशी खेळ करीत पूर्वजांनी व्रतोत्सवाची लयलूट केलेली आहे.
आश्विनातल्या गडद अंधाऱ्या रात्री गोठ्यात, पाणवठ्यावर, गच्चीवर, निर्मनुष्य रस्त्यावर, ओसाड जागेत दिवा लावावा, असे सांगणाऱ्या पूर्वजांच्या दीपोत्सवाच्या कल्पनेमागची उदात्तता मनाला स्पर्शून जाते.
व्रतवैकल्यांची कालबाह्यता ठरवणे, त्यांचा नवा अन्वय लावणे, हा विचार तर व्हायला हवा, असे वाटत असताना काळाच्या मागे जाऊन मानवी मनाच्या खुणा शोधाव्यात, असे वाटते, नव्या -जुन्या विचारांच्या हिंदोळ्यावर एके ठिकाणी मन थांबते. पुन्हा एकदा आपल्या पूर्वजांनी दिलेल्या अर्थपूर्ण नावाचे कौतुक वाटून धक्कायला होते. ‘अक्षय्य तृतीया’ वैशाखातल्या तृतीयेचा दिवस एक अपूर्व नाव घेऊन येतो. ‘अक्षय्य तृतीया. ‘ — वैशाखातील उग्र निसर्गवणव्यात सारे चराचर जळतेय्. अंगाची काहिली होतीय्. पाणीदेखील डोळ्यांदेखत वाफ होऊन उडून चालले आहे. अशामध्ये ‘अक्षय्य’ टिकणारे आहे तरी काय? क्षणभंगुर, अशाश्वत जीवनाला झोडपणाऱ्या निसर्गाच्या अग्निप्रलयात अक्षय्य राहणार तरी काय? प्राण कासावीस होत आहेत. अशा वेळी ही तृतीया काय सांगतीय्?
– – अशा वेळी हजारो वर्षे ऋतुचक्र न्याहाळणारी आमची भारतीयांची अनुभवकथा सांगतीय् – पाणपोई उघडा. माणसांना, जनावरांना, पक्ष्यांना पाणी द्या. या वणव्यात फुलणारी झाडे पाहा. त्यांची हिरवी पालवी तीव्र जीवनेच्छेचे प्रतीक आहे. सावली धरणारे वृक्ष लावा. जलकुंभ द्या. पंखा द्या. सावली द्या. अक्षय्य टिकणारा हा मानवधर्माचा विचार अक्षय्य तृतीयेचे लेणे लेवून येतो…
… पक्ष्यांना, जनावरांना, कृमी -कीटकांना आणि श्रांत पांथस्थाला आधार देणाऱ्या वृक्षांचे वैशाख वणव्यातले फुलणे मनाला दिलासा देऊन जाते. ज्याने कुणी या दिवसाला अक्षय्य हे नाव दिले, त्याच्या विशाल दृष्टीला वृक्षराजीच दिसली असेल. पाणथळाच्या जागा दिसल्या असतील.
निसर्गाचे अद्भुत देणे थेंबाथेंबाने जपायचे-… तहानलेल्याला द्यायचे- हा विचार असणार.
… अशाश्वत जीविताचा हा तहानलेला ऋतू अखंड सौख्याने भरून काढायचा…
संकटमुक्त व्हावे, ईप्सित साध्य व्हावे, मनोकामना पूर्ण व्हाव्यात, उत्तम आरोग्य लाभावे- अशा मागण्यांची यादी संपतच नाही. इवल्याशा जीवनात त्या साध्य तरी कशा व्हाव्यात? शिवाय, चिरकाल लाभावे असे नेमके काय मागावे? प्रश्नांचा गुंता वाढत जातो.
… खूप उन्हाळे पाहिलेली आई म्हणते- “चांगली दगडाची परात आण. पारवे, चिमण्या, कावळ्यांना दुपारी पाणी लागतं ना! परातीत पाणी भरूयात… प्लॅस्टिकचं तसराळं सांडून टाकतात ते… ”
… भर दुपारी चाललेली त्या पाखरांची पाण्यासाठीची भांडणे पाहताना मौज वाटते… नव्हे, अतीव सुख दाटते.
© सुश्री सुलभा तेरणीकर
मो. 8007853288
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈