सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
विविधा
☆ वनौषधी संरक्षण…एक आव्हान आणि उपाय – भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
(ऋग्ण सेवा प्रकल्प तर्फे झालेल्या निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त झालेला लेख.)
वनौषधी संरक्षण – एक आव्हान आणि उपाय.
पैशाच्या लोभापायी झालेली वृक्षतोड, हा फार मोठा शाप त्याला लागलेला आहे.
दीड-दोनशे वयाची वड पिंपळाची झाडे काही वेळातच बिनधास्त तोडली जात आहेत. नव्हे त्यांची कत्तल होते आहे. “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे “ही तुकोबांची उक्ती विसरत चालली आहे. त्यांच्या आधाराने राहणार्या पशु पक्षांची संख्या प्रमाणाबाहेर घडायला लागली आहे. अमृतासारखी कॅन्सर वर उपयुक्त औषध असणारी वनस्पतीची तस्करी व्हायला लागली आहे. चंदनाच्या बाबतीत तर काय सांगावे, त्याचा सुगंध हाच त्याचा शाप ठरला आहे. रक्तचंदन तर त्याहूनही दुर्मिळ होत चालले आहे. पुढील पिढ्यांना चंदन चित्रातच पहायला मिळते की काय, असं वाटायला लागलं आहे. चाळीस वर्षात औद्योगीकरण वाढलं. धूर, धूळ यामुळे प्रदूषणात प्रचंड वाढ झाली. 35 ते 40 टक्के जंगलक्षेत्र असायला हवे. पण ते फक्त 15 टक्केच उरलेले आहे. हे सँटेलाइट वरून स्पष्ट दिसते. निसर्ग साखळीच तुटायला लागली आहे. सोमवल्ली सारखी वनस्पती, आज फक्त केरळ व हिमाचलमध्ये आणि तीही अगदी अल्प प्रमाणात शिल्लक आहे. कमी अधिक प्रमाणात सगळ्याच वनौषधींची तस्करी व्हायला लागली आहे. हळदीसारख्या रोजच्या वापरातील गोष्टी बद्दल काय सांगायचे? तर अमेरिकेने त्याचे पेटंट मिळवले आणि खेदाची आणि निराशाजनक गोष्ट म्हणजे आपण सगळं निवांतपणे पहात बसलोय. नुसतच भुई थोपटत बसण्यात अर्थ नाही. वनऔषधी टिकवणं हे आपलं अत्यंत महत्त्वाचं आणि आद्यकर्तव्य आहे.
वनौषधींचा संरक्षण देणं इतकं महत्त्वाचं आहे की, ते आहे म्हणून आपलं अस्तित्व आहे विकास करताना, विनाश होत नाही ना तिकडे पहायला हवं. प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर पडायचं असेल तर, वैश्विक उपक्रम घेऊन जंगलांची वाढ करायला हवी. वृक्ष मोठ्या प्रमाणावर लावायला हवेत. वनस्पतींच्या विज्ञानाच्या अभ्यासाचा प्राचीन ठेवा तळागाळापर्यंत पोचवायला हवा.
मूल ब्रम्हा, तवचा विष्णूः, शाखायश्च महेश्वराः।
पत्रे पत्रे च देवानाम वृक्षराज नमोस्तुते।।
अशा तऱ्हेने वनस्पतींना देव मानण्याची प्राचीन संस्कृती जपायला हवी. वाहनांचे उपयोग कमी करुन सायकलचा वापर व पायी जास्त जावे. शालेय स्तरापासून शिक्षणात वेगवेगळ्या वनस्पतीं बद्दल माहिती करून द्यावी. पर्यावरणासारखा विषय चार भिंतीत न शिकविता, नद्या, डोंगर, समुद्र, चांदणे प्रत्यक्ष दाखवत शिकवला तर विद्यार्थ्यांना तो एक वेगळा आनंद मिळेल. सौर शक्तीचा वापर जास्तीत जास्त केल्यास, तीच वीज दुसऱ्या कारणासाठी वापरता येईल. झाडांची कत्तल करणाऱ्यांना कडक शिक्षा द्यायला हव्यात. रस्त्यावर झाडे लावताना त्या त्या भागातील लोकांना त्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी द्यायला हवी. आणि स्वयंप्रेरणेने बाकीच्यांनीही ती स्वीकारायला हवी. प्रत्येक कुटुंबाने आपल्याकडे जागा नसली तरी, कुंडीमध्ये का होईना पण तुळस गवती चहा पुदिना अशी छोटी रोपे लावायला काहीच हरकत नाही. प्राणी-पक्ष्यांच्या अभयारण्या प्रमाणे वनौषधींसाठीही राखीव जागा ठेवायला हव्यात. मोठमोठी प्रदर्शने भरवून सर्वसामान्यांना त्याची ओळख व उपयोग सांगितले जावेत. इस्राईल सारख्या देशात कमी पाण्यावर केली जाणारी शेती पाहिली की, आश्चर्याने तोंडात बोट घालावे असे वाटते. त्याचा अभ्यास करून ते तंत्रज्ञान आपण स्वीकारायला हवे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांना त्याचे महत्त्व, तंत्रज्ञान आणि महत्त्वाचं म्हणजे हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिली तर, शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. नवनवीन संशोधनातून, उत्तम बी बियाणे तयार करून, त्याची लागवड करायला हवी. आज बालाजी तांबे, रामदेवबाबा यांची उत्पादने लोक मोठ्या प्रमाणावर घेत आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर युरोप, अमेरिकेत दरवर्षी आयुर्वेदिक कॉन्फरन्स घेतली जातात. त्याद्वारे या वनौषधींचा आणखी प्रचार होत आहे. युरोपमध्येही लागवडी केल्या जात आहेत. भारत, युरोप अमेरिका सर्वांनी मिळून नव नवीन संशोधन चालू केले आहे. अलीकडं वाचनात आलं की, साध्या रेल्वेच्या परीक्षा ऑनलाइन घेतल्या त्यामुळे चार लाख झाडे आणि 319 कोटी कागदांची बचत झाली. असेच उपक्रम जास्तीत जास्त क्षेत्रात व्हायला हवेत. अनेक ठिकाणी “मियावाकी” जंगलेही केली जात आहेत. सर्व बाजूंनी प्रयत्न चालू आहेत. पण त्याला अजून वेग द्यायला हवा. या आदर्शाचा नवीन पिढी निश्चित आदर करेल. ही जबाबदारी एकट्याची नसून, प्रत्येक नागरिकाच्या अविश्रांत आणि उत्स्फूर्त परिश्रमाची गरज आहे.
समाप्त
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
बुधगावकर मळा रस्ता, मिरज.
मो. ९४०३५७०९८७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈