डाॅ.नयना कासखेडीकर
विविधा
☆ विचार–पुष्प – भाग 19 – विवेक दे ! वैराग्य दे ! ज्ञान दे ! ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
आईची अवस्था, आजूबाजूच्या लोकांची वागण्याची रीत, पितृछत्राचं दु:ख या सगळ्यांमुळे नरेंद्र अंतर्मुख झाला. गरीब आणि दु:खी लोकांचं आक्रंदन भगवंतांना दिसत नाही की काय? नुसता कमरेवर हात ठेऊन, ही निष्ठुर दानवी लीला तो निर्विकारपणे बघतोय? त्याच्या हृदयाला पाझर फुटत नाही? नरेंद्रचा ईश्वरावरचा विश्वासच उडू लागला होता.
आपल्या मित्रांनाही तो हे कधी कधी बोलून दाखवे. त्यावरून त्यांचाही समज दृढ झाला की नरेंद्र आता नास्तिक झालाय. तसच त्याच्या बद्दल शिष्यवृंदांमध्ये आणखी अपप्रचार होऊन तो रामकृष्णांपर्यंत पोहचे. त्यांचा तर नरेंद्रवर पूर्ण विश्वास होताच. खात्री होती. नरेन्द्रबद्दल असे काहीही ऐकून न घेता त्यांनाच ते दटावत असत. पण हेच तर आपली परीक्षा घेत नसतील ना? अशी शंका नरेन्द्रनाथांना आली खरी.
घरगुती कारणांमुळे नरेंद्र दक्षिणेश्वरला श्रीरामकृष्णांकडे जाऊ शकत नव्हते. रामकृष्ण त्यांच्या शिष्यांकरवी नरेंद्रला भेटायला येण्याचे निरोप देत. पण नाही. मनात त्रागा होताच. ईश्वराचा मनातून राग आला होता. पण प्रेमळ अशा रामकृष्णांची आपल्या हृदयातली मूर्ती ते काही केल्या पुसू शकले नव्हते. त्यांच्या बरोबर आलेल्या आतापर्यंतच्या आध्यात्मिक अनुभवामुळे त्यांनी कल्पिलेली नास्तिकता दूर होऊ लागली होती. एका क्षणी त्यांना स्वत:चेच आश्चर्य वाटले की मी हे काय करतोय? त्यांना जाणीव झाली आपल्या अस्तित्वाची.
‘केवळ पैसा मिळवून, कुटुंबाचं अटीतटीने पोषण करत आयुष्य कंठीत राहायचं? आणि एक दिवस मरून जायचं? नाही, नाही माझा जन्म यासाठी झाला नाही. माझ्या जीवनाचं उद्दीष्ट महान आहे. अखंड सच्चिदानंदाचा लाभच माझे लक्ष्य आहे’. असे मनाशी ठरवून, नरेन्द्रनाथांनी कुणालाही नकळत एक दिवस घरादारचा त्याग करण्याचा दिवस निश्चित केला.
गृहत्याग करण्यापूर्वी एकदा गुरूंना वंदन करून मग कायमचा निरोप घ्यायचा असं ठरवलं. त्याच दिवशी गुरु कलकत्त्यात आपल्या एका भक्ताकडे आले आहेत हे कळल्याने नरेंद्रनाथ त्याच्याकडे गेले. तर श्रीरामकृष्णांनी त्यांनाच आग्रह करून दक्षिणेश्वरला नेले. रात्रभर गुरुशिष्यांमध्ये अद्भुत असा संवाद घडत राहिला.
अत्यंत करुण नेत्रांनी श्री रामकृष्ण नरेंद्रनाथांकडे बघून म्हणले, बेटा, कामिनी-कांचनचा त्याग केल्याखेरीज काहीही व्हायचे नाही. श्रीरामकृष्णांना भीती होती की न जाणो हा संसारात गुरफटून बसेल. त्यांनी नरेंद्रनाथांना एका बाजूला नेऊन परोपरीने सांत्वन केलं. सांगीतलं की, माझा देह असेपर्यंत तुला या जगात राहावे लागेल. आणि विशिष्ट कार्यासाठीच हा देह तू धारण केला आहे, याचं रहस्य ते सांगत होते.
दुसर्या दिवशी सकाळी नरेंद्रनाथ दक्षिणेश्वरहून घरी आले. मनावरचं एक मोठं ओझं कमी झाल्यासारखं वाटत होतं. आता, रामकृष्ण त्यांचे आदर्श, गुरु, पिता आणि सर्वस्व झाले होते. नातेवाईकांनी कटकारस्थान करुन त्यांच्या विरोधात केलेली केस हाणून पाडण्यासाठी त्यांनी कंबर कसली. ‘अन्याय, असत्यापुढे काहीही झालं तरी मान झुकविणार नाही’. हा त्यांचा बाणा होता. नामांकित बॅरिस्टर उमेशचंद्र बंडोपाध्याय यांनी नरेंद्रनाथ यांच्याकडून केस लढवली.
कोर्टात लोकांना नरेन्द्रनाथांचे प्रसंगावधान,चारित्र्याची दृढता आणि सद्गुण्णांची चुणूक दिसलीच. पण विरोधी पक्षाचे वकील, उलट तपासणीत नरेंद्रनाथांची निर्भयपणे, स्पष्ट, धीरगंभीर, उत्तरे ऐकून आश्चर्य चकित झाले. न्यायमूर्तिंनी दोन्ही बाजू ऐकून घेऊन, शेवटी नरेन्द्रनाथ यांच्या बाजूने निकाल दिला. नरेन्द्रनाथ हे ऐकताच धावतच घरी आले आणि आईला म्हणाले, “आई घर बचावले”. त्याक्षणीच, भुवनेश्वरी देवींनी अत्यानंदाने विजयी पुत्राला हृदयाशी धरले. दोघांचा आनंद गगनात मावेना.
दिवसांमागून दिवस जात होते. पण आता आर्थिक दृष्टीने काहीतरी सोय व्हायला हवी होती. श्रीरामकृष्णांच्या कृपेने यावर काही तरी उपाय नक्की निघेल असे वाटून, नरेन्द्रनाथ ताबडतोब दक्षिणेश्वरास गेले. नरेंद्रनाथांना बघून रामकृष्ण आनंदित झाले. नरेंद्रनाथांनी म्हटले, “ महाराज माझ्या आईच्या आणि भावंडांच्या दोन घासांची कशीतरी तरतूद होईल असे तुम्ही आपल्या जगन्मातेजवळ धरणे धरावे. माझ्यासाठी”.
श्री रामकृष्णांनी उत्तर दिले, “काय सांगू रे? मी आईला असे चुकूनही कधी काही मागितलेले नाही. तरीपण तुम्हा लोकांची काहीतरी सोय व्हावी म्हणून आईची विनवणी केली होती. पण काय करू? तू तर आईला मानत नाहीस. म्हणून तीही तुझ्याबद्दलच्या सांगण्याकडे लक्षच देत नाही”. कट्टर निराकारवादी नरेंद्रची साकारावर तीळमात्र निष्ठा नव्हती. म्हणून ते गप्प राहिले. बोलायला जागाच नव्हती आणि आईच्या कृपेखेरीज काहीही घडणार नाही असे ठाम मत गुरूंचे होते.
ते एक प्रकारे नरेंद्रनाथांची परीक्षाच घेत होते. शेवटी ते म्हणाले, “बरं, आज मंगळवार आहे. मी सांगतो तुला, आज रात्री कालीमंदिरात जाऊन, आईला प्रणाम करून तू जे मागशील ते आई तुला देईल”. आणि विश्वास असो की नसो श्रीरामकृष्णांची ‘दगडी’ जगन्माता आहे तरी कशी हे एकदा पाहिलंच पाहिजे, म्हणून नरेंद्रनाथ काली मातेच्या देवालयात भारल्यासारखे गेले. आज श्रीरामकृष्णांच्या कृपेने त्यांच्या सांसारिक दु:ख दारिद्रयाचा अंत होणार या उत्कंठेने त्यांना भरून आले होते.
ते गेले तिथे त्यांना दिसले की, जगदंबेच्या रूपाने मंदिर प्रकाशित झाले आहे. दगडी मूर्ती नव्हे, ‘मृण्मय आधारी चिन्मयी जगन्माता’ वर आणि अभय देणारे कर वर करून, असीम अनुकंपापुर्ण, स्नेहमय मंदस्मित करीत आहे. ते पाहून नरेन्द्रनाथ सर्वकाही पार विसरून गेले. फक्त भक्ताप्रमाणे प्रार्थना करू लागले. “ आई विवेक दे, वैराग्य दे, ज्ञान दे. भक्ती दे. आई जेणेकरून तुझ्याच कृपेने तुला सर्वदा पाहू शकेन असं कर”.
नरेंद्र परत आले तसे रामकृष्णांनी विचारले काय रे काय मागितलंस? तेंव्हा कुठे त्याच्या लक्षात आलं की अरेच्च्या खरच की हे काय करून बसलो मी? मागायचं ते राहूनच गेलं की. गुरूंच्या आदेशानुसार पुन्हा गेले. पुन्हा तेच. दोनतीन वेळा जाऊनही काहीच मागितले नाही . नरेंद्रनाथांना सारं लक्षात आलं. गुरु म्हणाले, ज्या अर्थी तू मागू शकला नाहीस त्याअर्थी तुझ्या कपाळी ऐहिक सुख नाही. तरी पण तुम्हाला अन्नवस्त्राची ददात पडणार नाही. नरेंद्रनाथ आश्वस्त झाले. त्यांना कुठे हवे होते ऐहिक सुख? पण त्या दिवसापासून नरेंद्रनाथांच्या जीवनातल्या नव्या अध्यायाला सुरुवात झाली.
© डॉ.नयना कासखेडीकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈