डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 25 – परिव्राजक –३. गाजीपूरडाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

गाजीपूरच्या लोकांबरोबर स्वामीजींच्या खूप छान वैचारिक चर्चा होत होत्या. आपल्या समाजात दूरवर शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे. आपल्या संस्कृतीतील सत्वांश जाणून घेऊन समाजाला प्रेमाने विश्वासात घेऊन सुधारकांनी सुधारणा घडवून आणली पाहिजे. ती सहज प्रक्रियेतून व्हायला हवी. लादली जाऊ नये. शिक्षणाचा पाया आणि त्यातील तत्वे हिंदू विचारधारेवर आधारित असली पाहिजेत. जे चांगलं आहे ते गौरवपूर्वक मांडलं गेलं पाहिजे. हिंदू धर्मात मानले गेलेले आदर्श नीट समजून घेऊन समाजासमोर ठेवले पाहिजेत. असं समाजसुधारकांना बजावून सांगताना स्वामीजी म्हणतात, “ध्यानात ठेवा हिंदू धर्म हे काही केवळ चुकीच्या गोष्टींचे एक गाठोडे नाही. खोलवर बुडी मारा, तुमच्या हाताला अनमोल रत्ने लागतील. परक्या लोकांची संस्कृती आणि चालीरीती, यांच्या डामडौलावर भुलून जाऊ नका. आपली ही मातृभूमी कशी आहे ते समजून घ्या. आपल्या भारतीय समाजाचा जीवनहेतु काय आहे आणि त्याच्या अस्तित्वाची प्रेरणा कशात आहे, याचा तुम्ही शोध घ्या. आपल्या संस्कृतीतील आध्यात्मिक आदर्श आपण विसरून गेलो आहोत, हे आपले खरे दारिद्र्यपण आहे. आपल्या ठायी स्वत:च्या अस्मितेचे भान उत्पन्न होईल तेंव्हाच आपले सारे प्रश्न सुटतील”.

इथेच गाजीपूरमध्ये स्वामीजींच्या विचारांना एक आकार येत चालला होता. सतत आध्यात्मिक विचार तर होतेच डोक्यात, पण देशाच्या वर्तमानस्थितीबद्दल त्यांना चिंता सतावत होती आणि त्यातून बाहेर येण्याचा मार्ग शोधताना भविष्यातला दृष्टीकोण आकार घेत होता असे दिसते.

गाजीपूरला काही इंग्रज अधिकारीही होते. त्यातील दोघांशी स्वामीजींचा संवाद होत होता. अफू विभागात रॉस म्हणून एक अधिकारी होते, त्यांना हिंदू धर्म व त्यातले देवदेवता, उत्सव, सामाजिक चालीरीती, याचे खूप कुतूहल होते. काही रूढी आणि आचार उघड उघड सदोष होते, अशा आचारांना हिंदूच्या धर्मग्रंथात काही आधार आहे का याचं त्यांना कोडं पडलं होतं. मग स्वामीजींनी प्रतिसाद देत, धार्मिक कल्पनांचा विकास, आणि सामाजिक आचारांच्या मागे उभी असणारी आध्यात्मिक बैठक त्यांनी सांगितली. हे ऐकून हिंदू धर्मातला व्यापक दृष्टीकोण रॉस यांच्या लक्षात आला.

एकदा, रॉस यांनी तिथले जिल्हा न्यायाधीश पेंनिंग्टन यांची स्वामीजींशी भेट घडवून आणली. स्वामीजींनी त्यांच्या बरोबर हिंदू धर्माचे पुनरुत्थान, आजच्या विज्ञानामुळे होऊ घातलेले परिवर्तन, योगाच्या मागचा शास्त्रीय विचार, सन्याशांचा संयम आणि मनोनिग्रह यावर आधारित जीवननिष्ठा यावर संवाद साधला. स्वामीजींचा, मुलभूत मानवी शक्ति, प्रेरणा आणि साधना याबद्दलचा वेगळा दृष्टीकोण  पेंनिंग्टन यांना खूप आवडला. त्यांना वाटलं याचं तर आधुनिक मानसशास्त्राच्या आधारे विश्लेषण होऊ शकतं की. ते एव्हढे प्रभावित झाले की, ते म्हणाले, “हिंदूंचा धर्म आणि त्यांचा सामाजिक आचार याविषयीचे आपले विचार तुम्ही इंग्लंडला जाऊन तेथील विचारवंतांपुढे ठेवले पाहिजेत.”

“वादे वादे जायते तत्वबोध:” सतत तत्वचिंतन सुरू असल्याने स्वामीजींचे हे विचार  आतापर्यंत फक्त गुरुबंधु, आपल्या समाजाचे लोक यांच्यापुरताच मर्यादित होते. आज मात्र ते निराळ्या संस्कृतीत वाढलेल्या विचारवंतांपुढे मांडल्यामुळे त्याचे परिमाणच बदलले होते.

स्वामीजींच्या या समाधानकारक चर्चा तर चालू होत्याच, पण गाजीपूरला येण्याचा त्यांचा मूळ उद्देश होता, श्रेष्ठ आध्यात्मिक विभूति पवहारी बाबा यांची भेट घेणं. न्याय, वेदान्त, व्याकरण अशा सर्व शास्त्रांचा अभ्यास, भारतभर केलेला प्रवास, संस्कृत बरोबर इतर भाषांचे ज्ञान, सद्गुरूंकडून योगमार्गाची मिळालेली दीक्षा, त्याप्रमाणे वर्षानुवर्षे केलेली साधना आणि शेवटी शेवटी चालू असलेला निराहार अवस्थेतला एकांतवास व मौनाचा स्वीकार अशा तपश्चर्येचं तेज असणारे पवहारी बाबा. स्वामीजींची यांची भेट घेण्याची तीव्र इच्छा होती. त्यानंतर ते वाराणशी करून वराहनगर मठात आले. कारणही तसच होतं,  बलराम बाबू यांचं निधन झालं होतं, त्या पाठोपाठ सुरेन्द्र नाथांचे पण निधन झाले, त्यांच्या आध्यात्मिक परिवारात खूप मोठी पोकळी निर्माण झाली.

वराहनगर मठाची  व्यवस्था लावून, नंतर त्यांना हिमालयात जाऊन गढवाल च्या शांत परिसरात साधना करण्याची इच्छा होती. यावेळी त्यांचा भ्रमणाचा काळ जवळ जवळ सलग पावणेतीन वर्ष होता. आणि प्रदेश थेट हिमालयापासून ते कन्याकुमारी पर्यंतचा, विविध प्रांत, भाषा, प्रदेश, अनेक प्रकारच्या व्यक्ती असा विविधतेने नटलेल्या भारताच्या भागात त्यांनी संचार केला. त्यांनी गाजीपूरला समाजसुधारकांना म्हटलं होतं की, ‘आपली मातृभूमी समजून घ्या’ त्याप्रमाणे ते ही याच उद्देशाने स्वदेश संचाराला निघाले होते.    

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments