डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ३१ परिव्राजक ९. मूर्तीपूजा ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

अलवरला राजेसाहेबांचे दिवाण मेजर रामचंद्र यांना स्वामीजींबद्दल कळलं होतं. त्यांनीही स्वामीजींना आपल्या घरी बोलावलं. अलवर संस्थानचे राजे महाराज मंगलसिंग होते. त्यांच्यावर पाश्चात्य संस्कृती आणि तिथले रीतिरिवाज यांचा प्रभाव होता. त्यामुळे दिवाण साहेबांना वाटलं की स्वामीजींची भेट घडवून आणली तर राजेसाहेबांचा दृष्टीकोण थोडा तरी बदलेल. म्हणून त्यांनी महाराजांना चिठ्ठी पाठवली की, उत्तम इंग्रजी जाणणारा एक मोठा साधू इथे आला आहे. तसे दुसर्‍याच दिवशी राजे साहेब दिवाणांच्या घरी स्वामीजींना भेटायला आले. त्यांनी स्वामीजींना पहिलाच प्रश्न विचारला की, “आपण एव्हढे विद्वान आहात, मनात आणले तर महिन्याकाठी कितीतरी पैसा सहज मिळवू शकाल. मग आपण असे भिक्षा मागत का फिरता?”स्वामीजींना हा प्रश्न नवीन नव्हता. हाच प्रश्न रामकृष्ण संघाचं काम सुरू केलं तेंव्हा भिक्षा मागायला गेले असताना अपमान करण्यासाठी विचारला गेला होता. पण आज प्रश्न विचारणारी व्यक्ती  श्रेष्ठत्वाचा अहं असणारी, हातात सत्ता असणारी व्यक्ती होती.

महाराजांच्या प्रश्नाचे उत्तर न देता स्वामीजींनी त्यांना उलट प्रश्न विचारला की, “महाराज आपण सदैव पाश्चात्य व्यक्तींच्या सहवासात वावरता. शिकारीला वगैरे जाण्यात वेळ दवडता. प्रजेविषयीच्या आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करता. हे आपण का करता सांगा बरं?” उपस्थित लोक जवळ जवळ भ्यायलेच.  राजेसाहेबांना असा थेट प्रश्न ? पण राजेसाहेब शांत होते. त्यांनी विचार केला आणि म्हणाले, “का ते मला नेमकं सांगता येणार नाही. पण मला आवडतं म्हणून मी सारं करतो”. स्वामीजी यावर म्हणाले, “याच कारणामुळे मी पण अशी भिक्षावृत्ती स्वीकारून संचार करीत असतो”.

राजेसाहेब हसले. त्यांनी पुढचा प्रश्न विचारला. “स्वामीजी माझा मूर्तिपूजेवर विश्वास नाही. तर माझं काय होईल?” मी धातूची, दगडाची किंवा लाकडाची अशा मूर्तीची पुजा करू शकत नाही. तर मला मरणोत्तर वाईट गती प्राप्त होईल का? या प्रश्नावरून त्यांना पाश्चात्य दृष्टीकोनाचा आणि आधुनिकतेचा अहंकार होता हे स्वामीजींच्या लक्षात आलं होतं. स्वामीजी म्हणाले, “हे पहा, धार्मिक दृष्ट्या ज्याची ज्या मार्गावर श्रद्धा असेल त्याने त्या मार्गाने जावं”.

दिवाण साहेबांच्या घरात राजेसाहेबांचे चित्र भिंतीवर लावलेले होते ते चित्र स्वामीजींनी खाली काढण्यास सांगितलं. सगळे बघत होते की आता स्वामीजी पुढे काय करतात? त्यांना काही केल्या अंदाज येईना. स्वामीजींनी हे चित्र दिवाणसाहेबांच्या समोर धरलं आणि विचारलं, “हे काय आहे?” दिवाण साहेब म्हणाले, “हे महाराजांचे छायाचित्र आहे”. स्वामीजी म्हणाले, “थुंका याच्यावर”. हे ऐकताच, सगळे खूप घाबरले. इतर लोकांकडे वळून स्वामीजी म्हणाले, “तुमच्यापैकी कोणीही यावर थुंका. त्यात काय एव्हढं? तो एक कागद तर आहे”. मग दिवाणसाहेबांना पुन्हा म्हणाले, “थुंका यावर. थुंका यावर”. दिवाणसाहेब न राहवून म्हणाले, “स्वामीजी हे भलतंच काय सांगताय? हे महाराजांचं चित्र आहे. तुम्ही सांगता ते आम्हाला करणं कसं काय शक्य आहे?”           

“ते तर खरच. पण यात प्रत्यक्ष महाराज नाहीत ना. त्यांचं शरीर, अस्थि, मांस, अवयव यातलं काहीही नाही या कागदात. महाराज बोलतात,फिरतात, हिंडतात. तसं काहीच हा कागद करू शकत नाही. पण तरीही तुम्ही त्यावर थुंकण्यास नकार देता. हे तुमचं बरोबर आहे. कारण ते तुमचे महाराज आहेत. त्यावर थुंकणे हा त्यांचा अपमान आहे. असे तुमच्या मनात येते”. महाराजांबद्दल आदरभावनेचा स्वामीजींनी उल्लेख केल्यामुळे उपस्थित लोक जरा मनातून शांत झाले.

मग स्वामीजी महाराजांकडे बघून म्हणाले, “हे पहा महाराज, हा कागद म्हणजे तुम्ही नाहीत. पण दुसर्‍या दृष्टीने पाहिलं तर, त्यात तुम्ही आहात. त्यावर थुंका म्हटलं तर तुमचे विश्वासू सेवक तसं करायला तयार नाहीत. कारण ही तुमची प्रतिकृती पाहिली की, त्यांना तुमची आठवण होते. त्यामुळे ते ज्या आदरभावाने तुमच्याकडे बघतात, त्याच आदरभावनेनं ते या चित्राकडे बघतात. वेगवेगळ्या देवतांच्या धातूच्या, पाषाणाच्या बनवलेल्या मूर्तींची पुजा जे लोक करतात, त्यांची पण हीच दृष्टी असते. ते लोक धातूची किंवा दगडाची पुजा करत नाहीत. ती मूर्ती बघितली की त्यांना परमेश्वराची आठवण होते आणि त्या परमेश्वराची ते पुजा करतात.

मी इतक्या ठिकाणी फिरताना बघितलं की अनेकजण मूर्तिपूजा करताना बघितलंय, पण कोणीही, हे दगडा, मी तुझी पूजा करतो. हे पाषाणा, माझ्यावर दया कर. असं म्हणत नव्हता. त्यांची पुजा किंवा प्रार्थना असते ती त्या मूर्तीच्या रुपानं असलेल्या प्रतिकाच्या मागे उभ्या असलेल्या परमेश्वराची. महाराज आपण लक्षात घ्या, की, प्रत्येक जण प्रार्थना करत असतो ती अखेर त्या विश्वचालक सर्वशक्तिमान प्रभूची. अर्थात हे सारं माझं मत झालं. तुमचं जे काही मत असेल ते तुमचं. त्याबद्दल मी काय बोलू?”

राजे मंगलसिंह अवाक झाले. त्यांनी दोन्ही हात जोडून म्हटले, मूर्तिपूजेकडे कोणत्या दृष्टीने पाहायला हवं याबद्दलचं असं स्पष्टीकरण आजवर मी कधी ऐकलं नव्हतं. आपण माझे डोळे उघडलेत. आपल्या देशावर राज्य गाजवलेलं इंग्लंड, परकीय राज्यकर्ते, त्यांची संस्कृती, त्यांचा ख्रिस्त धर्म याचा त्यावेळच्या सुशिक्षित वर्गावर काय परिणाम होत होता हे स्वामीजींनी कलकत्त्याला असताना अनुभवलं होतं. पण संस्थानिक असलेल्या व्यक्तीवर झालेला परिणाम त्यांना राजे मंगलसिंह यांच्या रूपात पाहायला मिळाला होता.अशा वेगवेगळ्या प्रसंगातून स्वामी विवेकानंदांना अनेक प्रकारची लोकं कळत जात होती. त्यांचा दृष्टिकोन समजत होता. कुठे काय परिस्थिति आहे हे समजत होते. समाज रचनेचा अभ्यास होत होता.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments