डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ३३ – परिव्राजक ११. निश्चय ☆ डाॅ. नयना कासखेडीकर

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

एक ऐतिहासिक आणि सौंदर्यपूर्ण नगररचना असलेल्या जयपूर शहरात स्वामीजी खूप कमी काळ राहिले. जयपूर मध्ये एक सभापंडित व्याकरणाचे जाणकार होते. त्यांनी पंडितांकडून पाणीनीच्या व्याकरणातील सूत्रे समजावून घेण्याचा प्रयत्न केला. पंडितजींनी अनेक प्रकारे समजावून सांगून ही तीन दिवसाच्या प्रयत्नांनंतर सुद्धा स्वामीजी आकलन करू शकले नाहीत. पंडितजी त्यांना म्हणाले, “स्वामीजी माझ्याजवळ शिकल्याने आपला विशेष फायदा होईल असे वाटत नाही. तीन दिवस झाले, मी तुम्हाला एक सूत्रही समजावून देऊ शकलो  नाही. आपण हा प्रयत्न थांबवावा. या बोलण्याने स्वामीजी या सुत्राचा अर्थ समजण्यासाठी, निश्चय करून एकांतात तीन तास बैठक मारून बसले आणि सूत्राचा अर्थ लक्षात आल्यावर खोली बाहेर येऊन, तो पंडितजींना सुबोध शैलीत म्हणून दाखवला. एव्हढंच नाही तर सूत्रा मागून सूत्र आणि अध्याया मागून अध्याय त्याच पद्धतीने ते वाचत राहिले. पंडितजी आश्चर्यचकीत झाले. एकदा ही आठवण सांगताना स्वामीजींनी म्हटले आहे, “मनाचा पूर्ण निर्धार असेल तर, काहीही साध्य करणं शक्य असतं. एखादा पर्वत असावा आणि त्यातील मातीचा कण अन कण वेगळा करावा अशा प्रकारे मनुष्य कोणताही कठीण विषय आत्मसात करू शकतो”. अशा प्रकारे दोन आठवड्यात शक्य तेव्हढे त्यांनी पंडितजिंकडून शंका निरसन करून घेतले होते. या आधी पण वराहनगर मठात त्यांनी दोन वर्ष पाणिनी च्या व्याकरणाचा अभ्यास केला होता.

जयपूर संस्थानचे लश्कर प्रमुख सरदार हरिसिंग यांच्याकडे काही दिवस स्वामीजी राहिले होते. त्यांच्या प्रवसातला हा अनुभव अत्यंत वेगळा होता. हरिसिंग यांचा भारतीय तत्वज्ञानाचा खूप चांगला अभ्यास होता. ते वेदांती होते, परब्रम्ह मनात असत. मूर्तिपूजेवर त्यांचा विश्वास नव्हता. ते साकाराचे पक्के  विरोधक आणि निराकाराचे कट्टर समर्थक होते. त्यांच्या बरोबर तासन तास अनेक चर्चा होत होत्या. सगळे ज्ञान काही फक्त बुद्धीच्या जोरावरच मिळत नसते, काही वेळा ते भावनिक पातळीवर सुद्धा मिळते. कारण ते जाणिवेच्या पातळीवरचे असते. असाच अनुभव स्वामीजींनी हरिसिंग यांना दिला.

एका संध्याकाळी ते दोघ फिरायला बाहेर पडले होते. त्याच रस्त्यावर समोरून भगवान श्रीकृष्णाची मिरवणूक चालली होती. यात भक्त आर्त स्वरात आणि भावभक्तीने भजने म्हणत होती. दोघेही ती मिरवणूक पाहत थांबले असताना, स्वामीजींनी हरिसिंगना स्पर्श केला आणि म्हटले, “तो पहा साक्षात भगवंत आहे”. हरिसिंग देहभान हरपून एकटक बघू लागले. डोळ्यातून अश्रुंच्या धारा लागल्या. क्षणात ते एका वेगळ्याच विश्वात गेले. हरिसिंग यांनी हा अनुभव घेतल्या नंतर स्वामीजींना म्हणाले स्वामीजी माला साक्षात्कारच झाला. तासण तास चर्चा करून मला जे उमगलं नव्हतं, ते सारं मला आपल्या या स्पर्शाने ध्यानात आणून दिलं. श्रीकृष्णाच्या त्या मूर्तीत मला खरोखर जगच्चालक प्रभुंचं दर्शन घडलं”. असाच अनुभव स्वामीजींनी दक्षिणेश्वरच्या मंदिरात कालिमातेचं दर्शन घेताना घेतला होता. साकारावर विश्वास न ठेवणार्‍या स्वामीजींना हा अनुभव आला होता.

आता स्वामीजी जयपूरहून अजमेरला गेले. राजस्थान मधलं एक महत्वाचं ठिकाण. संपूर्ण भारतात एकमेव असं ब्रम्हदेवाचं मंदिर इथे आहे. त्याचं दर्शन आणि मोईनूद्दीन चिस्ती या दर्ग्याचं दर्शन घेऊन तिथला मुक्काम हलवला आणि राजस्थानच्या वळवंटातल्या साडेपाच हजार फुट उंचीच्या अबुच्या पहाडावर आले. त्यावेळी हा परिसर अतिशय शांत, उन्हाळ्यात तर हवा थंड आणि आल्हाददायक आणि अनेक संस्थांनिकांची प्रासादतुल्य  निवासस्थाने होती. ब्रिटिश रेसिडेंटचा मुक्काम यावेळी इथे असे. त्यामुळे ते ऐश्वर्याचं लेणं भासत असे. पण याचा स्वामीजींना काही फरक नव्हता पडणार कारण त्यांना यात काहीच रस नव्हता. त्यांना हवी होती शांतता आणि एकांत स्थान. त्यांना आकर्षण होतं अशा ठिकाणी ध्यानधारणा करण्याचं. चम्पा ही गुहा त्यांना सापडली आणि त्यात ते राहू लागले.

रोज संध्याकाळच्या शांत प्रहरी स्वामीजी तलावाच्या काठाने चक्कर मारत. इतर संस्थांचे कोणी न कोणी तिथे येत जात असत. एकदा खेत्री संस्थानचे मुन्शी जगनमोहन लाल आले. ते उत्तम कार्यप्रशासक होते. त्यांना राजस्थानी, पर्शियन, संस्कृत, इंग्रजी या भाषा उत्तम येत होत्या. त्यांनी आपले खेत्रीचे राजा अजितसिंग यांना स्वामीजींनी भेटावे अशी इच्छा व्यक्त केली. त्यांची भेट ठरली.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments