डाॅ.नयना कासखेडीकर
विविधा
☆ विचार–पुष्प भाग ३८ परिव्राजक १६.बेळगांव ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
स्वामीजी १६ ते २७ऑक्टोबर १८९२ मध्ये बेळगांवमुक्कामी आले. महाराष्ट् म्हणजे तेव्हाचा मुंबई प्रांत ! तेव्हा बेळगांव मुंबई प्रांतात होते. कोल्हापूरहून भाटे यांचे नावाने गोळवलकर यांनी परिचय पत्र दिलं होतंच. श्री. सदाशिवराव भाटे वकिलांकडे स्वामीजींचं अत्यंत अगत्यपूर्वक स्वागत झालं. त्यांना पाहताक्षणीच हा नेहमीप्रमाणे एक सामान्य संन्यासी आहे अशी समजूत इथेही झाली असली तरी त्यांचं काहीतरी वेगळेपण आहे हे ही त्यांना जाणवत होतंच. भाटे कुटुंबीय आणि बेळगावातले इतर लोक यांना कधी वाटलं नव्हतं की काही दिवसांनी ही व्यक्ती जगप्रसिद्ध होईल. बेळगावचे हे श्री भाटे वकिल यांचे घर म्हणजे विदुषी रोहिणी ताई भाटे यांच्या वडिलांचे घर होय.
मराठी येत नसल्यामुळे भाटे कुटुंबीय स्वामीजींशी इंग्रजीतच संवाद साधत. त्यांच्या काही सवयी भाटेंना वेगळ्याच वाटल्या म्हणजे खटकल्या. पहिल्याच दिवशी स्वामीजींनी जेवणानंतर मुखशुद्धी म्हणून विडा मागितला. त्याबरोबर थोडी तंबाखू असेल तरी चालेल म्हणाले. संन्याशाची पानसुपारी खाण्याची सवय पाहून भाटेंकडील मंडळी अचंबित झाली. आणखी एक प्रश्न भाटे यांना सतावत होता तो म्हणजे, स्वामीजी शाकाहारी आहेत मांसाहारी? शेवटी न राहवून त्यांनी स्वामीजींना विचारलंच की आपण संन्यासी असून मुखशुद्धी कशी काय चालते? स्वामीजी मोकळेपणाने म्हणाले, “मी कलकत्ता विद्यापीठाचा पदवीधर आहे. माझे गुरु श्रीरामकृष्ण परमहंस यांच्यामुळे माझे जीवन जरी संपूर्ण बदलले असले तरी, त्याधीचे माझे आयुष्य मजेत राहणार्या चारचौघा तरुणांप्रमाणेच गेले आहे. संन्यास घेतल्यावर इतर सर्व गोष्टी सोडल्या असल्या तरी या एक दोन सवयी राहिल्या आहेत. पण त्या फारशा गंभीर स्वरुपाच्या नाहीत. म्हणून राहू दिल्या आहेत. पण आपोआपच सुटतील”. आणि शाकाहारीचं उत्तर पण भाटेंना मिळालं. “ आम्ही परमहंस वर्गातील संन्यासी. जे समोर येईल त्याचा स्वीकार करायचा. काहीही मिळालं नाही तर उपाशी राहायचं”.
खरच असं व्रत पाळणं ही कठीण गोष्ट होती. मनाचा निश्चय इथे दिसतो. स्वामीजी सलग पाच दिवस अन्नावाचून उपाशी राहण्याच्या प्रसंगातून गेले होते. भुकेमुळे एकदा चक्कर येऊन पडलेही होते. तर कधी राजेरजवाडे यांच्या उत्तम व्यवस्थेत सुद्धा राहिले होते. पण त्यांना कशाचाही मोह झाला नव्हता हे अनेक प्रसंगातून आपल्याला दिसलं आहे. जातीपातीच्या निर्बंधाबद्दल ही शंका विचारली तेंव्हा, आपण मुसलमानांच्या घरीही राहिलो आहोत आणि त्यांच्याकडे जेवलोही आहोत असे सांगितल्यावर, हे संन्यासी एका वेगळ्या कोटीतले आहेत हे समजायला वेळ लागला नाही.
आज लॉकडाउनच्या काळात दारूची दुकाने उघडली तर परमोच्च आनंद झाला लोकांना. जणू उपाशी होते ते. १०ला उघडणार्या दुकानांसमोर सकाळी सातपासूनच उभे होते लोक ! दुकानांसमोर दारू घ्यायला रांगाच रांगा लागल्या होत्या. यात स्त्रिया सुद्धा मागे नव्हत्या. खांद्याला खांदा देऊन लढत होत्या ! हे दृश्य पाहिल्यावर स्वामी विवेकानंदांच्या शिकवणुकीची किती आवश्यकता आहे हे जाणवून मन खिन्न होते.
एकदा भाटेंचा मुलगा संस्कृत भाषेचा अभ्यास करताना पाणीनीच्या अष्टाध्यायीतील सूत्र म्हणत होता. त्यातल्या चुका स्वामीजींनी दुरुस्त करून सांगितल्या तेव्हा या अवघड विषयाचे ज्ञान असणे ही सामान्य गोष्ट नाही असे भाटे यांना वाटले. एक दिवस काही परिचित व्यक्तींना एकत्र करून त्यांनी स्वामीजींबरोबर संभाषण घडवून आणले. त्यात एक इंजिनियर होते. ‘धर्म हे केवळ थोतांड आहे, शेकडो वर्षांच्या रूढी चालीरीती यांच्या बळावर समाजमनावर त्याचे प्रभूत्त्व टिकून राहिले आहे किंबहुना लोक केवळ एक सवय म्हणून धार्मिक आचार पाळत असतात’, असं त्यांचं मत होतं. पण स्वामीजींनी बोलणे सुरू केल्यावर त्यांना ह्या युक्तिवादाला तोंड देणं अवघड जाऊ लागलं. आणि अखेर शिष्टाचाराच्या मर्यादेचा भंग झाल्यावर भाटेंनी त्यांना (म्हणजे एंजिनियर साहेबांना) थांबवलं. पण स्वामीजींनी अतिशय शांतपणे परामर्श घेतला. ते प्रक्षुब्ध झाले नाहीत. कोणाच्याही वेड्यावाकड्या बोलण्याने सुद्धा स्वामीजी अविचल राहिले होते. याचा उपस्थित सर्वांवर परिणाम झाला.या चर्चेचा समारोप करताना स्वामीजी म्हणाले, “ हिंदुधर्म मृत्युपंथाला लागलेला नाही हे आपल्या देशातील लोकांना समजावून सांगण्याची वेळ आली आहे. एव्हढच नाही तर, सार्या जगाला आपल्या धर्मातील अमोल विचारांचा परिचय करून देण्याची आवश्यकता आहे. वेदान्त विचाराकडे एक संप्रदाय म्हणून पहिले जाते हे बरोबर नाही. सार्या विश्वाला प्रेरणा देण्याचे सामर्थ्य त्या विचारात आहे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे”. स्वामीजींची ही संभाषणे आणि विचार ऐकून बेळगावचा सर्व सुशिक्षित वर्ग भारावून गेला होता.
बेळगावातील मुक्कामात रोज सभा होऊ लागल्या. शहरात स्वामीजींच्या नावाची चर्चा होऊ लागली. वेगवेगळ्या विषयांवर सभांमध्ये वादविवाद व चर्चा झडत असत. स्वामीजी न चिडता शांतपणे प्रश्नांची उत्तरे देत. कोपरखळ्या मारत विनोद करत स्वामीजी समाचार घेत असत.
या बेळगावच्या आठवणी वकील सदाशिवराव भाटे यांचे पुत्र गणेश भाटे यांनी लिहून ठेवल्या आहेत. स्वामीजी त्यांच्याकडे आले तेंव्हा ते (गणेश) बारा-तेरा वर्षांचे होते. स्वामीजीच्या वास्तव्याने पावन झालेली त्यांची ही वास्तू भाटे यांनी रामकृष्ण मिशनला दान केली आहे. स्वामी विवेकानंदांनी या मुक्कामात वापरलेल्या काठी, पलंग, आरसा या वस्तू ते राहिले त्या खोलीत आठवण म्हणून जपून ठेवल्या आहेत, त्या आपल्याला आजही पाहायला मिळतात.
क्रमशः…
© डॉ.नयना कासखेडीकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈