सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
विविधा
☆ वळीव ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
खिडकीतून बाहेर आकाशाकडे पाहताना दुपारच्या उन्हाच्या झळा अंगाला जाणवत होत्या. मार्च, एप्रिल महिना म्हणजे उन्हाळ्याची तीव्रता जास्त! आकाशाच्या निळ्या पार्श्वभूमीवर ढगांचे पांढरे शुभ्र पुंजके विखुरलेले दिसत होते आणि माझं मनही असंच विचारांच्या आवर्तात भरकटत होते!
लहानपण डोळ्यासमोर आले! परीक्षा संपण्याच्या आनंदा बरोबरच मोठ्या उन्हाळी सुट्टीची चाहूल लागलेली असे. ही सुट्टी कशी घालवायची याची स्वप्नं रंगवत दिवस जायचे. आता सारखे टीव्ही, मोबाईल, मोबाईल गेम, सिनेमा हे विश्व आमच्या समोर नव्हतं! फार तर परीक्षा झाल्यावर एखादा सिनेमा बघायला मिळायचा! कोकणात तर सुट्टीत दुपारी पत्ते खेळणे, संध्याकाळी समुद्रावर फिरायला जाणे, डबा ऐसपैस सारखे खेळ खेळणे,घरी आले की परवचा म्हणणे, गाण्याच्या भेंड्या लावणे हीच करमणूक होती. सकाळी आठवण भाताचा नाश्ता झाला की दुपारच्या जेवणापर्यंत आम्ही घरात फिरकत नसू. आंबे बाजारात सुरू झाले की रोज आमरसावर ताव मारणे, फणस, काजूचा आस्वाद घेणे यात दुपार कधी सरायची कळत नसे. घामाच्या धारा वाहत असायच्या पण संध्याकाळी ऊन उतरले की समुद्रावरचा वारा ‘शीतल विंझण वाऱ्यासारखा वाटायचा!
बालपण कोकणचा मेवा खात कधी संपलं कळलं नाही आणि कॉलेज साठी देशावर आले. देशावरचे उन्हाळी वातावरण खूपच वेगळे! ऊन खूप असे पण घामाच्या धारा कमी! संध्याकाळी चार-पाच नंतर हवा एकदम बदलत असे या दिवसात! अभ्यासाच्या वाऱ्याबरोबरच बाहेरची हवा ही बदलती असे! दुपारचे कडक ऊन संध्याकाळी वाऱ्या वावटळीत कमी तीव्र वाटायचे. हॉस्टेलवर राहत असताना जानेवारीनंतर हवेतला गारवा कमी होऊन वातावरण तापत असे. आमच्या कॉलेजच्या परिसरातील झाडांची पाने पिवळी, करड्या रंगाची दिसू लागत. अधून मधून वावटळ सुटे आणि दूरवर फुफाटा उधळत असे. वसंत ऋतुच्या चाहुलीने निसर्गात सूजनाची निर्मिती दिसायला सुरुवात होई. झाडावर पालवी फुटलेली दिसे. कोकिळेचे कूजन ऐकायला येई तर कुठेतरी निष्पर्ण पांढऱ्या, गुलाबी रंगाचे वस्त्र पांघरून दिसे तर कुठे पिवळ्या जांभळ्या फुलांची शाल पांघरलेला कॅशिया असे! आकाशाच्या निळ्या पार्श्वभूमीवर गुलमोहराचे केशरी तुरे खुलून दिसत! मोगरा, मदनबाणाची छोटी छोटी झुडपे पांढऱ्या कळ्यांनी भरून गेलेली दिसत. संध्याकाळी त्यांचा सुगंध सगळा परिसर गंधमयी करत असे!
अशा या वातावरणात आकाशात ढगांची बदलाबदली कधी सुरू होई कळत नसे. पांढरे शुभ्र ढग हळूहळू 9करडे बनत, बघता बघता आकाश काळ्या ढगांनी भरून जाई. ढगांचा कडकडाट आणि विजेच्या गडगडाटासह हवा आपलं रुपच पालटून टाकत असे. जोराचा वारा सुटला की पाखरे लगबगीने आपल्या घराकडे परतू लागत. आणि मग जी वळवाची सर येई ती मृदगंध उधळीत जीवाला शांत करत येई! तो पाऊस अंगावर झेलू की टप टप पडलेल्या गारा वेचू असे होऊन जाई! छपरावर, रस्त्यावर सगळीकडे गारांचा सडा पसरलेला दिसे! डोळ्यासमोर तो वळीव असा उभा राहिला की मनमोराचा पिसारा किती फुलून जाई ते वर्णनच करता येत नाही!
पावसाची पहिली सर अंगावर घेतली की तो वळीव प्राशन करून घ्यावासा वाटतो! पावसाची सर थांबता थांबता आकाशात इंद्रधनुष्याची कमान बघायचं सुख अनुभवायला मिळते! पांढऱ्या शुभ्र ढगातून बदलत जाणारा तो काळा ढग असा ओथंबून येतो की त्याची होणारी बरसात मनाचे शांतवन करते! कधी कधी मनाला प्रश्न पडतो की ते पांढरे ढग पांढरे ढग काळयामध्ये परावर्तित झाले तरी कधी? विजेच्या संगतीने कडकडाट करीत हे भाव व्याकुळ ढग पृथ्वीवर रिते कसे बरं होत असतील? पांढरे ढग श्रेष्ठ की काळे ढग? अशा आशयाचा वि.स. खांडेकरांचा धडा आठवून गेला! दोन्हीही ढग तितकेच महत्त्वाचे! करड्या ढगांचे अस्तित्वच मुळे पांढऱ्या ढगांवर अवलंबून असते.विचारांच्या आवर्तात ही ढगाळलेली अवस्था येते. कधीकधी विचारांचे पांढरे ढग जेव्हा परिपक्व होतात तेव्हा ते हळूहळू करडे बनतात. पुढे मनाचे आभाळ दाटून येते आणि योग्य वेळ आली की डोळ्यातून सरीवर सरी बरसत राहतात. मनावरचे अभ्राचे पटल नष्ट करून स्वच्छ मनाने पुन्हा नाविन्याचा आस्वाद घेतात! अशा नवनिर्मिती करणाऱ्या त्या बरसणाऱ्या ढगांची माझे मन आतुरतेने वाट पाहत राहते!
अशावेळी आठवते माझीच कविता….
ढगाळलेली हवा,
हातात कप हवा,
वाफाळलेल्या चहाचा,
प्रत्येक घोट नवा !
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈