सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ विविधा ☆ शारदीय नवरात्रोत्सव.. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
नवरात्र हा नऊ दिवसांचा उत्सव असतो. नऊ ही संख्या ब्रह्म संख्या समजली जाते. निर्मिती शक्ती आणि नऊ हा अंक यामध्ये एक नाते आहे. जमिनीत गेल्यावर बीज नऊ दिवसांनी अंकुरते. आईच्या पोटात बाळ नऊ महिने राहते आणि जन्म घेते. 9 हा अंक सर्व अंकात मोठा आहे. आदिशक्तीचा उत्सव हा निर्मितीचा उत्सव असल्याने तो नऊ दिवस असतो.
सनातन वैदिक धर्म हा माणसाने निसर्गाशी नाते जोडावे हे शिकवतो. भारत हा शेतीप्रधान देश आहे, त्यामुळे सण-उत्सवांची रचना ही शेतीच्या वेळापत्रका नुसार करण्यात आली आहे.
पावसाची नक्षत्रे संपता संपता भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते, म्हणून पृथ्वी विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पार्थिव गणपती पूजन केले जाते. भाद्रपद कृष्णपक्षात आपण पूर्वजांचे स्मरण करतो, तर आश्विन महिन्याच्या सुरुवातीला शेतात धान्य तयार होते म्हणून निसर्गातील निर्मिती शक्ती विषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. निर्मिती शक्ती नवीन पिढीला जन्म देते ती या आदिशक्ती मुळेच! म्हणून नवरात्र उत्सव किंवा आदिशक्तीचा उत्सव नऊ दिवस साजरा केला जातो.
आपल्या हिंदू संस्कृतीनुसार आपले सण हे त्या त्या काळातील हवामान, शेती, प्राणी या गोष्टींशी संबंधित असतात. निसर्ग आणि मानव मूलतः एकमेकाशी जोडलेले असतात.भौतिक प्रगती च्या नादात माणूस आपले मातीशी असलेले नाते विसरत चालला आहे. आप,तेज,माती, हवा आणि अग्नी या पंचमहाभूतांचे स्मरण आपण ठेवले पाहिजे.
अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्राचा उत्सव सुरू होतो. आदिशक्तीची श्री महालक्ष्मी , श्री महासरस्वती आणि श्री महांकाली ही देवीची तीन रूपे आहेत. श्री महालक्ष्मी ही संपन्नतेची देवता आहे, तर श्री महासरस्वती ही माणसाला ज्ञान देणारी आहे. महांकाली रूपात देवी अन्यायाला वाचा फोडणे आणि गुंड प्रवृत्तीचा नाश करणे यासाठी महत्त्वाची आहे.
पारंपारिक पद्धतीनुसार पाहिले तर सृजनाची निर्मिती करणाऱ्या मातीची व धान्याची पूजा नवरात्र प्रारंभी सुरू होते. एका घटात माती घालून त्यावर कलश ठेवला जातो.त्यांवर आंब्याची पाने घालून कलशावर नारळ ठेवला जातो. घटाच्या बाजूने घातलेल्या मातीत सप्त धान्याचे बी टाकले जाते. रोज नऊ दिवस पाण्याचे सिंचन होऊन तेथील बी रुजून रोपे तयार होतात यालाच आपण घट बसवणे असे म्हणतो मातीच्या घटातून येणारी ही छोटी रूपे माणसाला सृजनाची ताकद दाखवतात! ही आदीशक्ती असते.
याचकाळात सरस्वतीची पूजा केली जाते. लहान मुलांच्या अभ्यासाचा श्री गणेशा पाटी पूजनाने केला जातो. सरस्वती ही विद्येची देवता आहे. तिचे पूजन करणे हा संस्कार लहान मुलांना दिला जातो. तिची पूजा म्हणजे आपल्या बुद्धीचे तेज वाढवण्यासाठी केलेली प्रार्थना आहे. तू शक्ती दे.. तू बुद्धि दे…असे म्हणून सरस्वती पूजन होते.
तिसरे रूप म्हणजे महांकाली! अन्यायाचे पारिपत्य करण्यासाठी देवीने घेतलेले हे दुर्गा रूप! यात देवी सिंहावर बसून, हातात आयुधे घेऊन आक्रमक स्वरूपात येते! आत्ताच्या काळात अन्यायी वृत्तीला प्रतिकार करण्यासाठी स्त्रीने सबल होणे गरजेचे आहे. त्यासाठी ही महाकाली ची पूजा आहे..
या सर्व देवी रुपांना नमन करण्याचा काळ म्हणजे नवरात्र! या नवरात्राला शारदीय नवरात्र हे सांस्कृतिक नाव साहित्य उपासकांसाठी महत्त्वाचे आहे. लेखक, कवी यांच्याकडून जे लिहिले जाते, तीही एक सृजन शक्तीच आहे. तिचा आदर करणे, वंदन करणे यासाठी शारदीय नवरात्रात साहित्यिकांकडून, संस्थांकडून वेगवेगळे उपक्रम जाहीर होतात. चांगल्या वक्त्यांची भाषणे ऐकायची संधी या नऊ दिवसात मिळते. नवीन विचारांची मनात पेरणी होऊन नवीन लिखाणाला स्फूर्ती देणारा हा काळ! त्यामुळे आपल्याला बुद्धिवैभव देणाऱ्या सरस्वतीचे पूजन या काळातच होते. ज्याप्रमाणे पावसाची नक्षत्रे सृजनाची निर्मिती करतात, स्त्रीमध्ये बालकाची गर्भातील वाढ नऊ महिने, नऊ दिवस असते, तो हा नऊ अंक आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आदिशक्तीच्या कृपेमुळेच ही नवनिर्मिती होते. भारतात विविध प्रांतात नवरात्र पूजा वेगवेगळ्या नावांनी केली जाते. जसे गुजरातेत देवीसमोर गरबा खेळला जातो, बंगालमध्ये काली माता उत्सव होतो, उत्तर भारतात दुर्गापूजन होते, तर महाराष्ट्रात देवीची साडेतीन पीठे तसेच इतरही सर्व ठिकाणी महालक्ष्मी पूजन होते.
सांस्कृतिक, पारंपारिक आणि ऋतुमानानुसार देवीचा नवरात्र उत्सव आपण साजरा करतो. आपल्या माता, भगिनी आणि कन्या या देवी स्वरूप मानून त्यांचा आदर करावा ही शिकवण या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्वांना मिळावी हीच या शारदीय नवरात्राच्या पहिल्या दिवशी मी देवीची प्रार्थना करते!
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈