सौ ज्योती विलास जोशी
विविधा
☆ श्वानपुराण….. ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆
बालवाडीतल्या माझ्या भावाची फी द्यायची म्हणून शिशु वर्गाची पायरी चढले,आणि पायरीवर पायरीगत दिसणाऱ्या कुत्र्यावर माझा पाय पडला.लगेच ‘सॉरी’ म्हटलं मी त्याला पण कुत्रचं ते… ‘जशास तसे’ या उक्तीनुसार ते चावलं मला अन् मी केकाटले. माझी जीवघेणी किंकाळी ऐकून शिरोळे गुरुजी धोतराचा सोगा सावरत बाहेर आले.मला एक जोरदार शिवी हासडून म्हणाले,” तू त्याच्यावरचं कशाला पाय ठेवलीस? पायरी नव्हती तुला पाय ठेवायला?त्याच्या का नादी लागलीस? गप पडलं होतं ना ते?” गुरुजी कुत्र्याची वकिली करत होते. कुत्र्याची खोडी काढायला, त्याचा नाद करायला मी निर्बुद्ध का आहे? पण गुरुजींच्या नादी कोण लागणार?माझ्या हातातले फीचे पैसे काढून घेऊन,”चल हेड बाईकडं..असं म्हणून माझा रट्टा धरून शिरोळे गुरुजींनी मला हेड बाईच्या पुढ्यात उभं केलं. हेडबाईच्या सांगण्यावरून त्यांनी मला माझ्या घरी पोहोचवलं.
कुत्रा चावल्यानं सरकारी हॉस्पिटल मध्ये माझ्या पोटांनं चौदा दिवस इंजेक्शनचा त्रास सोसला. मला कुत्रा चावल्याची बातमी पेपरमध्ये कदाचित येईल या आशेवर मी होते आणि पेपर चाळत होते.”अगं कुत्रा तुला चावला तर ती बातमी होऊ शकत नाही. याउलट तू कुत्र्याला चावली असतीस तर ती बातमी झाली असती” असं बाबा म्हटल्याचं आठवतं मला.
कुत्रा हा बातमीचा विषय नसून जिव्हाळ्याचा विषय आहे.हे माझ्या लक्षात आलं पण जेव्हापासून तो मला चावला तेव्हापासून कुत्र म्हटलं की मी नखशिखांत हादरते.तो माझा वीक पॉइंट झाला आहे. लहानपणी ‘हाथी मेरे साथी’ दोन-चारदा पाहिला…..प्रत्येक वेळी नव्याने पाहतो असा पाहिला…. प्रत्येक वेळी तेवढ्याच संवेदनशीलतेने रडून थिएटर डोक्यावर ही घेतलं.माझं मुसूमुसू रडं पाहून इतरेजन खुसूखुसू हसायचे, पण….. कुत्र्याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘तेरी मेहरबानियाॅ’ या सिनेमाच्या पोस्टरकडेसुद्धा ढुंकून बघायची माझी इच्छा नसायची. इतका तिटकारा मला त्या कुत्र्याच्या चेहऱ्याचा….
स्वामीनिष्ठ, इमानदार अशा विशेषणांनी सुशोभित आणि रतन टाटा, बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज अशा प्रतिथयश लोकांच्या कुत्र्यावरील प्रेमाने प्रसिद्ध आलेल्या या जातीचा मला कधीकधी हेवा वाटतो. रतन टाटांनी गोव्याहून आणलेल्या ‘गोवा’ नावाच्या आपल्या कुत्र्याला आपल्या ग्लोबल हेडक्वारटर मधील म्हणजेच बॉम्बे हाऊस मधील खास जागेत ठेवलं आहे. शिवाजी महाराजांचा ‘वाघ्या’ तर सगळ्या मराठी माणसात प्रसिद्ध !! बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘टाॅबी’ कुत्रा सर्वश्रुत आहे.अमेरिकेतील एका शहरात एका मालकाने आपल्या मृत्यूनंतरची छत्तीस कोटीची प्रॉपर्टी ‘लुलू’नावाच्या त्याच्या कुत्र्याच्या नावे केली आहे. अहोभाग्य त्या कुत्र्यांचं !!!
कुत्र्यांच्या नावावरून एक गंमत अशी की आमच्या वाड्याच्या मालकिणीनं स्वतःच्या कुत्र्याचं नाव ‘पुराणिक’ठेवलं होतं. मी त्यावेळेस सात आठ वर्षाची असेन….मला आठवतंय मी बाबांना कळकळीनं असं सांगितलं होतं की माझं लग्न ‘पुराणिक’ आडनावाच्या माणसाची होता कामा नये.बाबांना फार उशिरा माझ्या त्या कळकळीच्या विनंतीचं प्रयोजन समजलं होतं…..
प्रेम म्हणजे प्रेम असतं,ते कुणी कुणावर करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. कुत्र्याबद्दलची माझी भूमिका स्वच्छ आहे.माझं त्याच्याशी वैर नाही पण त्याच्याविषयी प्रेम बिलकुल नाही. एकदा एका
मैत्रिणीकडे गेले होते. कसं कोणास ठाऊक पण ‘कुत्र्यापासून सावध राहा’ या पाटीकडं माझं लक्ष गेलं नाही. तिच्या घराची पायरी चढणार तो पुनश्च पायरीवर एक पायरीच्याच रंगाचं कुत्र झोपलेलं….. इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी अर्थातच मी घेतली.तिला खालूनच फोन केला. “अगं काही करत नाही ते.” प्रत्यक्ष भगवंताला देखील इतक्या गॅरंटीनं सांगता येणार नाही तसं तिनं सांगितलं. “ओलांडून ये त्याला”( तो कोणावरच भुंकत नाही कोणालाच काही करत नाही. तर मग पाळलासंच का बिचारे ?असा प्रश्न मनांत आल्यावाचून राहिला नाही.) घाबरलेल्या भेदरलेल्या अवस्थेत मी त्याला ओलांडायला गेले आणि माझा पाय त्याच्यावर पडलाच. सिंहाच्या पिंजऱ्यात लाईट गेलेल्या रिंगमास्टरची काय अवस्था होईल तशी माझी झाली. इतक्यात मैत्रीण खाली आली. “किती घाबरतेस ग ?काही केलं का त्यांनं तुला?भुंकला देखील नाही गं तो!!”असं म्हणून तिने त्याला कडेवर घेतलं.”कम हनी, कम टू मम्मा” असं मातृप्रेम दाखवणाऱ्या तीच श्वानप्रेम बघून मी धन्य झाले, पण अप्रूप अजिबात वाटलं नाही त्या गोष्टीचं….
सकाळी फिरायला जाताना टापू टापूत बसलेली भटकी कुत्री आता माझ्या ओळखीची झाली आहेत. अर्थात असा हा माझा दावा…. माहित नाही कधी घेतील ती माझा चावा…. मालकाचं गळ्यात पट्टा बांधलेलं कुत्र दिसलं की संघटितपणे जोरजोरात त्याच्यावर ती भुंकायला लागतात. अगदी थेट ते टापूतून बाहेर पडेपर्यंत… वाघासारखं दिसणारं ते मालकाच्या संरक्षणाखाली ऐटीत चालत असतं. मालकाला जणु ते सांगत असतं आत्ता मला तू संभाळ. नंतर तुझं रक्षण करायची जबाबदारी माझी….तसा त्या दोघांत एक अलिखित करार असावा बहुदा…चार आण्याचा जीव असलेली ती भटकी कुत्री पण त्यांचा आवाज एखाद्या डॉल्बी लाऊड स्पीकर सारखा! आसमंत हादरवून टाकणारा!गांधीजीं सारख्या अहिंसावादी माणसानं भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर घेतला होता त्या बापूजींना माझे प्रणाम…..
रस्त्यावरच्या सार्वजनिक वाचन केंद्रावरची दोन कुत्री कुठलंही वाहन आली की त्या वाहनाच्या वेगानं फर्लांग भर पळत जातात आणि माघारी येतात. हे मी रोज पाहते. एक दिवस न राहून मी त्याच्या प्रमुखांना म्हटलं,”अहो यांना बांधून ठेवा की! उगा आपलं वाहनांच्या मागे पळत सुटतात.”त्यावर ते म्हणाले.”असुद्या मॉर्निंग रनिंग करतात !एरवी लडदूछाप आहेत. खाऊन खाऊन माजलीत दोघं.पहुडलेलीच असतात दिवसभर…. कोणावर भुंकत नाहीत. एन्जॉय करतात लाइफ झालं”….
जेव्हा मी ह्यांची अर्धागीनी झाले तेव्हा मात्र कुत्रं पाळणं हा माझ्या अस्तित्वाचा प्रश्न बनला. याचं कारण हे ‘श्वानप्रेमी’ आणि कुत्रा हा माझा वीक पॉइंट… अर्थात लग्नानंतर इतके चांगले विषय आम्हा दोघात होते की कुत्र्यासारखा विषय संभाषणात कधी आलाच नाही. त्यामुळं मला कुत्र्या विषयी इतका आकस आहे हे त्यांना ठाऊक नव्हत. तीन महिन्याची ओली बाळंतीण मी जेव्हा परतले त्यावेळी ह्यांनी माझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट म्हणून घरी आणलेलं छोटासं कुत्र्याचं पिल्लू मला दाखवलं. मला ह्यांनी दोन बाळाची आई करून टाकलं होतं. पण मला मंजूर असायला हवं होतं ना ते?
मी अजूनही काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. ह्या गोष्टीचे त्यांनाही आश्चर्य वाटत होतं. दोन्ही पिल्लं अखंड कुई कुई करत होती. त्यात भरीस भर म्हणजे मालकिणीचं कुत्रं! एरवी ‘आओ जाओ घर तुम्हारा’ म्हणणारं ते आज आपल्या टापूत आलेल्या या नवख्या कुत्र्यावर अखंड भुंकत होतं. मालकीण यथावकाश खाली आली. माझं बाळ तिच्या हातात होतं ती म्हणाली,”आजच आलाय.आमचं कुत्र भुकायचं थांबणार नाही तेव्हा तुमच्या कुत्र्याला आजची रात्र घरातच बांधा. उद्या काहीतरी व्यवस्था करू” ……
दोन्ही पिल्लानी रात्र जागवली हे सांगायला नकोच. त्या दोघांकडे पाहात मी यांना माझं सगळं श्वासनपुराण सांगितलं आणि पहाटे पहाटे मी यांच्याकडून मला हवं असलेलं ते एक वचन घेतलं. वचन देता देता, ‘जे लोक कुत्रं पाळतात त्यांच्या घरी लक्ष्मी येते’असंही माझं समुपदेशन झालं, पण मला ‘लक्ष्मी’ नको होती, ‘शांती’ हवी होती. स्त्रीहट्ट कुणाला सुटलाय ?….सकाळ सकाळी कुत्र्याच्या पिल्लाची गावाकडं रवानगी झाली.. आणि माझं पिल्लू शांत झोपू लागलं.
भविष्यात पुन्हा या गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मी ह्यांना निक्षून सांगितलं,” एका म्यानात दोन तलवारी कधीच बसत नाही.ज्या दिवशी कुत्रं या घरात येईल त्या दिवशी मी बाहेर पडलेली असेन…..” अजून तरी तशी वेळ आलेली नाही.
सध्या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. या करोना काळात कधीतरी कुत्र्याचं रडणं अपशकुनाचा संकेत देतं, तेव्हा हे म्हणतात…
“अगं ,आम्ही जसे कुत्र्याचे शौकीन तसेच कुत्र्यांनाही आमची सवय… आताशा आम्ही त्यांना फारसे दिसत नाही आहोत ना रस्त्यावर म्हणून ती कावरीबावरी होऊन रडतात…..”
ते काही असो. कुत्र्याला ‘श्वान’ किंवा ‘सारमेय’ म्हणावं असं मला कधी वाटत नाही .कुत्रं समोर आलं की या जन्मी तरी हाssssड ……
हेच शब्द ओठी……
© सौ ज्योती विलास जोशी
इचलकरंजी
मो 9822553857
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈