सौ. सुचित्रा पवार
☆ शेकोटी… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆
वातावरणाच्या हेराफेरीत हल्ली कधीपण पाऊस पडतो.सध्या हवेत इतकी उष्णता आहे की हा थंडीचा महिना आहे का ?असा प्रश्न निर्माण झालाय.हाही ग्लोबल वॉर्मिंगचा प्रसाद.या श्रुष्टीचे काय होणार ? ते श्रुष्टी निर्मात्यालाच माहीत!
सहजच मला आमच्या लहानपणीचे थंडीचे दिवस आठवले.ऑक्टोबरपासूनच थंडीची चाहूल लागायची.दिवाळीत कडाक्याची थंडी पडायची.सर्वत्र दाट धुके पडायला सुरुवात व्हायची.शेत शिवार धुक्यात नहायचे.झाडांच्या पानावरून दवाचे थेंब टपकायचे.हातापायाला भेगा पडायच्या.ओठ फुटून रक्त यायचे,गालाची त्वचा फुटून खरबरीत काळे मिट्ट दिसायचे गाल.कोल्ड क्रीम वगैरे तसले काही प्रकार नसायचे,डोक्याला तेल लावताना तोच तेलाचा हात चेहऱ्यावर,हातावर,पायावर दररोज फिरवायचा.जाड जाड वाकळा अंगावर घेतल्या तरी झोपेत थोडीशी जरी हालचाल झाली की थंडी पांघरुणात शिरायची म्हणून उठल्या उठल्या पहिल्यांदा चुलीपुढं जाऊन बसायचं.
दिवाळीच्या अंघोळीला तर पहाटे उठूच वाटायचे नाही.तेल लावून कडक पाण्याचा तांब्या अंगावर ओतेपर्यंत अंग काकडून जायचे.अंघोळ केली की चुलीपुढं ऊबीला बसायचं थोडं फटफटायला लागलं की मग फटाके उडवायला अंगणात जायचं.
शेतकरी पीक राखणीला शेतात जायचे.जागोजागी मग शेकोट्या पेटायच्या.अंगणात,रस्त्याच्या कडेला,शेतात आसपासचे चार पाच शेतकरी मिळून शेकोट्या करायचे आणि गप्पा मारत शेकोटीभोवती बसायचे.शेतात चगळाची कमी नसायची त्यामुळं शेकोटीच्या ज्वाला कमरेइतक्या ,डोक्याइतक्या उंच उंच जायच्या.रात्रभर असे आळीपाळीने जागून पहाटे पहाटे झोप घ्यायची,दिवस उगवला की घरला यायचे.
आम्हीही वाकळेतून उठून पहिले चुलीपुढं बसायला जागा धरायचो.चुलीपुढं गर्दी होऊ लागली की तिथून उठून अंगणात येऊन शेकोटी पेटवायचो.पूर्वी प्रत्येकाच्या परसात उकिरडा असायचा,त्यामुळं चगळाची कमतरता नसायची पण जो पण शेकोटीला येईल त्याने स्वतःचा चगाळ आणायचाच नाहीतर शेकोटीपासून हकलपट्टी व्हायची त्यामुळं नियम पाळलाच जायचा.चगाळ,पालापाचोळा ,चिपाड एखादं शेणकूट बारकी वाळलेली झुडुपे आमच्या शेकोटीला काही चालायचे.शेकोटी जसजशी रसरसायची तसा गप्पांचा फड रंगायचा.कधी कविता कधी पाढे ,नकला तर कधी सिनेमातली गाणी! प्रत्येकाची काहीतरी विशेषता असायचीच. बरेचदा गाण्यापेक्षा विडंबनच जास्त असायचे.
त्या त्या वेळच्या फेमस गाण्यात आपलं कायतर घुसडून जोडायच न त्याचं विडंबन करायचं.
मेहबुबा मेहबुबा या गाण्यावर त्यावेळी वात्रट पोरांनी केलेलं खट्याळ विडम्बन असायचं-
मेहबुबा मेहबुबा
छ्ड्डीत शिरला नागोबा..आणि अशीच गाण्यांची, कवितांची विडंबन…
हातापायाला ऊब मिळेपर्यंत पाठ गार पडायची. मग शेकोटीकडे पाठ करून बसायचे.बऱ्याचदा तोंडाने फुंकर मारून जाळ पेटवताना एकदम ज्वाला भडकायची आणि पुढील केसांना हाय लागून तिथले केस प्लास्टिक जळल्यासारखे गोळा व्हायचे.दाताला तिथंच बसून राखुंडी लावायची ,ऊबीपासून दूर जावेच वाटायचं नाही .पाठीवर उन्ह येईपर्यंत शेकोटीची ऊब अंगावर घेत राहायचो.कधी शेंगा तर कधी हरभऱ्याचे ओले किंवा सुकलेले डहाळे विझत आलेल्या शेकोटीच्या आरात टाकायचे आणि भाजल्यावर राखेतून शोधून खायचो,ओठ,बोटे,गाल काळेमिट्ट व्हायचे पण ते आम्हाला महत्वाचे नव्हते, भाजलेला हावळा खाण्याचा आनंद अभाळाएव्हढा मोठ्ठा होता.
लहान मुलांच्या शेकोटीला मोठी माणसे कधी येत नसत,चुकून आलेच कुणीतरी आम्हाला खूप आनंद व्हायचा.किती मजेशीर आणि आनंदी होते जीवन! कुठली घाई नाही की जीवघेणी स्पर्धा नाही की कोणता ताण नाही! उन्ह चढू लागतील तसतशी एक एक मेंबर शेकोटीपासून काढता पाय घ्यायचे.कुणाला मधूनच हाक आल्यावर घरी जावे लागायचे.शेवटी जो थांबेल त्याने गरम राखेवर पाणी ओतायचे अन्यथा आसपासचा उकिरडा किंवा गंजी पेटण्याचा धोका असायचा म्हणून शेवटच्या सदस्याने पाणी ओतायचे किंवा माती टाकायची.
घरातले मोठे शेताभातात जायचे,म्हातारे कोतारे घर राखायला अन आम्ही शाळेला.शेकोटीची राख मात्र आम्ही पुन्हा यायची वाट पहात तिथेच बसायची.
आजही आम्ही तिथेच शेकोटीपुढं आहोत आणि शेकोटीच्या उबेत आहोत असे वाटतेय. काय नव्हतं त्या ऊबीत?सवंगड्यांचे अतूट स्नेहबंध,आसपासच्या शेजाऱ्यांची आपुलकी,मोठ्यांचा धाक,मुक्त ,निष्पाप ,समृद्ध बाल्य,अवतीभवतीचा संपन्न निसर्ग आणि बरेच काही जे काळाबरोबर वाहून गेलं.आमच्या मोकळ्या वेळेवर फक्त आमचाच अधिकार होता.
आज निसर्गचक्र बिघडलेय माणसाच्या चुकीमुळेच.शेकोटीच्या उबीची मजा अनुभवयाला ना हवामान तसे राहिले न माणसे!दिवस उगवायच्या आधीच मुलांना गरम पाण्यात बुचकळून स्कूल बसमध्ये बसावे लागते आणि बसच्या चाकाच्या गतीतच बाल्य सम्पते.कुठे असतो वेळ स्वतःच्या मनाप्रमाणे घालवायला किंवा निसर्गातील गमतीजमती अनुभवयाला?आणि ते न अनुभवल्यामुळेच निसर्गाची ओढ अन प्रेमही उत्पन्न होत नाहीय.
भिंतीतल्या शाळेसाठी भिंतीबाहेरची शाळा भिंतीबाहेरच रहाते.
© सौ.सुचित्रा पवार
तासगाव, सांगली
8055690240
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈