☆ विविधा ☆ शशीबिंब उतरले धरेवरी ☆ सौ. उज्वला सहस्त्रबुद्धे

शारदीय नवरात्रानंतर  येणारी ही शरद ऋतूतील पौर्णिमा ही सर्व पौर्णिमांचा जणू हिरेजडित मुकुट आहे! पावसाचे चार महिने संपल्यानंतर शरदाचे सुखद चांदणे आणि पूर्ण चंद्रासह ही पौर्णिमा येते तेव्हा सर्वांच्याच मनात नवचैतन्याचे वारे वाहू लागतात. पौर्णिमेचा चंद्र बघता बघताच मनातले की तसं तर प्रत्येक मराठी महिन्यात येणारी पौर्णिमा ही नवीन काहीतरी घेऊन येते आणि असा विचार मनात येताच माझे मन चैत्री पौर्णिमे कडे वळले.

चैत्र महिन्यात येणारी पौर्णिमा हा हनुमंताचा जन्मदिन आहे. बुद्धीमंत, शक्तिमान असा मारुती चैत्री पौर्णिमेला उगवत्या सूर्या बरोबरच जन्म घेतो आणि आपल्याला शक्तीची उपासना करण्यात प्रवृत्त करतो. चैत्रा नंतर वैशाखात सूर्याचे तापमान वाढू लागते आणि उन्हाचा चटका बसू लागतो. अशावेळी येणारी वैशाखी पौर्णिमा उत्तरेत पंजाब, दिल्ली या सारख्या भागात बैसाखी म्हणून साजरी होते. निसर्गात मिळणारी लिंबू ,कलिंगड, खरबूज यासारखी फळे व त्यांचे रस इथे मुबलक प्रमाणात वापरतात.

त्यानंतर येणारी ज्येष्ठ पौर्णिमा आपल्याला निसर्गाकडे नेते. पावसाची सुरुवात होऊन सृष्टी हिरवीगार होण्याचा हा काळ! या दिवशी स्त्रियांच्या वडपोर्णिमा व्रताचे नाते आपल्याला निसर्गाशी एकरूप होण्यास शिकवते !

आषाढी पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. आई ,गुरुजन, ग्रंथ असो वा निसर्ग आपल्या गुरुस्थानी असणाऱ्या प्रत्येका प्रती आपला कृतज्ञ भाव व्यक्त करणारी ही आषाढातील पौर्णिमा! कधीकधी चंद्राचे दर्शनही होत नाही या पौर्णिमेला! तरीही ही पौर्णिमा आपल्या मनाला एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जाते.

श्रावणात येणार्या नारळी पौर्णिमेपासून पाऊस हळूहळू कमी होऊ लागतो. खवळलेला समुद्र शांत होऊन समुद्रावर कोळी लोकांना आपले व्यवहार करता यावे ,यासाठी समुद्राला नारळ अर्पण करून आपण आपली कृतज्ञता व्यक्त करतो!

भाद्रपदात येणारे गौरी गणपतीचे सण साजरे करून येणारी भाद्रपद पौर्णिमा ही पुढे महालया चे दिवस सुरु करते.आपल्या पूर्वजांचे स्मरण या काळात केले जाते.

या काळात पाऊस कमी होऊन पिके, भाजीपाला याची नवनिर्मिती दिसू लागते.

अश्विन महिन्यातील कोजागिरी पौर्णिमा ही सर्व पौर्णिमांचा मुकुट मणी वाटतो मला! पाऊस संपल्याने सारी सृष्टी हिरवेगार झालेली! दिवाळीसारखा सण तोंडावर आल्याने सगळीकडे उत्साह भरलेला! आकाश निरभ्र होऊन चांदण्यांनी भरलेले तर त्यांचा सखा चंद्र,त्याच्या   शांत, स्निग्ध प्रकाशाने सृष्टीला सौख्य देणारा! या दिवशी चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखवून आपण जागरण करतो. या पौर्णिमेला नवान्न पौर्णिमा असेही म्हणतात. कारण नवीन भात आले असल्याने पौर्णिमेला खिरीचा नैवेद्य केला जातो.

कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरी पौर्णिमा! संध्याकाळच्या शांत वातावरणात त्रिपुर लावून त्याची शोभा पहाण्याचा आनंद वेगळाच! त्रिपुरासुराचा वध केला तो हा दिवस म्हणून त्रिपुरी पौर्णिमेचे महत्व!

आल्हाददायक वातावरणात येणारी मार्गशीर्ष  पौर्णिमा! या पौर्णिमेचा चंद्र आकाराने थोडा मोठाच वाटतो. हळूहळू दिवस मोठा होत जाणार आणि रात्र लहान याची जाणीव करून देणारा! सर्व सृष्टीचे तारणहार ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा दत्तावतार मार्गशीर्ष पौर्णिमेला होतो.

माघी   पौर्णिमेचे  वैशिष्ट्य जाणवते ते माघ स्नानात! या काळात, तीर्थक्षेत्री नद्यांच्या काठी मोठे मोठे मेळे भरतात आणि लोक पवित्र नदी स्नानाचा आनंद घेतात!

अशा तऱ्हेने वर्ष संपत येते आणि फाल्गुन पौर्णिमा येते.  सर्व वाईट गोष्टींचे अग्नि समर्पण करून चांगल्याचा उदय व्हावा म्हणून होळी पेटवली जाते!

यानंतर आपण पुन्हा नवीन वर्षाचे स्वागत करायला सज्ज होतो.

हिंदू संस्कृतीत निसर्गातील पंचमहाभूतांचा संबंध आपण सणांशी जोडला आहे. पृथ्वी ,आप, तेज, वायु ,.आकाश या सर्वांशी निगडीत असे आपले सण वार आहेत. पौर्णिमा हे भरतीचे प्रतीक आहे.कोणताही आनंद हा पौर्णिमेच्या चंद्रासारखा भरभरून घेता आला पाहिजे! भरतीनंतर ओहोटी हा निसर्ग नियमच आहे. जसे पौर्णिमेनंतर पंधरा दिवसांनी येणारी अमावस्या! अमावस्या नंतर दुसऱ्याच दिवसापासून कलेकलेने चंद्रकला वाढताना आपल्याला दिसते. मनावर आलेली अमावस्येची काजळी दूर होत होत होत पौर्णिमे कडे वाटचाल चालू होते. आपलं जीवन हे असंच असतं!सुखदुःखाच्या चंद्रकला नी व्यापलेले! कधी दुःखाचे क्षण येतात पण त्यांची तीव्रता काळाबरोबर कमी कमी होत जाते आणि सुखाची पौर्णिमा दिसू लागते. पण कायमच पौर्णिमा राहिली तर तिचे काय महत्त्व! तसेच पूर्णत्व हेही कायमचे नसते!’ पूर्णत्वाच्या पलीकडे नष्टत्त्वाचे  उभे कडे’ अशी एक उक्ती आहे. त्याप्रमाणे सुखदुःखाची भरती ओहोटी आयुष्यात येत राहते. पुर्ण चंद्राचे या भरती ओहोटीशी कायमचे नाते असते. असा हा पूर्ण चंद्र प्रत्येक पौर्णिमेला आपण बघतो पण निसर्गाच्या अत्युत्तम अविष्काराचा दिवस कोजागिरी ला आपण पहातो.या दिवशी चंद्रप्रकाशात आटीव दुधाचा नैवेद्य दाखवून दुधाचा आस्वाद घ्यावा.आणि चांदणी रात्र आपण आनंदात घालवू या असाच विचार कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने मनात आला!

© सौ. उज्वला सहस्त्रबुद्धे

मो.नं . 8087974168

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments