श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ संस्कारात् द्विज उच्यते… ☆ श्री अरविंद लिमये ☆

सर्वसाधारणपणे मानवेतर प्राणी नैसर्गिक प्रेरणेनुसारच प्रत्येक कृती करीत असतात. मानवाला बुद्धीची देणगी असल्याने त्याने मात्र बुद्धीचा योग्य उपयोग करून कोणतीही कृती करणे अपेक्षित असते. त्याची प्रत्येक कृती सर्वांगीण विचार करुन,तिची योग्यायोग्यता विचारात घेऊन कशी आणि कां करायची याचे महत्त्व संस्कारच नकळत मनात रुजवत असतात. ही रुजवण संस्कारक्षम वयातच खोलवर होऊ शकते.म्हणूनच लहानपणापासूनच कौटुंबिक पातळीवर पालकांनी आणि शालेयस्तरावर शिक्षकांनी मुलांच्या मनोभूमीवर संस्कार बीजांची पेरणी करणं आवश्यक ठरतं. या संस्कारांची गुणात्मकता संस्कारांइतकीच ते कसे केले जातात यावरही अवलंबून असते. लहान वयात मुलांनी एखाद्या  गोष्टीचा हट्ट केला तर त्याला पटकन् होकार किंवा नकार न देणे ही संस्कारांच्या रुजवणीतील पहिली पायरी.कारण या दोन्हीही गोष्टींचा दीर्घकाळ टिकणारा नकारात्मक परिणाम हानिकारक ठरणारा असतो. त्याच्या मागणीप्रमाणे एखादी वस्तू देताना ती कशी वापरायची, कशी सांभाळायची, तिची कशी काळजी घ्यायची हे समजावून सांगणं जसं महत्त्वाचं तसंच ती वस्तू देणं त्याच्या हिताचं नसेल तर ते कां हे त्याला समजेल अशा पध्दतीने त्याला सांगणंही!तसेच ती वस्तू आवश्यक असूनही देता येणे शक्य नसेल तर त्याला त्याची कारणे त्याच्या कलाने समजावून सांगणेही अगत्याचेच.

मुलांना चांगल्या गोष्टींची सवय लावण्यासाठी त्यांना सतत उपदेशाचे डोस पाजत राहिलं तर ते त्याना कडवट औषधासारखेच वाटणार. ‘हे कर’, ‘ते करू नको’ याचा त्यांना आधी नावड मग कंटाळा या क्रमाने अखेर तिरस्कारच वाटू लागेल. ‘हे करायलाच हवं’ असं अट्टाहासाने सांगत राहिल्यास ते तोंडदेखलं तेवढ्यापुरतं करून एरवी ते करणं सातत्याने टाळण्याकडेच बालसुलभ कल रहाणं अपरिहार्यच असतं. म्हणूनच जे मुलांनी करावं अशी आपली अपेक्षा असते ते आपल्या कृतीने त्याला जाणवेल असे सहजपणे आपणही करीत रहाणे महत्त्वाचे ठरते. त्यांना गोडीगुलाबीने एकदा समजून सांगितले तरी आपल्या अनुकरणानेच तसे वागण्यास मुलेही आपसूकच उद्युक्त होतात. म्हणूनच मुलांना खरं बोलावं असं सांगतानाच मोठ्या माणसांनीही खोटं न बोलण्याचं पथ्य आवर्जून पाळायला हवं. लवकर उठणे, दोन्ही जेवणानंतर दात घासणे, जेवताना आनंदी वातावरण ठेवणे, झोपून न वाचणे, मोबाईल व टीव्हीचा अतिरेकी वापर न करणे,पाण्याचा अपव्यय टाळणे, कोणाचाही वावर नसणाऱ्या खोल्यातील लाईटस् वेळोवेळी बंद करणे यासारख्या गोष्टी उपदेशाने नव्हे तर मोठ्या माणसांनी स्वतःच अंगिकारलेल्या पाहूनच मुले सहज सुलभपणे त्या अंगी बाणवण्यास नकळत प्रवृत्त होतात.

संस्कार हे अट्टाहासाने करायचे नसतातच.ते सहजपणेच व्हायला हवेत. एखाद्या चांगल्या गोष्टीचे महत्त्व ती एकदा अंगवळणी पडली की समजतेच. नैसर्गिक उपलब्धीचा काटकसरीने वापर करण्याची सवय,कष्टाने पैसे मिळवता येईपर्यंत ते वाचवण्याची सवय, या गोष्टी स्वतः पैसे मिळवू लागल्यानंतरही बचतीला पूरकच ठरतात. नम्रतेने वागायची सवय कितीही राग आला तरी कुणापुढेही आवाजावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम बनवते, माणुसकीचा संस्कार ‘नाही रे’ वर्गातल्या गरीब मित्राबद्दल तिरस्कार किंवा घृणा निर्माण न करता त्याच्याशी आपुलकीने वागण्यास प्रवृत्त करते.. हे असे संस्कार म्हणजेच कालातीत अशा मूल्यांचे रोपणच.हे मूल्यसंस्कारच घरातील वातावरण निकोप, निरोगी,मनमोकळं ठेवतील.अशा वातावरणातले संस्कार मुलांवर लादले जाणार नाहीत तर ते त्यांच्या मनात आपसूक  झिरपत जातील.आणि तेच मुलांच्या शारीरिक आणि मानसिक सक्षमतेला पूरकही ठरतील. परस्परांमधील संवादातून, सहवासातून, स्वानुभवातून योग्य विचार करायला ती मुले स्वतःच प्रवृत्त होतील.

स्वतः खाताना दुसऱ्याला न देता खाणे ही प्रकृती, दुसऱ्याचे हिसकावून घेऊन खाणे ही विकृती, आणि आपल्या घासातला घास काढून तो दुसऱ्याला देणे ही संस्कृती. मुलांवर संस्कारक्षम वयात केलेले संस्कार त्याना विकृतीपासून दूर ठेवत सुसंस्कृत बनवतील ते या अर्थाने!

माणूस जन्मतः द्विपाद प्राणी म्हणूनच जन्माला येतो आणि उचित संस्कारातूनच त्याचा  दुसरा जन्म होतो तो ‘सांस्कृतिक जन्म’ या अर्थाने! द्विज म्हणजे ब्राम्हणच नव्हे तर असा दोनदा जन्म घेऊन सुसंस्कारित झालेला कुणीही. प्रत्येक धर्माचेच असे विविध संस्कार असतातच. ते महत्त्वाचे मानले तरीही त्यांना जेव्हा अवास्तव महत्त्व दिले जाते तेव्हा माणूस संस्कारीत न होता संस्कारबध्द होतो आणि त्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा संकोचच होतो.

‘जन्मना जायते शूद्र:

संस्कारात् द्विज उच्यतेl’

या श्लोकाचा व्यापक अर्थ घेतला तर  संस्कारांचे नेमके महत्त्व त्यातच लपलेले आहे हे लक्षात येईल. सखोल ज्ञान प्राप्त करणारा माणूस ज्ञानी,विद्वान म्हणता येईलही पण तो सुसंस्कारित नसेल तर मात्र फक्त शिक्षितच राहील. खऱ्या अर्थाने सुसंस्कारित असणारा माणूस मात्र ज्ञानी, विद्वान माणसाइतका शिक्षित नसला तरीही सत्प्रवृत्त आणि

सूज्ञ असेल आणि म्हणून तोच खऱ्या अर्थाने दोनदा जन्म घेणारा म्हणून ‘द्विज’ बनून संस्कारात् द्विज उच्यते’  या श्लोकाचा अर्थही पूर्णतः सार्थ करेल!!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments