सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ सार्क… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

वाचनक्षेत्र हे एक अथांग सागरासारखे अफलातून क्षेत्र आहे. ह्या वाचनातून आपल्याला कितीतरी विविध क्षेत्रातील माहिती मिळते,कधी ज्ञानात भर पडते,तर कधी भावनेला वाट मिळते, कधी खळखळून हसावसं वाटत तर कधी छान गंभीर विचारांच्या डोहात डुंबायला मिळतं. कधी कधी वाचल्यावर जाणवतं की हे खरंच छान लिहीलयं किंवा अरेच्चा आपल्याच मनातील शब्द तंतोतंत कागदावर उतरलेयं जणू.

हे वाचन करतांना काही गोष्टी आधी माहीत असलेल्या परंतु वेगळ्या शब्दांत मांडलेल्या असतात तर काहींच्या बाबतीत आपण संपूर्ण अनभिज्ञ होतो हे जाणवतं. असेच काही शब्द वाचनात येतात, हे शब्द फक्त आपण ऐकले असतात परंतु ह्याची माहिती म्हणाल तर शुन्य. मग कुतूहल जागं होतं आणि माहिती शोध मोहीम सुरू होते.काल असाच “सार्क संघटना” हा शब्द वाचनात आला.

कुठल्याही संघटना तयार होतांना त्या काहीतरी भरीव कामगिरी, चांगले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बनवितात.  अशीच एक संघटना म्हणजे सार्क संघटना ,जिच्या निर्मितीची तारीख होती 8 डिसेंबर 1985.

दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना (South Asian Association for Regional Cooperation  असं त्या संपूर्ण संघटनेचे नाव. त्या नावाचं संक्षिप्त रुप म्हणजे सार्क (SAARC); ही दक्षिण आशिया खंडातील  8 देशांची एक आर्थिक व राजकीय सहयोग संघटना आहे. अमेरिका व चीन खालोखाल सार्क सदस्य राष्ट्रांची एकत्रित अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर असून जगातील लोकसंख्येच्या 21 टक्के लोक सार्क क्षेत्रामध्ये राहतात. भारत हा सार्कमधील सर्वात बलाढ्य देश आहे हे उल्लेखनीय. 6 जानेवारी 2006 रोजी सार्क सदस्य राष्ट्रांनी प्रादेशिक व्यापाराला चालना देण्यासाठी दक्षिण आशियाई मुक्त व्यापार कराराची निर्मिती केली.

सार्क संघटनेची कल्पना 1950 मध्ये  मूळ धरू लागली. 1970 च्या सुमारास भारत, बांगलादेश,भूतान, मालदिव, पाकिस्तान,नेपाळ श्रीलंका आणि अफगाणिस्तान या देशांना एकत्रितपणे व्यापार व सहकार करण्याच्या दृष्टीने एका संस्थेची आवश्यकता भासल्याने ह्याची संकल्पना अस्तित्वात येण्याच्या दृष्टीने जोर धरु लागली. दक्षिण आशियामध्ये आर्थिक व सामाजिक प्रगती  करण्याच्या उद्देशाने तसेच सांस्कृतिक विकास व विकसनशील देशाबरोबर सहकार्य करण्यासाठी सार्क संघटना एकत्रित ऊभी राहिली.

लोकसंख्या, संसाधने, लष्करी सामथ्र्य, आर्थिक आणि तंत्रज्ञानात्मक विकास, भौगोलिक स्थान या सर्व बाबींचा ऊहापोह आणि उपाययोजना ह्याबद्दल ही संघटना कार्य करते.  सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक क्षेत्रांत परस्परांच्या सहकार्याची अपेक्षा ह्यामध्ये व्यक्त करण्यात आली. तसेच महिलांचे प्रश्न व त्यांच्या शिष्यवृत्त्या, अभ्यासवृत्त्या, आर्थिक सहकार्य, महिला आणि मुले यांच्या भवितव्याचा तसेच दहशतवाद व स्त्रियांचे लैंगिक शोषण यांच्याबद्दल ठोस तजवीज ह्यामध्ये केल्या जाते. 

खरंच अशा अनेक संघटना विविध कार्य करीत असतात पण आपल्याला त्याबद्दल फारच कमी माहिती असते हे ही खरे.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments