सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

☆ स्वप्न… ? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

स्वप्न नुसता शब्द जरी वाचला तरी कितीतरी विचार मनात रुंजी घालायला लागतात. कारण प्रत्येकाचे काही ना काही स्वप्न असतेच आणि ते कोणी बोलून दाखवले नाही तरी ते पूर्ण करण्यासाठी त्याची धडपड सुरू असते. 

स्वप्नांची सुरुवात जन्मल्यापासूनच होते. लहानपणी पाळण्यात बाळ झोपलेले असताना झोपेत बाळ गोड हसते किंवा झोपेतच दचकून एकदम रडायला लागते तेव्हा आजी किंवा घरातील मोठ्या व्यक्ती म्हणतात स्वप्न पाहिलं असेल. सटवाई बाळांना स्वप्न दाखवते. 

नंतर मुल जसजसे मोठमोठे होऊ लागते तसतशी त्याची स्वप्ने पण बदलत जातात. आणि शक्यतो बदललेली स्वप्ने ही त्या त्या काळानुरूप त्याला योग्य वाटतील अशी असतात आणि लहान वयातील स्वप्ने बहुतांशी पूर्ण झालेली असतात म्हणून मग त्या आत्मविश्वासाने मोठी स्वप्ने पाहिली जातात.

अब्दुलजी कलाम यांनी म्हटलय छोटी स्वप्ने पाहणे हा अपराध आहे. स्वप्ने मोठी पहा त्याचा पाठपुरावा करा आपोआप ती पूर्ण होतील.

या बाबत ते असेही म्हणतात की स्वप्ने अशी नसावीत की जी झोपेत पाहिली जातात स्वप्ने अशी असावीत की जी झोपूच देत नाहीत. 

साधारणपणे मुली ज्या असतात त्या बहुतांशी आपल्या सुखी संसाराचे असे एकच स्वप्न पहातात. त्यासाठी त्या झटत असतात. आणि अगदी १००% नाही तरी काही अंशी त्या त्यामधे यशस्वी होतात. पण मुलांची स्वप्ने मात्र वेगवेगळी असतात.

पण नेमके स्वप्न म्हणजे काय? तर स्वप्न म्हणजे ध्येय म्हणता येईल. जे गाठण्यासाठी ज्याची त्याची धडपड चालू असते. हीच गोष्ट त्याच्या जगण्याचे कारण बनते .लहानपणी आई वडिल किंवा मोठे सांगतात ते पूर्ण करणे आपली जबाबदारी आहे वाटून पाहिलेले स्वप्न नंतर महत्व पटल्यावर चांगला अभ्यास करण्याचे स्वप्न नंतर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चांगल्या नोकरीचे स्वप्न नंतर आपले संसार करण्याचे स्वप्न आणि मग संसारतील व्यक्तींना सुख देण्याचे स्वप्न या स्वप्नचक्रात माणूस अडकलेला असतो.

काहीजण कला जोपासण्याचे त्यात नाव कमावण्याचे स्वप्न पाहतात . किंवा काही जण वेगळे काही करून दाखवण्याच्या ईर्षेने पेटलेले दिसतात. 

पण म्हणून सगळ्यांनाच महत्व प्राप्त होत नाही. स्वप्ने जी इतरांपेक्षा वेगळी असतात त्यात इतरांचेही हित सामावलेले असते जे सोपे नसते हे सगळ्यांना माहित असते पण असे स्वप्न जेव्हा कोणी पाहतो आणि ते पूर्ण करतो तेव्हा त्याचे नाव झालेले आपण पाहतो.

तर अशी ही स्वप्ने. पण यातूनही स्वप्नाचा खरा अर्थ समजत नाहीच. आपल्याला आश्चर्य वाटेल  पण स्वप्नाचा आणि अध्यात्माचा जवळचा संबंध आहे. 

कसा? अध्यात्म सांगते मी पणा सोडा. सगळे चांगले होईल. तसेच हे स्वप्न••• स्व पणा नसलेल••• पहा एखादे स्वप्न पूर्ण करणारा स्वत:ची तहान भूक विसरून किंवा बाकीचे जग विसरून अर्जूनाच्या लक्ष्याप्रमाणे फक्त स्वप्नाच्या पाठीमागे असतात. यामधे कुठेही स्व पणा अर्थात मी पण पर्यायाने अहं नसतो म्हणून ते स्वप्न.

सगळ्यांची स्वप्ने ही मी पणाशी निगडीत असतात म्हणून त्याला महत्व प्राप्त होत नाही. पण मोठी स्वप्ने ज्यामधे इतरांचेही हित सामावलेले असते अशी स्वप्ने पाहणारी माणसे वेगळीच असतात त्यामुळे अशी स्वप्ने पाहणार्‍याचे नाव होते आणि त्याचे अप्रुप वाटू लागते.

म्हणूनच चला ‘मी’पणा सोडून देऊ. सर्व समावेशकतेचे स्वप्न पाहू आणि घर शहर देश नव्हे सर्व जग सुखी करण्याचे स्वप्न पाहू

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments