श्री उमेश सूर्यवंशी
विविधा
☆ स्वाभिमान…— ☆ श्री उमेश सूर्यवंशी ☆
स्वाभिमान …किती जणांना असतो ? तुम्ही म्हणाल ” स्वाभिमान तर प्रत्येक मनुष्याला असतोच “. तुमच्या म्हणण्यात खोट नाही परंतु त्यामध्ये यथार्थता नाही हे अधिक खरं आहे. बहुतांशी लोकांचा एक गोड गैरसमज असा असतो की ते स्वाभिमानी आहेत.या गोड गैरसमजात माणसे जगतात आणि मरतात देखील . पण स्वाभिमान या शब्दाची नेमकी जाणीव व त्याचा गाभा किती जणांना आकळलेला असतो ? कोण जाणे. स्वाभिमान हा शब्द मानवी जीवनात अगदी अलिकडे दाखल झाला असावा.याचे कारण असे की , मुख्यतः विज्ञानयुगानंतरच मनुष्याच्या वैयक्तिक व विश्वात्मक भावनांना काही एक निश्चित अशी चौकट उपलब्ध झाली आहे. तत्पूर्वी स्वाभिमान हा शब्द इतर वेगळ्या अर्थाने कार्यरत असावा. त्याच्या मध्ये सखोलतेची व व्यापकतेची त्रुटी असावी.
स्वाभिमान …शब्द उच्चारताना अंग किती मोहरून येते. आपण स्वाभिमानी बाण्याचे आहोत हा गोड गैरसमज बहुतांशी लोकांना सन्मान पुरवत असतो. पण या बहुतांशी लोकांनी स्वाभिमान या शब्दाची परीक्षा आपल्या जीवनात सखोलपणे अभ्यासलेलीच नसते हे कटू वास्तव आहे. स्वाभिमान या शब्दाचा शब्दशः अर्थ स्वतः विषयीचा अभिमान असा होईल. पण हा अर्थ या शब्दाला सखोलपण पुरवत नाही . स्वाभिमान या शब्दांत जोपर्यंत ” स्व जाणण्याची प्रक्रिया ” पार पडत नाही तोवर मनुष्याला स्वाभिमान कळणार नाही .हा ” स्व जाणण्याची प्रक्रिया ” अध्यात्मवादी धारणेची नसून ती वेगळ्या पण योग्य अर्थाची आहे. स्व जाणणे म्हणजे ज्या नैसर्गिक घडणीतून तुमची जडणघडण झाली आहे ती नैसर्गिक प्रक्रिया जाणून तिच्यानुसार प्रामाणिक वर्तन करणे होय. यामध्ये नक्कीच कालसुसंगत लवचिकता असतेच मात्र यामध्ये आशयाला धक्का पोचेल असे असत्य असू नये.मनुष्याच्या नैसर्गिक स्वभावाला मुरड घालून काही अन्य स्वार्थापोटी जेव्हा तो दुसरा एखादा मुखवटा चढवून समाजात वावरतो तेव्हा ” स्वाभिमान ” हा शब्द गळून पडलेला असतो. तुम्ही तुमच्या नैसर्गिक धाटणीशी प्रामाणिक राहून वर्तन करत असाल तर तुम्ही ” स्व ” जाणलेला आहे आणि त्या ” स्व ” चा योग्य अभिमान तुमच्या मनाच्या तळाशी आहे. हा तळ म्हणजेच तुमचा स्वाभिमान असतो. हा तळ ढवळावा लागतो आणि त्या मंथनातून बाहेर पडते तुमचे नैसर्गिक रुप. हे रुप जसेच्या तसे समाजात घेऊन वावरणे म्हणजेच स्वाभिमान जागृत ठेवणे असा होतो. हीच आहे स्वाभिमान शब्दाची जाणीव व यथार्थता …
बहुतांशी लोकांना वरवरचा व शाब्दिक अर्थच अपेक्षित असतो. शब्दाच्या तळाशी असणारे रंग त्यांना जाणवत नाहीत की पृष्ठभागावर तरंगणारे नैसर्गिक तवंग त्यांना दिसत नाहीत . त्यांना फक्त शब्दाच्या समुद्रात दिसतो आपला चेहरा .हा चेहरा फसवा असतो. कारण या चेहऱ्याने ” स्व ” जाणण्याची प्रक्रिया पार पाडलेली नसते. अशावेळी केवळ शब्दजंजाळात अडकून स्वाभिमान बाळगण्यात कोणतीही यथार्थता नाही . स्वाभिमान बाळगायचाच असेल तर पहिल्यांदा ” स्व जाणण्याची प्रक्रिया ” पार पाडा. नंतर त्या ” स्व ” चा मनापासून स्विकार करा. त्यानुसार तुमचे वर्तन करा…” स्वाभिमान ” तिथेच सापडेल.
© श्री उमेश सूर्यवंशी
मो 9922784065
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈