श्री सुनील देशपांडे
🔆 विविधा 🔆
☆ सर्व अंधश्रद्धांविरूद्ध लढणारा झुंजार योद्धा – जेम्स रँडी – भाग-२ – लेखक – डाॅ प्रदीप पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆
(त्याच्या या कामाची दखल घेऊन त्याला मॅक आर्थर फाउंडेशनचा प्रतिष्ठित पुरस्कार व फेलोशिप जरी मिळाली तरी त्याचे वेगवेगळ्या चाचण्या व प्रयोग करणे काही थांबले नाही. बायोरिदम या खूळाच्या त्याने मजेशीर चाचण्या घेतल्या. सेक्रेटरीचा चार्ट एका बाईस देऊन नोंदी ठेवायला सांगितल्या आणि त्या बाईने तो तिचा चार्ट समजून ऍक्युरेट नोंदीचा निर्वाळा दिला !!)
क्रमशः…
जेम्स रँडीने वैद्यकीय क्षेत्रातल्या ‘हम्बग्ज’चाही चांगलाच समाचार घेतला. ब्राझील-फिलिपिन्समधील स्वयंघोषीत डाॅक्टर आरिगो मुळे प्रसिद्ध पावलेल्या ‘सायकिक सर्जरी’ या प्रकारात कोणतेही शस्त्र न वापरता शस्त्रक्रिया केली जाते असा दावा होता… पण ती चलाखीची शस्त्रक्रिया ज्याला तो हस्तक्रिया असे म्हणायचा, ती कशी होती हे फिलिपिन्समध्ये जाऊन रँडी ने दाखविले. ऑपरेशनच्या वेळी अरिगो व त्याच्यासारख्या इतर अनेकांनी सायकिक सर्जरीचा दावा करणाऱ्या लोकांनी ऑपरेशन नंतर दाखविलेले रक्त व मांस हे बोकडाचे किंवा गाईचे असायचे हे रिपोर्ट सहित दाखविले.
व्हाईट हाऊस मध्ये बेटी फोर्ड या बाईं समोर अतींद्रिय शक्तीचे तथाकथित पण साधार प्रयोग दाखविणारा जेम्स रँडी हा एकमेव विज्ञानवादी होय.
कॉर्नेल, हॉर्वर्ड, एम.आय.टी, ऑक्सफर्ड, प्रिन्स्टन, येल अशा अनेक विद्यापीठात जेम्सने व्याख्याने दिली. चलाखी व विज्ञान यांच्यावर चर्चासत्रे घडवीत एक्सॉन रिसर्च लॅब पासून नासा, नॅशनल जिओग्राफिक सोसायटी पर्यंतच्या अनेक प्रतिष्ठित संस्थांमध्ये व्याख्याता म्हणून जाऊनही सामान्यातल्या सामान्य भोंदूच्या चाचण्या घेण्यास जेम्स रँडी कचरला नाही. तो या चाचण्या अतिशय हुशारीने, गूढ अतिंद्रिय दाव्यासाठी, वेगवेगळ्या तयार करीत असे.
कॅलिफोर्निया हुन आलेल्या विन्स वायबर्ग या पाणाड्याने ‘डाऊझिंग’ म्हणजे काठी घेऊन विशिष्ट पद्धतीने जमिनीतील अचूक पाणी दाखवण्याचा दावा केला तेव्हा त्याने जमिनीखाली पाण्याच्या पाईप टाकून काही मधून पाणी जाणारे पाईप्स शोधून काढण्याच्या तयार केलेल्या चाचणीची तर खूपच प्रशंसा झाली. विन्स अर्थातच दावा हरला. स्यू वॅलेस नावाची पिरॅमिड व चुंबक विकणारी तरुणी मानवी रोगांचे निदान मॅग्नेट थेरपीने करीत असे. रँडीने तिच्या दाव्यांची डबल ब्लाइंड, कंट्रोल टेस्ट घेऊन तिचा चुंबकोपचाराचा दावा फोल कसा आहे हे दाखवून दिले.
1978 मध्ये ‘सायकिक न्यूज’ नावाच्या मासिकाने जाहीर केले की बिंगो स्वान हा सर्व ग्रहांवर सूक्ष्म देह आधारानं जाऊन आला आहे व मरिनर 10 आणि पायोनियर 10 या कृत्रिम उपग्रहांनी गुरु ग्रहाची माहिती जी नंतर दिली ती स्वानने पूर्वीच दिली आहे, हे दावे जसेच्या तसे एडगर मिशेल या अंतराळवीराने मान्य केले आहेत,.. याही दाव्यांची खोलवर छाननी करून रँडीने त्याच्या दाव्यांची व वैज्ञानिक दाव्यांची तुलना केल्यावर आलेल्या निष्कर्षांची जी माहिती दिली आहे ती वैज्ञानिक चाचण्या कशा कराव्यात याचा सुरेख नमुना आहे.
रँडी चा प्रोजेक्ट अल्फा नावाचा अतिंद्रिय बुवा-महाराज-परामानसशास्त्री यांची परीक्षा घेणारा आराखडा खूपच गाजला आहे.
विसाव्या शतकातील असामान्य नास्तिक म्हणून ‘दि कमिटी फॉर द सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन ऑफ क्लेम्स ऑफ द पॅरानॉर्मल’ तर्फे वैज्ञानिक व नास्तिक विचारवंत यांची यादी करून निवड करण्यास सांगितली असता कार्ल सेगन, मार्टिन गार्डनर, पॉल कुर्टझ, रे हॅमन, अल्बर्ट आईन्स्टाईन, बर्ट्रांड रसेल, फिलीप क्लास, कार्ल पॉपर, रिचर्ड डॉकिन्स अशा दिग्गजांनाही मागे सारून जेम्स रँडी सर्वाधिक मते घेऊन प्रथम क्रमांकावर राहिला होता ते केवळ तो कार्यकर्त्यांच्या अभिनिवेशाने सर्वत्र आव्हाने देत राहिल्याने. प्रबोधनाला प्रत्यक्ष कृतीची जोड देणारा रँडी हा अंधश्रद्धांच्या विरोधी लढाई करणारा खरातर योद्धाच!
रँडीने लिहिलेल्या तेरा पुस्तकांपैकी एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत प्रसिद्ध लेखक आर्थर क्लार्क म्हणतो, ” रँडीची ही पुस्तके म्हणजे पुस्तक दुकानातून हजारोंचे मेंदू सडविणाऱ्या अवैज्ञानिक गोष्टींना योग्य मार्गावर घेऊन जाणारे दीपस्तंभ आहेत”
धर्माचा आधार घेऊन प्रचंड शोषण व फसवणूक चाललेल्या पीटर पॉपहॉफ सारख्या ख्रिस्तोपदेशकाचे बिंग फोडताना व्यथित झालेला रँडी म्हणतो…
‘मानवाचे शहाणपण, पैसा आणि कधीकधी जीवसुद्धा हिरावून घेणाऱ्या अवैज्ञानिक अतिंद्रिय गुढ गोष्टींची हकालपट्टी केली पाहिजे.’
यावर वॉशिंग्टन स्टार या दैनिकाने टीका करून हे सारे अस्तित्वात कुठे आहे असे विचारले. तेव्हा रँडीने फटकारले…..
“लिहिणाऱ्याने त्या गरीब पालकांचे चेहरे पाहिले नाहीयेत ज्यांची मुले गूढ संप्रदायामध्ये सामील होऊन वहावत गेली आहेत…त्याने अशी माणसे पाहिली नाहीत ज्यांनी शापाचा धसका घेऊन जीव घालविला… अशी स्त्री पाहिली नाही की ज्या स्त्रीने धर्म बैठकातुन प्रियकराचा धावा केला पण ती तेथेच लुटली गेली… महाशय जा त्या गयानात जेथे 950 मुडदे केवळ रेव्हरंड जिम जोन्स मुळे हेवन गेट कडे गेलेत…!! उकरून काढाल ते मुडदे?”
20 ऑक्टोबर 2020 ला रँडी विश्वात विलीन झालाय.
आतड्याच्या कॅन्सरशी झुंज देत 92 वर्षांपर्यंतच्या प्रवास करणे सोपे नसते..10 वर्षापूर्वी तो म्हणाला होता..” मृत्यू कधीतरी येणार आहेच. या पृथ्वीने मला प्राणवायू एवढी वर्षे पुरवलाय हेच खूप नाही का?….!”
डाॅ. प्रदीप पाटील
प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे
मो – 9657709640
email : [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈