सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ संकल्पाचा दिवस… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
खरंतरं नववर्षाच्या दिवसाचे वेध हे दोनतीन दिवसा आधीपासूनच लागतात आणि त्याची साग्रसंगीत तयारी सुद्धा करावी लागते.कारण हा दिवसच मुळी खूप महत्वाचा, आनंदाचा आणि मांगल्याचा.
चैत्र शुद्ध प्रतिपदा.गुढीपाडवा. हिंदू नववर्षाची सुरवात. वर्षाचा पहिलाच दिवस. येते वर्ष आपणा सगळ्यांना निरामय आरोग्याचे, सुखाचे आणि भरभराटीचे जावो हीच श्रीराम चरणी प्रार्थना.
आमच्याकडे खेड्यावर श्रीरामाचं नवरात्र असतं.गावी बापटांचं श्रीराममंदिर आहे.ह्या दिवशी सकाळपासूनच मंगलमय,प्रसन्न असं वातावरण असतं.अगदी भल्या पहाटे पाच वाजता रांगोळ्या रेखाटून, तोरणं लावून गुढीचे स्वागत करायला सगळा गाव सज्ज होतो.गुढी उभारणीचा मुहूर्त अगदी सुर्योदयाचा.गुढीला ल्यायला काठापदराचे नवीन वस्त्र, हार,बत्तासे गाठ्या,कडुलिंबाच्या डहाळ्या,आंब्याची पाने इ. नी गुढी सजवायची.त्यावर कलश पालथा घालून गुढी सजवून ती उंच उभारायची.
गुढी म्हणजे सौख्याचे,मांगल्याचे प्रतीक. खरचं असे सणवार आपण साग्रसंगीत घरी केलेत तरच हा वसा पुढील पिढीपर्यंत पोहोचेल.
आजकाल बहुतांश गावांमध्ये होणारा एक दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम” पाडवापहाट “बघण्यास जाण्याचा योग ह्या घरच्या पुजेमुळे येत नाही. कारण सगळ्यात जास्त आपल्या घरची गुढी उभारणं, तिचं व्यवस्थित पूजन करुन नैवेद्य दाखविणं. आणि हा चांगला वसा जर पुढील पिढीपर्यंत संक्रमित करायचा असेल तर आधी तो आपण जपून दाखविला पाहिजे.
मागे दोन वर्षांपासून कोरोनामुळे सगळे सामुहिक धार्मिक कार्यक्रम, एकत्रितपणे साजरे केल्या जाणारे सणसमारंभ ह्यावर जरा अंकुशच आला होता. आता जरा मोकळं झाल्यासारखं वाटतं.
आता गुढीपाडवा ,नववर्षाचा पहिला दिवस,निदान ह्या दिवसाची सुरवात अगदी स्वतःबद्दलची एकतरी खरीखुरी गोष्ट सांगुन करावी ह्या उद्देशाने सांगते गुढीपाडवा हा माझ्यासाठी आणखी एका कारणासाठी खूप महत्त्वाचा दिवस. असे कित्येक गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मी काही तरी स्वतःमध्ये चांगले बदल,स्वतःला चांगल्या सवयी लावून करते पण खरी गोम अशी की हे संकल्प रामनवमी पर्यंत सुरळीत बिनबोभाट कटाक्षाने नियमित सुरू राहतात आणि मग एकदा का रामनवमी झाली की परत ये रे माझ्या मागल्या नुसार माझी संकल्पांची एस. टी. गचके खात थांबते.पण एक नक्की दर गुढीपाडव्याला संकल्प ठरवायचा आणि तो काही दिवस सुरू ठेवायचा हा शिरस्ता काही माझ्याकडून कधीच मोडला जात नाही हे पण खरे.
पोस्टची ची सांगता माझ्याच एका जुन्या रचनेने पुढीलप्रमाणे
*
वसंतऋतूच्या आगमनाने तरवरतोय,
अवनीवरील कण न कण,
त्यानेच प्रफुल्लित झाले मन,
कारण हिंदू वर्षातील आज पहिलाच सण ।।
*
गुढीपाडवा म्हणजे अनुपम सोहळा,
सुरू होतयं आनंदाचं सत्र,
कारण ह्याच दिवसापासून सुरू होतयं,
आमच्या रामराजाच़ नवरात्र, ।।
*
आमच्या ह्या सणाचा आनंद
काही औरच आणि निराळा,
सुर्योदयावेळी गुढी उभारणे ,
हा एक अनुपम सोहळा ।।
*
रावणाविरुध्ज विजयश्री मिळविली रामाने
धरुन सत्याचे शस्त्र,
मांगल्याची गुढी सजली,
लेवून कोरे करकरीत वस्त्र,
गुढीचे सौंदर्य खुलते गाठीबत्तासे व
कडूलिंबाच्या तोरणाने,
निरामय आरोग्याची सुरवात होते.
ह्या सगळ्याच्या सेवनाने ।।।
*
गुढीपाडव्याचा कलश असतो,
प्रतीक मांगल्याचे,
ह्या सणाच्या आगमनाने
लाभतात क्षण सौख्याचे,
असा हा सण न्यारा गुढीपाडवा,
रामनामातच एकवटलाय सारा गोडवा ।।
*
चैत्रशुद्धप्रतिपदेच्या म्हणजेच
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा ।।।
नवीन वर्ष आनंदाचे,सौख्याचे, निरामय आरोग्याचे,भरभराटीचे जावो हीच रामराया जवळ प्रार्थना.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈