सुश्री राजसी जान्हवी संदीप सुंकले
विविधा
☆ स्वयंशिस्तीचे महत्व… ☆ सुश्री राजसी जान्हवी संदीप सुंकले ☆
स्वतःहून स्वतःवर लागू केलेल्या नियमांना ‘स्वयंशिस्त’ म्हणतात. दैनंदिन व्यवहारात स्वयंशिस्तीची अनेक उदाहरणे आपण बघतो. आपण स्वयंशिस्त किंवा अनुशासन असेही म्हणू शकतो. जवळचे उदाहरण मुंग्यांचे सांगता येईल. मुंग्या नेहमी एक रांगेत चालतात, एखादी मुंगी चुकून रांगेच्या बाहेर गेली तरी बाकीच्या मुंग्या कधीच रांग सोडत नाहीत आणि रांग चुकलेल्या मुंगीला परत रांगेत सामावून घेतात.
आपण घडून गेलेल्या काही घटना पाहू……
- परवा मला सुट्टी होती, मामाच्या गावाला जायचे म्हणून मी अलिबागच्या एस टी आगारात गेले होते. सहज दोनतीन दृश्य माझ्या डोळ्यासमोर आली. एक एस. टी. बस फलाटाला लागत होती. पण बरीच लोकं ती बस फलाटाला लागण्याआधीच, त्या बसमध्ये शिरण्याचा प्रयत्न करीत होते. बसच्या दरवाजाचे आकारमान लक्षात घेतल्यास आपल्या लक्षात येईल की एकाच वेळी एकच माणूस आत शिरू शकतो. ही स्थिती जवळजवळ सर्वच बसच्या बाबतीत सारखीच होती.
- आणिक एक दृश्य माझ्या मनात घर करून राहिले आहे. अलिबागला नुकतीच स्वयंचलित वाहतूक नियंत्रण संरचना कार्यान्वित झाली होती. पोलिस त्या रचनेची कार्यवाही सुरळीत व्हावी म्हणून प्रयत्नशील होते आणि काही लोकं बिनदिक्कतपणे नियम मोडून वाहने चालवीत होते. माझ्यासमोर एक अपघात होता होता राहिला.
- सुमारे दहा वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत शेकडो लोकांचा बळी गेला.
- अगदी अलीकडील घटना म्हणजे पंजाबमधील अमृतसर येथे दसऱ्याच्या दिवशी रावणदहन कार्यक्रम काही लोकं रेल्वे रुळावर उभे राहून पहात होती. त्यांच्या अंगावरून रेल्वे गेली आणि जवळजवळ पन्नास लोकांना जीव गमवावा लागला.
वरील सर्व घटना जरी वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या असल्या, प्रत्येक घटना जरी वेगळी असली, प्रत्येक घटनेचा आर्थिक/ सामाजिक परिणाम जरी भिन्न असला तरी आपल्या सर्वांच्या एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल ती म्हणजे या सर्वाला एकच मूलभूत कारण आहे. आपली उत्सुकता न ताणता मी ते कारण सांगतो, ‘स्वयंशिस्तीचा अभाव’.
बिरबलाची एक गोष्ट आहे. भाकरी का करपली? घोडा का अडला ? आणि पाने का नासली ? असे तीन प्रश्न आहेत. या सर्वांचे एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे फिरवले नाही म्हणून. आज आपल्या देशात असलेल्या आणि उद्या निर्माण होणाऱ्या बऱ्याच प्रश्नांचे एकमेव उत्तर आहे किंवा असेल ते म्हणजे
‘‘स्वयंशिस्तीचा अभाव’’
आपण स्वयंशिस्तीच्या दुष्परिणामांची काही उदाहरणे बघितली. त्यामुळे स्वयंशिस्त का पाळावी हे आपल्या लक्षात आले असेल. स्वयंशिस्त अंगिकारल्यामुळे मोठी झालेली अनेक राष्ट्रे आपल्याला सांगता येतील. यातील अग्रक्रमाने ज्यांचा उल्लेख करता येईल. त्यामध्ये ज्यांनी आपल्यावर दिडशे वर्षे राज्य केले ते ब्रिटिश आणि अणुस्फोटाचे विदारक दुष्परिणाम भोगून, चटके खाऊन स्वयंशिस्त पाळून, अथक मेहनत करून आणि प्रखर राष्ट्रभक्तीच्या जोरावर जगातील प्रमुख झालेले एक राष्ट्र म्हणजे जपान. ही दोन उदाहरणे पुरेशी बोलकी आहेत असे मला वाटते.
आज आम्ही शालेय विद्यार्थी आहोत. बरीच मोठी माणसे असे म्हणतात की आम्ही उद्याचे नागरिक आहोत, पण मला उद्याचे नागरिक म्हटलेले आवडतही नाही पटतही नाही. आदर्श नागरिक म्हणून असलेली कर्तव्ये आम्ही आजपासून च पार पाडायला सुरुवात केली तर ती आमच्या अंगवळणी पडतील, आमच्या अंगात मुरतील आणि आयुष्यभर आम्ही ती आचरणात आणू शकू. यात खासकरून स्वयंशिस्त अंगी बाणली गेली तर आमचे जीवन अधिक सुंदर आणि समृद्ध होईल असे मला वाटते.
आता बालमित्रांनो, तुम्ही म्हणाल की प्रास्ताविक पुरेसे झाले. स्वयंशिस्त म्हणजे काय ते आम्हाला कळले, स्वयंशिस्तीचे दुष्परिणाम कळले आणि फायदेही कळले. पण आम्ही नक्की काय करायचे हे कधी सांगणार.
आपण त्याची घरापासून सुरुवात करूया. आपण सकाळी झोपून उठलो की किमान आपल्या पांघरुणाची घडी आपली आपण घालूया. काल पर्यंत आपण काय करीत होतो ते सोडून देऊ, पण आजपासून मात्र आपण या गोष्टी पाळूया. हात धुतल्याशिवाय आपण कोणताही पदार्थ खाणार नाही. हात पुसायला आपल्याकडे रुमाल असेल. सकाळी उठण्याची आपली वेळ पक्की असेल, ती आपण काटेकोरपणे पाळू. शाळेप्रमाणे आपापल्या घरी सुद्धा आपले एक वेळापत्रक असेल. घरी वह्या-पुस्तके ठेवण्यासाठी विशिष्ठ जागा असेल. शाळेतून घरी गेल्यावर आपण आपले दप्तर योग्य ठिकाणी ठेऊ, त्यातील डबा, पाण्याची बाटली धुऊन ठेऊ. संध्याकाळी शुभंकरोती, काही देवांची स्तोत्रे म्हणू, वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवू. शाळेतून दिलेला गृहपाठ आपला नेहमी पूर्ण झालेला असेल. शाळेत आपण वेळेत पोहचू. शाळेतील सर्व सूचनांचे, नियमाचे आपण पूर्णपणे पालन करू. रस्त्याने चालताना, प्रवास करताना आपण वाहतुकीचे नियम समजून घेऊ नी त्यांचे पालन करू. अयोग्य ठिकाणी थुंकणार नाही. लोकांनी अयोग्य ठिकाणी थुंकायाचे पन्नास टक्के कमी केले तर आपले सामाजिक आरोग्य पन्नास टक्के तरी नक्कीच सुधारेल. आपल्याला रांगेचे महत्व जरी कळले तरी आपली प्रगती किमान १०% नी वाढेल असा विश्वास वाटतो. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. आपण सर्व सूज्ञ श्रोते आहात, आपापल्या अभ्यासाने यात अनेक गोष्टींची भर घालू शकाल.
एका मोठ्या वक्त्याने आपल्या भाषणांत सांगितले होते की आपल्या देशातील सर्वांनी दिलेली वेळ पाळली तर आपला GDP किमान चार टक्क्यांनी वाढेल. आपण सर्वांनी यावर चिंतन आणि त्यानुरूप कृती करण्याची गरज आहे, आपण प्रयत्न करू. देशाने, आपल्याला अनेक गोष्टी दिल्या आहेत, याची आपल्याला नित्य जाणीव असण्याची गरज आहे, आपण सर्व तसा प्रयत्न करीत असालच, पण समजा त्यात काही त्रुटी रहात असेल तर आजचे माझे मनोगत ऐकून आपण त्यात योग्य ती सुधारणा नक्कीच कराल या विश्वासाने माझे मनोगतास पूर्णविराम देते.
देश हमे देता है सबकुछ।
हम भी तो कुछ देना सीखे ।।
भारत माता की जय।
© सुश्री राजसी जान्हवी संदीप सुंकले
थळ, अलिबाग.
मो 9028438769
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈