डॉ. मेधा फणसळकर
☆ विविधा ☆ स्वातंत्र्य ☆ डॉ मेधा फणसळकर☆
आज ठरवलच आहे मी स्वतंत्र होणार! किती दिवस हे सगळे सहन करु? पण मी स्वतंत्र झाले तर माझे हे दोन बछडे राहतील माझ्याशिवाय? पण बाबा आहेच की त्यांची काळजी घ्यायला. त्यालाही कळू दे आपली जबाबदारी! इतके दिवस मीच सांभाळत आलीय सगळे. घर- दार- सासू- सासरे- पै पाहुणे मीच ओढत होते रामरगाडा! त्याची किंमत तर नाहीच, पण आपल्याला घरच्या कामवाल्या बाईपेक्षाही कमी किंमत दिली जातीय! व्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य या सगळ्या बेगडी कल्पना आहेत. लग्नापूर्वी याच कल्पना किती पोटतिडकीने मांडत मी अनेक वक्तृत्व- वादविवाद स्पर्धा गाजवल्या. तीच मी आज माझ्याच स्वातंत्र्यासाठी झगडतेय.पण आज ठरवलंय मुक्त व्हायचे ! तुटतंय जरा पोटात पिल्लांचा विचार करुन! पण शिकतील तीही कधीतरी स्वतंत्रपणे जगायला! मी मात्र पक्क ठरवलंय आज स्वतंत्र, मुक्त व्हायचे या पाशातून …….
आशिष
जमणार आहे का मला तो NEET चा अभ्यास करणे? नाही आवडत मला तो biology विषय! समोर घेतलाच की झोप यायला लागते. पण तो सोडून मला नाही चालणार! आमचे पूर्ण घराणे डॉक्टरांचे! मग परंपरा कशी मोडायची? मला मेडिकललाच जावे लागणार असे पप्पांनी निक्षून सांगितले आहे. मम्मीचा पण तोच आग्रह आहे. ती बिचारी तर हॉस्पिटलमध्ये काम करुन दमून येते, पण माझ्यासाठी पुन्हा रात्री जागते.अरे यार! पण नाही मला हा अभ्यास करायला आवडत! त्यापेक्षा मला माझ्या आवडीचे व्हायोलिन का नाही शिकून देत? पण आता मात्र ठरवलंय मी की या सर्वांतून मुक्त होणार!मम्मी-पप्पांना वाईट वाटेल खूप! पण मला नाही पूर्ण करता येणार त्यांच्या अपेक्षा!म्हणूनच मी स्वतंत्र व्हायचे ठरवलंय! मी घरातूनच अशा ठिकाणी निघून जाईन की नाहीच शोधू शकणार कोणी मला! मी मुक्त होणार…. मी स्वतंत्र होणार …..
नाना- नानी
काय मिळवलं आम्ही मुलाला एवढे उच्च शिक्षण देऊन? परिस्थिती नसतानाही पै पै जमवून याला अमेरिकेला पाठवले. वाटले होते की म्हातारपणी तरी सुखात, आरामात आयुष्य जगता येईल. पण पोटच्या पोरालाच आम्ही जड झालो, तिथे दुसऱ्या घरातून आलेली ती मुलगी का आम्हाला प्रेम देईल? या वृद्धाश्रमाच्या चार भिंतीत फार कोंडल्यासारखं वाटते. आम्हाला स्वतंत्र व्हायचंय, स्वतःचे आयुष्य स्वतःच्या मनासारखं जगायला आवडेल आम्हाला! मिळवू शकू का आम्ही ते स्वातंत्र्य?
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन!
त्याच्या दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रात आतल्या कोपऱ्यात तीन बातम्या होत्या….
* शहरातील एका सुखवस्तू कुटुंबातील महिलेची गळफास लावून आत्महत्या!
* शहरातील एका प्रथितयश वैद्यकीय व्यावसायिक दाम्पत्याच्या १२वीत शिकणाऱ्या मुलाची राहत्या घरी हाताची नस कापून घेऊन आत्महत्या!
*शहरातील एका वृद्धाश्रमातील दाम्पत्याची विष खाऊन आत्महत्या !
मिताली, आशिष आणि नाना-नानी स्वातंत्र्यदिनादिवशीच स्वतंत्र झाले होते.त्यांना हवे होते ते स्वातंत्र्य त्यांनी मिळवले?
©️ डॉ. मेधा फणसळकर
मो 9423019961.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈