डॉ मेधा फणसळकर
☆ विविधा ☆ स्टील लाईफ – स्टील …. लाईफ इज देअर ☆ डॉ मेधा फणसळकर☆
रोज सकाळी त्या रस्त्यावर लगबग चालू असायची. सकाळी पाच वाजताच मॉर्निंग वॉक घेणाऱ्यांची गडबड! हातातल्या काठ्यांनी रस्ता बडवत आणि तोंडाने राजकारणावर चर्चा करत जाणारे ज्येष्ठ नागरिक! मॅरेथॉन मध्ये भाग घेतल्यासारखे उत्साहाने धावणारे तरुण! पहिल्या एस. टी. साठी जाणाऱ्यांची तुरळक वर्दळ! “आयेगा आनेवाला$$$ आयेगा$$ “किंवा कधीतरी अचानक सकाळीच,” एक, दो, तीन ,चार…..” लावून माधुरीला आपल्या खिशातील मोबाईलमध्ये नाचवत जाणारे एक आजोबा! आपल्या घरातील कुत्र्यांना फिरवून आणण्यासाठी आणि त्या निमित्ताने स्वतःचा व्यायाम होईल या उद्देशाने फिरणारी मालक मंडळी! लांबूनच त्या कॉलनीतील गच्चीवरुन येणारा ओंकाराचा सामूहिक नाद! वर्तमानपत्र विक्रेत्यांची आलेले गठ्ठे वेगळे करण्यासाठी चाललेली धडपड!
नुकत्याच उघडलेल्या पेट्रोल पंपावर आलेले एखादे चुकार वाहन! आणि दूध, वर्तमानपत्रे टाकणाऱ्या त्या मुलाची वाजणारी सायकलची घंटी! तेवढ्यात येणारी स्कुलबस आणि उत्साहाने लवकर उठून तयारी करुन आलेले, आई- बाबांना टाटा करुन मित्र- मैत्रिणींच्या गराड्यात सामील होणारे ते युनिफॉर्ममधील चिमुरडे! रस्त्यावरचे येणाऱ्या – जाणाऱ्या नवीन वाटसरुना आपल्या हद्दीची जाणीव करुन देण्यासाठी गुरगुरु लागणारे श्वानपथक! एखादा घाबरुन त्यांचा अंदाज घेत चालू लागणारा, तर एखादा मोठा आवाज काढून त्यांना हटकणारा! तेव्हा शेपूट घालून माघारी वळणारे हेच पथक!
रोजचे जिवंतपणा आणणारे हे दृश्य हल्ली मात्र एकदम स्थिर झाल्यासारखे झाले आहे. ‛कोरोना’ संपूर्ण जगाला विळखा घालत या रस्त्यापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळेच एकाकी झालेला रस्ता रोजच्या वाटसरूंची वाट बघत थकतो आहे. सूर्य रोजच्यासारखाच पूर्वदिशेला रंगांची उधळण करत माथ्यावर येतो. पक्षी रोजचाच किलबिलाट करतात. एखादा चुकार हॉर्नबील शेजारच्या नाल्यात काहीतरी ढवळू लागतो. गाई- म्हशी रानात चरत असतात. झाडांची सळसळ आपल्या जिवंतपणाची साक्ष देतात. पण… पण आज त्या रस्त्याला जाग आणणारे मानवी जग मात्र काही काळासाठी गोठून गेले आहे. मानवाचा अव्याहत चालणाऱ्या गतीला आज एका सूक्ष्म जीवाने रोखले आहे. कुठूनशी येणारी वाऱ्याची मंद झुळूक पण आज या रस्त्यावरुन जाताना चाचपडत आहे. वाहनांच्या गजबजाटाने अव्याहत धुरळा उडवणारी धूळ आज जणू काही नतमस्तक होऊन रस्त्यावर सुस्त होऊन पडली आहे. वाऱ्याने उडणारा पाचोळा सतत टाळ्या वाजवून रस्त्याला जागे करण्याचा प्रयत्न करत आहे.ही भयाण शांतता मानवाच्या मर्यादेची जाणीव करुन देत आहे. जणू काही त्याला प्रश्न विचारत आहे,“ आज हरलास ना? हतबल झालास ना? किती गोष्टींवर तू जय मिळवला आहेस? तुला गर्व झाला होता ना की मी काहीही करु शकतो! आज उपग्रहसुद्धा माझ्या ताब्यात आहेत. मी अनेक तंत्र विकसित करुन मला हवे तसे सुख मिळवले आहे. मला फक्त पुढे जायचे आहे. नाती- गोती, भावभावना नगण्य आहेत त्याच्यापुढे! मला फक्त विकास आणि त्याने प्राप्त होणारे धन हवे आहे. मिळाले तुला पाहिजे ते? आज तुझ्या डोळ्यालाही न दिसणाऱ्या एका सूक्ष्म जीवाने तुझ्यावर मात केली आहे. तुला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले आहे. तुझी गती काही काळासाठी गोठवून ठेवली आहे. आता तरी जागा हो. या संकटातून जगशील – वाचशील तेव्हा नव्याने आयुष्य सुरु कर. लहानपणी वाल्या कोळ्याची गोष्ट ऐकली होतीस ना ? ‛तुझ्या पापाचा धनी फक्त तू एकटाच आहेस.’ हे लक्षात आल्यावर वाल्याचा वाल्मिकी व्हायला वेळ लागला नाही. त्यासाठी त्याला रामनामाचा जप करत अंतर्मनात डोकावावे लागले. तुला तेच करावे लागेल. आत्मपरीक्षण! असे सांगतात की पूर्वी खूप मोठा प्रलय झाला आणि सर्व जीवसृष्टी नष्ट झाली. त्यावेळी फक्त ‘मनू’ जिवंत राहिला आणि त्याचेच वंशज आम्ही मानव आहोत. आता गोष्ट खरी- खोटी हे जाणून घेण्यात मला स्वारस्य नाही. पण त्यातील आशय जास्त महत्वाचा! प्रलय प्रलय म्हणजे तरी काय? आत्ता जो हाहाकार माजला आहे ते त्याचेच रुप आहे. तुला त्यातून तरुन जायचे आहे, नव्याने घडी बसवायची आहे. त्यासाठीच आहे ही स्थानबद्धता! जागा हो!विचार कर आणि तुझ्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहे हे कायम लक्षात ठेव. तरच ही गती पुन्हा सुरु होईल.”
माझ्या मनात कोरलेले हे चित्र ! अजूनही तिथेच गोठून राहिलेले… स्थिर चित्र… स्टीललाईफ…. बट स्टील देअर इज लाईफ….
©️ डॉ. मेधा फणसळकर
मो 9423019961.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈