सौ. राधिका भांडारकर

☆  विविधा ☆ सरले वर्ष ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

जे ऊगवते ते मावळतेच हा निसर्गाचा नियमच!!

पण मावळतानाही पाऊलांचे ठसे ऊमटून जातात..

२०२० हे वर्षही आता मावळतीवर टेकलंय्…

कसं गेलं हे वर्ष?  फार नकारात्मक गेलं…या वर्षीच्या आठवणी जरुर राहतील  पण त्या भेदक,  भयावह,  भकास असणार आहेत….

म्हणावं तर सूक्ष्म, डोळ्यांना न दिसणारा पण आक्राळविक्राळ अस्तित्व बजावणार्‍या या विषाणुने सर्‍या जगाला विळखा घातला… त्याची ऊत्पत्ती कशी झाली, त्याचं ऊगमस्थान कोणतं हे वैज्ञानिक दृष्ट्या महत्वाचं असलं तरी ज्या पद्धतीनं त्याने समस्त मानवी जीवनालाच वेठीला धरलं ते अनुभवत असताना, नेमकी आपली भूमिका काय याचे आत्मसंशोधन अधिक महत्वाचे वाटते…… करोडो लोक बाधित झाले आणि लाखो बळी पडले…. आणि या सालाबरोबरचा हा थरारक संहार नव्या सालाचे ही बोट पकडूनच ठेवणार का हाही प्रश्न आहेच….

तशा जगात अनेक गोष्टी घडल्या…

जाॅर्ज फ्लाॅईड या कृष्णवर्णीय नेत्याचा मिनीआपाॅलीस अमेरिका या शहरात, अमानुष पोलीस कारवाईत मृत्यु झाला…

धर्मद्वेषाचे अघोर परिणाम सोसूनही पुन्हा पुन्हा तेच घडावे याचेच वैषम्य वाटते..

अमेरिकेत ट्रंप यांची सत्ता गेली. बायडेन नवे राष्ट्रपती म्हणून निवडून आले…भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांची ऊपराष्ट्रपती म्हणून निवड झाली….

आपल्या देशातही ठिकठिकाणी निवडणुका झाल्या..

घोडेबाजार झाले ..पक्षांची,  नेत्यांची अदलाबदल झाली.. देशहितापेक्षा मतलबी राजकारणाचेच वारे वाहिले.

बळीराजाचे बळी गेले .. निसर्गानेही झोडपले आणि राजकारणानेही पीडले…अंदोलने चालूच आहेत…

हाथरस सारख्या घटना घडतच आहेत…

कोरोनाच्या हकालपट्टीसाठी, दिवे लावले, टाळ्या वाजवल्या, थाळ्या बडवल्या, घंटानाद केले…

सीमेवर जवान शहीद झाले…श्रद्धांजल्या वाहिल्या….

पण या सगळ्या गदारोळात आर.के. लक्ष्मणचा, मानवजातीचा प्रतिनिधी मात्र होरपळून निघालाय…. पण २०२० या सरत्या सालाचा लेखनप्रपंच मांडताना केवळ घटनांचाच ऊहापोह करणे इतकाच हेतु नाही.

भल्याबुर्‍या घटना अव्याहत घडतच असतात.. पण या वर्षी  एका विषाणुने दिलेला भयावह, थरारक अनुभव हा केवळ न भूतो न भविष्यती..!!

जीवन स्तब्ध झाले! बंदीस्त झाले…भयाण डोहात बुडाले….तांडवी मंथनात घुसळून गेले… कलीयुगाचा हा अंतीम काळ… जगबुडीच ही.. महाप्रलय म्हणतात तो हाच… शंकराने तिसरा डोळाच ऊघडला…महेशाचं हे संहार सत्रच… मग इथे येउन मन थबकतं…संपलं नाही सारं.  संपणारही नाही .. हा सृष्टीचा नियमच नाही….बंदीस्ततेत, स्तब्धतेतही एक दार ऊघडतं.. अगदी आत, मनातलं..आणि अनादी काळाच्या पळापळीत खूप हरवलेलं पुन्हा गवसतं….

हरवलेली संसकृती, नीती, वाढलेला हव्यास, तुटलेली नाती, संवाद, गोडवे, माणूसपण, विनाकारण वाढलेल्या गरजा… या सर्वांचा नव्याने विचार करावासा वाटतो.

एक विषाणु येतो आणि विश्वाला संदेश देतो”

“घरात बसा… सुरक्षित रहा.”

नकारात्मक पार्श्वभूमीवर २०२० सालाने जर काही दिलं असेल तर आत्मसंशोधनाचं आवाहन…

म्हणून नव्या वर्षाचं स्वागत करताना मनाची मरगळ नको.

सृष्टीनं अंजन घातलंय् ..या संजीवन दृष्टीने नववर्षाला सामोरे जाऊ…

मानव कधीच निसर्गाहून श्रेष्ठ नाही .पण मानवाने निसर्गाची अनेक रौद्र रुपे पचवली आहेत… लढाऊ, अहंकारी वृत्तीने नव्हे तर शरणागत होऊन निसर्गाची पूजा बांधूया आणि येणार्‍या नव्या वर्षाचे स्वागत करुया…..!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
3.5 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments