मराठी साहित्य – विविधा ☆ स्निग्ध जिव्हाळा तुझा लाभला (एक आस्वादन ) – भाग 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा ?

☆ स्निग्ध जिव्हाळा तुझा लाभला (एक आस्वादन ) – भाग 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

(मागील भागात –  मनाच्या पैलपार बोलले जाणारे गहन गूढ, त्या बोलीचा अर्थ, त्याचे रहस्य जाणून, ते नामक्या शब्दात व्यक्त करणे शांताबाईंना सहजपणे जमून गेलय…. आता इथून पुढे)

‘हृदया, गात रहा नीज गीत’

सहजता हा शांताबाईंच्या काव्यलेखनाचा स्थायीभाव आहे.  जुन्या जमन्यातील अनागर सस्कृतीतील बहिणाबाई म्हणते,

अरे घरोटा घरोटा, तुझ्यातून पडे पिठी

तसं तसं माझं गाणं पोटातून येतं ओठी.

आजच्या जमानातल्या शांताबाई जुन्या जमन्यातील या बहिणाबाईचाच वारसा सांगतात जणू! ‘अंतरीचे स्व-भावे धावे बाहेरी’ या संतवचनाप्रमाणे जे जे अंतरात उचंबळलं, मनाला भावलं, ते ते काव्यरूपात बाहेर आलं. भोवतालच्या निसर्गाचा त्यांच्यावरचा प्रभाव, त्यांची प्रीतभावना, विरहावेदणा, त्यांचं एकाकीपण, चिंतन-गूढगुंजन, आत्मसंवाद सार्‍यांचंच प्रगतीकरण त्यांच्या कवितेत अगदी सहजपणे येतं॰

‘सांज काजळत आली   हाका येतात दुरून

आई ठेव ना आता    खेळ सारा आवरून’

किंवा  ‘मीच निर्मिली होती ती मायानगरी

          क्षणभर माझा जीव खुळा रमवाया

          जे जे होईल, व्हावे म्हटले होते

          त्याची केवळ करात आली छाया ‘

किंवा   होते इथे माझ्यासवे, होते सदा जे भोवती,

        आता कुठे गेले बरे, गेले कुठे ते सोबती

किती म्हणून उदाहरणे द्यावी?त्यांची प्रत्येक कविता सहजपणे साकार झाली आहे. त्यांच्या कवितेतील सहजपणाचे कारण, त्या ‘नीज गीत’ गात राहिल्या. ‘हृदया, गात रहा नीज गीत’ म्हणत राहिल्या. आपल्या हृदयाची स्पंदने व्यक्ता करत राहिल्या. ती व्यक्त करताना म्हणत राहिल्या, ‘ज्ञात जगाच्या पैलतीरावरि, असेल कोठे रसिक कुणीतरी, प्रांजळ तूझिया बोलावरती, जाडेल त्याची प्रीत’ 

‘वर्षा’ या शांताबाईंच्या पाहिल्याच काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत, शांताबाईंच्या काव्याची वैशिष्ट्ये सांगताना रा. श्री. जोगांनी ‘सहजता आणि प्रसन्नता’यांचा उल्लेख केलाय. हीच वैशिष्ट्ये त्यांच्या पुढच्या, रूपसी, गोंदण, अनोळख, जन्मजान्हवी इ. काव्यसंग्रहातही दिसून येतात. फक्त पुढच्या काळात त्यांची कविता त्यांची कविता सखोल, अर्थगंभीर, परिपक्व आणि विकसित होत गेली असं डॉ. प्रभा गणोरकर म्हणतात.

शांताबाईंच्या रचनेतील सहजता त्यांच्या कवितेइतकीच गीतरचनेतूनही जाणवते.किंबहुना आशा सहज, सुंदर रचनेमुळेच त्या उत्तम गीतकारही होऊ शकल्या. त्याहीपेक्षा विशेष म्हणजे आधी बांधलेल्या चालींवर ज्या गीतरचना शांताबाईंनी केल्या, त्यातही ही सहजता उणावली नाही.

शांताबाईंचा प्रतिभा पक्षी त्याला वाटलं, तेच गात राहिला. त्याचे स्वत:चे सूर…. म्हणून ते सच्चे सूर वाटतात. त्यात कृत्रिमता, गारागिरी, उसनेपणा कुठेच नाही. शांताबाई स्वत:च म्हणतात, मी जे लिहिले, ते अगदी मनापासून लिहिले. त्यात उणिवा असतील, दोष असतील, पण अप्रामाणिकपणा यत्किंचितही नाही. एका कवितेत त्या म्हणतात,

‘नको शब्दांची आरास, नको निरर्थ सोहळा

एक सूर खरा लागो, उंच चढवून गळा’

नव्या वळणाचा दृश्य प्रभाव त्यांच्यावर खूप कमी आहे. त्यांची कविता नवतेबरोबर भरकटत गेली नाही. स्वत:च्या जाणिवा आणि त्यांची अभिव्यक्ती याबाबत ती स्वत:शी अत्यंत प्रामाणिक राहिली’ असं डॉ. प्रभा गणोरकर आवर्जून सांगतात.

शांताबाईंची कविता आत्मारत आहे पण ती आत्मकेंद्रित नाही. कुसुमावती देशपांडे यांनी ‘रूपसी’च्या प्रस्तावनेत ती ‘आत्मलक्षी’ असल्याचा उल्लेख केलाय. त्यांच्या कवितेत ‘भेदक आत्मविश्लेषण’ आणि ‘शांत प्रामाणिकपणा’ आहे, असेही त्या म्हणतात. ती केवळ स्वत:शीच बोलत नाही. ‘ग्रेस’सारखी ती केवळ स्वत:तच मश्गुल रहात नाही. ‘ग्रेस’ची कविता वाचताना वाटतं, हा कवी एका भारलेल्या रिंगणाच्या आत उभा आहे. त्यात सहजपणे दुसर्‍याला प्रवेश करता येणार नाही. त्यासाठी ‘तिळा उघड’ सारखा एखादा मंत्र माहीत असायला हवा. शांताबाईंचे तसे नाही. त्या स्वत:शी बोलतात. स्वत:शी बोलता बोलता त्या रसिकांशीही संवाद साधतात. केशवसुतांनी एका कवितेत म्हंटले आहे,

‘ तो माज गमले विभूती माझी  स्फुरत पसरली विश्वामाजी’

शांताबाईंच्या भावा-भावना, चिंतन-शोधनही असंच सर्वव्यापी होतं.

क्रमश: ….

©️ श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈