श्री तुकाराम दादा पाटील

?  विविधा  ?

☆ सहज आपलं सुचलं म्हणून…. ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

अनुभवलेल्या प्रसंगांच्या कडू गोड बिया काळजात खोलवर रुजून बनले असते त्यांचे विशालवृक्ष आणि पुनः प्रत्ययाची सुमधुर फळ वारंवार चाखायला मिळाली  असती तर किती मजा आली असती जीवनात.

आणि महत्त्वाचं म्हणजे काही वेडंवाकडं करण्याला, वागण्याला कुणी धजावलच नसतं आयुष्यात. सर्वात महत्त्वाचा फायदा हाच झाला असता की घडवणारा व उपभोगणारा बांधील राहिला असता एकामेकाला. संपला असता जीवनकलह, मिटल्या असत्या व्यथा विवंचना उरला असता निखळ आनंद कायमचा . परस्परांना बांधून ठेवणारा, अतूट . पण करणार काय?  आता सुपीक काळीज ही उरलं नाही आणि प्रसंगांच्या बिया ही उगवणक्षम राहिलेल्या नाहीत. हा सुधारलेल्या गतीमन काळाचा महिमा, स्विकारावाच लागेल भविष्याचा कसलाही विचार न करता.  प्राक्तनान दिलेली भेट म्हणून पण भविष्याचा विचार करण्याआगोदर जे पेरलजात तेच उगवतं हे माहीत नव्हतका ? भौतिक सुखाची चटक लागलेले आपण जमानाच बदलला असं म्हणताना , तो कुणी बदललाय याच्यावर  कधी विचार तरी करतो का ? आपला सहभाग आहेच ना त्यात ? मग आपण मौन पाळून गप्प का ? जमाना बदलत रहातो. ती काळाची गरजही आहे.  पण जुनं जे हितकारक आहे.सुंदर आहे, ज्याच्यातून ऐश्वर्याची उंची मोजली जाते. जे सुखकारक असून परमानंद देते. जे गुण आणि अगाध आहे , माणसाला  माणसात ठेवण्यासाठी आवश्यक आहे ते टिकवण्यासाठी आपण काय केलं. की त्याची मोडतोड करण्याला हातभार लावण्याचाच अपराध केला.हे नाहीच तपासलं कधी. कारण आपण मनाचे मिंधे. सुखाना लाचावलेले. थोडेका होइना पण अपराधी आहोतच ना.

केलेला अपराध मान्य करायलाही मनाचा मोठेपणा असायलाच हवा. आपलं चुकत कुठं हे सगळ्यांनाच माहिती असतं. पण ते मान्यकरण्याची हिंमतच हरवली आहे आपल्यातली. मग उगीच कशाला दूस-याच्या नावावर बील फाडायची. माणसाला स्वत:चा टेंभा   मिरवण्याची जुनीच खोड आहे . त्यामुळे काय-काय घडलंय यांचे अनेक दाखले पुराणांन आणि इतिहासान नोंदवून ठेवले आहेत. ते वाचून  शहाणपण शिकेल तर तो माणूस कसला. कारण तो सजीवांच्यातला सर्वश्रेष्ठ जीव आहे, हे त्याला माहीत आहे. म्हणून  “मी करीन तीच पूर्व ” ही त्यांची घमेंड. तेवढ्याच तकलादू बळावर त्यान निसर्ग नियमांना बासनात गुंडाळून ठेवलं . त्यांच्यावर आक्रमण करत आपल्याला हवे तसे बदल घडवण्याचा चंग बांधला आणि टाकला बदलून जमाना आपल्या मर्जीप्रमाण. मग  बदलाचे परिणाम भोगताना आता काय म्हणून गळा काढून रड  मांडायचं.  हे सारं करताना आपल्या पेक्षाही एक वरचढ शक्ती या विश्वात आहे हेच आपण सोईस्कर रित्या विसरलोय . जग नियंत्यान घालून दिलेले आणि अनादी अनंत काळापासून चालत आलेले नियम पाळायला नकोतका? ते मोडले,की   गालफाड सुजेपर्यंत पडत जाणा-या थपडा  सोसाव्या लागतात. सध्या आपण हेच अनुभवत नाही काय ? तशा त्या पुढेही वाढतच रहाणार आहेत. निदान हे तरी लक्षात घेऊन पावलं उचलली जावीत हे समजायला हवं माणसाला.

 

© श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments