श्री अरविंद लिमये
विविधा
☆ ‘स्वयंपाकघर…बदलती रुपे’ – भाग 2 ☆ श्री अरविंद लिमये ☆
……………….स्वयंपाकघरातल्या अत्यावश्यक वस्तू आज कालबाह्य झाल्या असल्या तरी माझ्यासाठी मात्र त्यांच्या आठवणी आजही मोलाच्या आहेत.
काळ बदलला.गरजा बदलल्या.घराचं स्वरुप जसं बदललं तसंच स्वयंपाकघराचंही. आमच्या संसारात आधीच्या स्वयंपाकघरातल्या चुलीची जागा आधी पितळी टाकीच्या आवाजाच्या स्टोव्हनं, नंतर वातीच्या स्टोव्हनं न् पुढे खूप वर्षांनंतर आधी ‘ पांचाल’ नावाच्या हिरव्या रंगाच्या बीडाच्या न् नंतर स्टीलच्या गॅसशेगडीने घेतली होती.चुल नसल्याने स्वयंपाकघरात स्वयंपाकाचा कट्टा आला.पाटांची जागा फोल्डिंगच्या डायनिंग टेबलने घेतली. स्टोव्हचा काकडा,स्टोव्हची पीन,राॅकेलचा पाच लिटरचा कॅन,पितळाच्या भांड्यांची जागा घेतलेली स्टीलची भांडी,लोखंडी तव्याच्या जागी आलेले आधी अल्युमिनीयमचे न् नंतरचे निर्लेपचे तवे,अडगळीत गेलेल्या जाळीच्या कपाटाची जागा घेणारा फ्रीज ही कालच्या स्वयंपाकघराने स्विकारलेली अल्पकाळातली स्थित्यंतरे.खूप नंतर नवीन घरी किचन ट्राॅलीज् आल्या.मुलाचा संसार सुरु झाल्यावर फ्रीजच्या सुधारलेल्या आवृत्त्यांपाठोपाठ मायक्रोवेव्ह न् ओव्हनही.
परवाच्या न् कालच्या स्वयंपाकघराची ही रुपं मला खूप जवळून अनुभवता आली.उद्याचं स्वयंपाकघर कसं असेल ते काळ नव्हे तर उद्याची नवी पिढीच ठरवेल.त्यामुळे ते कसे असेल याची कल्पना करण्यापेक्षा ते कसं असावं हे सांगणे मला अगत्याचे वाटते.
पूर्वीच्या घरापासूनच घराचा अविभाज्य भाग असणाऱ्या कांही जागानाच घराने स्वतःचं नाव बहाल करीत मनापासून सामावून घेतलंय.स्वयंपाक’घर’, देव’घर’, माज’घर’ ज्यात ‘घर’ शब्दशः खऱ्याअर्थानं सामावलेलं असायचं अशा मोजक्या जागा.त्यातलं देवघर बऱ्याच घरातून हद्दपार झालंय.माजघराची पूर्वीची वैशिष्ट्ये आस्तित्त्वातच नाहीत आणि स्वयंपाकघराची जागा ‘किचन’ने घेतलीय.
हे खरंतर वरवरचे बदल आहेत.काळानुरुप बदललेल्या गरजांनुसार हळुहळू झालेले न् मनापासून स्विकारले गेलेले.तरीही पूर्वीचा साळढाळपणा नसला तरी माणसं ‘ तीच ‘आहेत.ती ‘ तशीच ‘ असावीत ही अपेक्षा मात्र अवास्तव ठरेल हे लक्षात घ्यायला हवं.
‘स्वयंपाकघर ‘ या संकल्पनेत फक्त अन्न शिजवणे नाही, तर स्वच्छतेला प्राधान्य देऊन शुचिर्भूत पध्दतीने ते शिजवणे अभिप्रेत आहे. रांधणाऱ्याच्या मनातल्या आपुलकी, प्रेम आणि सद् भावना या गृहितच आहेत.हे सगळं किती आवश्यक आहे हे अलिकडच्या कोरोनाकाळाने दाखवून दिलेलं आहेच. हव्यासाने, भौतिक सुखाच्या हव्यासाने स्विकारलेली प्रदुषित जीवनशैलीच कोरोनाच्या प्रसाराला पूरक ठरल्याचे लक्षात आल्यानंतर तरी स्वच्छता पालनाचा विचार मास्क न् सॅनिटायझर वापरापुरता मर्यादित न ठेवता तो खानपानाच्या सवयींच्या योग्यायोग्यता तपासून पहाण्याइतका सखोल व्हायला हवा.मग उद्याच्या किचनमधे स्वयंपाक स्री करते,घरातला पुरुष करतो,एकमेकांच्या सोयीनुसार दोघांपैकी कुणीही आलटून पालटून करतात की घरी नेमलेली स्वैपाकीण किंवा आचारी करतो हा निर्णय प्रत्येक घराचा वेगवेगळा असला तरी त्यात Quality control लाच महत्त्व असावे.हाॅटेलमधून मागवून विनासायास भूक भागवण्यात समाधान मानण्यातले धोके ओळखून जेवणाला
‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ‘ का म्हणतात हे समजून घेऊन त्यादिशेने प्रयत्नशील रहाणे अगत्याचे ठरेल.थोडक्यात स्वतःच्या प्राधान्यक्रमात नवे चकचकीत किचन खऱ्या अर्थाने
‘परिपूर्ण किचन ‘असण्याला प्राधान्य देण्यात यावे असे मनापासून वाटते.
समाप्त
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈