श्री शरद दिवेकर

?  विविधा ?

☆ स्केच – भाग पहिला ☆ श्री शरद दिवेकर ☆

रोजच्यासारखीच धावपळ करत कसंबसं रेल्वे स्टेशन गाठलं आणि ट्रेनचा हाॅर्न वाजला. जिवाचा आकांत करून समोरच निघण्याच्या तयारीत असलेल्या ट्रेनचा आमचा नेहमीचा डबा गाठला आणि डब्यात शिरलो. तेवढ्यातच ट्रेन सुटली. हाशहुश करत आमचा सहा मित्रांचा कंपू असतो तेथे पोहोचलो. ऑफिसची सॅक रॅकवर टाकली आणि पंख्याखाली उभा राहिलो. असंच रोज घडायचं. सकाळी 08.43 च्या कल्याण – सीएसटी डबल फास्टमध्ये मी कल्याणपासूनच बसून प्रवास केला असं क्वचितच घडायचं. पण एक मात्र बरं होतं की सुरेश, रमेश आणि प्रकाश ट्रेन प्लॅटफॉर्मवर  येण्यापुर्वीच हजर असायचे. त्यामुळे आमच्या तीन सीट्स तरी शुअर असायच्या आणि गाडी घाटकोपरला पोहोचली की उरलेले आम्ही तिघे त्यांच्या सीट्सवर अगदी हक्काने बसायचो सीएसटी येईपर्यंत. पण आज मात्र मी ठरवलं की ही स्वतःच्या जीवाची लावचड आपण थांबवायला हवी. उद्यापासून थोडं लवकर  उठून लवकर घर सोडायचंच, म्हणजे अशी धावपळ करावी लागणार नाही.

दुस-या दिवशी सकाळी लवकर उठलो आणि भरभर आवरून स्टेशन गाठलं. ट्रेन्स थोड्या लेट असल्याने आमची ट्रेन आली नव्हती. त्यामुळे धावती ट्रेन पकडून सीट पकडायचा प्रयत्न करता येणार होता. तसा प्रयत्न केला देखील मी आणि विंडो सीट नाही आणि दुसरी सीट देखील नाही पण तिसरी सीट मिळवली मी. नंतर उरलेले तिघंही आले आणि गप्पा, चेष्टा, मस्करी करत करत आमचा प्रवास सुरू झाला.

आज एक वेगळी गोष्ट घडली. नेहमी ट्रेन कल्याण स्टेशनमध्ये शिरताना आमच्या समोरच्या सीट्स रिकाम्या असायच्या. पण आज उलट्या बाजूच्या विंडो सीटवर डाऊन करून आलेला माणूस बसला होता. बसला नव्हता. चक्क झोपला होता बसल्या बसल्या. घाटकोपर स्टेशन आलं आणि आम्ही तिघंही उभे राहिलो आणि आमच्या सीट्स आमच्या मित्रांना दिल्या. थोड्या वेळाने माझी नजर त्या उलट्या बाजूच्या विंडो सीटवर बसून आलेल्या माणसाकडे गेली. आता तो झोपला नव्हता. जागा होता. त्याच्या हातात होती एक वही आणि पेन्सिल. बाहेरच्या हवेच्या झोताने त्याच्या वहीचं पान फडफडलं आणि माझ्या नजरेला पडलं आत्ताच विंडो सीटवरून उठलेल्या सुरेशच्या स्केचकडे. त्या माणसाने ते स्केच जवळपास पुर्ण केलं होतं. त्याच वेळी त्या माणसाने ती वही बंद केली आणि ती वही आणि पेन्सिल त्याने त्याच्या पिशवीत भरली आणि तो उठला आणि दाराकडे जाऊ लागला. पुन्हा आमच्या गप्पा सुरू झाल्या. सीएसटी आल्यावर आम्ही सगळे ट्रेनमधून उतरून आपापल्या ऑफिसेसकडे रवाना झालो.

संध्याकाळी ऑफिस सुटण्यापुर्वीच प्रकाशचा फोन आला आणि समजले की सुरेश गेला. मी एकदम उडालोच. जेमतेम पस्तीशीचा हा सुरेश आणि त्याला एवढ्या कमी वयात हार्ट अ‍ॅटॅक आला आणि तो गेला ! सगळे सोपस्कार आणि अंत्यविधी आवरून घरी पोहोचायला मध्यरात्र होऊन गेली होती. दुसर्‍या दिवशी उशीराच उठलो आणि मूडच नव्हता ऑफिसला जाण्याचा. त्यामुळे ऑफिसला दांडी मारली.

असेच दिवस चालले होते. आता माझी एक सीट तरी शुअर असायचीच. विंडो सीट नाहीच मिळायची मला ! पण तरीही पुर्वीपेक्षा सुखावह प्रवास व्हायचा रोज. सुरेश जाऊन साधारण महिना झाला असावा आज. आजही आमची ट्रेन सुटली आणि सहजच लक्ष गेलं समोरच्या विंडो सीटला बसलेल्या त्या माणसाकडे, तोच माणूस, स्केच काढणारा. तो माझ्या चांगलाच लक्षात राहीला होता. नेहमीप्रमाणे घाटकोपर आल्यावर उभा राहिलो आणि कुतुहलाने त्या माणसाकडे पाहिलं. तर त्याच्या हातात होती आजही तीच वही आणि पेन्सिल सुध्दा. त्यामुळे मुद्दामच त्या वहीत डोकावून पाहिलं. तर काय ! त्या माणसाने आत्ताच विंडो सीटवरून उठलेल्या रमेशचे स्केच काढले होते. खुपच सुंदर स्केच काढले होते त्याने. वेळ चांगला जात असेल त्या माणसाचा. तेवढ्यात त्या माणसाने आपली वही बंद केली आणि वही आणि पेन्सिल पिशवीत ठेवून तो उठला आणि दाराकडे जाऊ लागला. सीएसटी आल्यावर आम्ही गाडीतून उतरलो आणि आपापल्या ऑफिसेसकडे रवाना झालो.

त्या दिवशी दुपारीच माझा मोबाईल वाजला. प्रकाशचाच फोन होता. फोन ठेवला आणि माझ्या हातापायातील शक्तीच निघून गेली. रमेशला हार्ट अ‍ॅटॅक आला होता आणि तो गेल्याचे सांगण्यासाठीच प्रकाशने फोन केला होता. पुन्हा एकदा तीच धावपळ, तेच सगळे सोपस्कार आणि अंत्यविधी. एका महिन्यात आम्ही दोन मित्र गमावले होते.

दुसर्‍या दिवशी सुट्टी होती. सहज कॅलेंडर पाहिलं तर काल अमावास्या होती. प्रकर्षाने आठवण झाली सुरेश आणि रमेश यांची. सहजच कॅलेंडरचं मागच्या महिन्याचं पान पाहिलं आणि लक्षात आलं की सुरेश गेला त्या दिवशी देखील अमावास्याच होती. काय योगायोग होते हे !

असेच काही दिवस गेले. आता आमची चौकडीच उरली होती. आज पिठोरी अमावास्या. वाढदिवस असतो माझा तिथीने. माझी पत्नी आठवणीने लक्षात ठेवते हा दिवस. त्यामुळे माझ्या देखील लक्षात असतो. पण मूडच नव्हता आज. सकाळी प्लॅटफॉर्मवर आलो. ट्रेन अजून यायची होती आणि त्रिकुटही आलं नव्हतं अजून. त्यामुळे मला आज चक्क विंडो सीट मिळाली आणि एकदम खुश झालो. तेवढ्यात त्रिकुट अवतरलं आणि त्यापैकी दोघांनी उरलेल्या दोन सीट्स पटकावल्या. लगेचच ट्रेन सुरू झाली आणि वा-याचा झोत अंगावर आला आणि आणखीनच खुश झालो मी. पण समोरच्या सीटवर पाहिलं आणि मला दरदरून घाम फुटला. समोर तोच माणूस बसला होता आणि त्याच्या हातात होती तीच वही आणि पेन्सिल.

क्रमशः ….

©  श्री शरद दिवेकर

कल्याण

मो 70457 30570, ईमेल – [email protected]

 

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments