सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
विविधा
☆ संत वेणास्वामी – भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
(सूर्याच्या लेकी या महाग्रंथासाठी निवड झालेला सौ.पुष्पा प्रभूदेसाई यांचा संत वेणास्वामी हा लेख क्रमशः ई-अभिव्यक्ती च्या वाचकांसाठी:
वेणा सद्गुरुंचे स्मरण करीत रामायण, भागवत यांचे पारायण करीत राहिली. एके दिवशी समर्थ रामदास स्वामी कोल्हापूरला आले आहेत ,अशी बातमी समजली. वेणाला खूप आनंद झाला. घरातल्या मोठ्यांनी वेणाला माहेरी जाण्याच्या इच्छेला मान दिला .काही दिवसासाठी वेणा माहेरी गेली .आता ती वणाच्या वेणाबाई झाल्या होत्या. समर्थांची कीर्तने महालक्ष्मीच्या प्रांगणात होत होती. कीर्तन ऐकताना श्रोतृवृंद मुग्ध होऊन जात असे. गोपजी व राधिका दोघेही स्वामींचे शिष्य बनले होते. सकाळी समर्थ शिष्यां बरोबर मनाचे श्लोक गात भिक्षेसाठी जात, तेव्हा गल्लीतील मुलेही जात. लेकीसुना भिक्षा देत असत. स्वामी सर्वांच्या ओळखी करून घेत. कीर्तनातून राम भक्ती, सदाचरण आणि आत्मविश्वासाचे बीजारोपण करत असत. कोल्हापुरात आल्यापासून वेणाबाई रोज कीर्तनाला जात. आणि पुढे बसत. एके दिवशी समर्थांनी तिला ओळखले. आपल्या कीर्तनाच्या पूर्वरंगात त्यांनी सांगितले की, सन्मार्गावर जात असताना, लोक निंदेस घाबरण्याचे कारण नाही. उत्तर रंगात त्यांनी भक्तशिरोमणी संत मीराबाई यांचे आख्यान लावले. सर्वजण ऐकण्यात तल्लीन झाले. किर्तन झाल्यावर वेणा बाईंनी समर्थांच्या चरणी लोटांगण घातले. तत्वचर्चा सुरू झाली. रोज किर्तन झाल्यानंतर, प्रश्न-उत्तरे सुरु झाली .एके दिवशी तर चर्चा संपेना .रात्र संपून पहाट व्हायला लागली .समर्थांचे शिष्य आणि वेणाबाई तेवढेच राहिले. अखेर समर्थांनी वेणा बाईंना घरी जायला सांगितले.
व्हायचे तेच झाले.एकटी तरुण मुलगी रात्री उशीरा घरी येते अस म्हणून लोकांमधे कुजबुज सुरु झाली.लोक शंका कुशंका घेऊ लागले. तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायला लागले.घरोघरी चर्च्या व्हयला लागल्या.लोक वेणाबाईंच्या आई वडिलांना दोष द्यायला लागले.त्यांना धमक्या द्यायला लागले.निंदकांनी वेणाबाईंनाबदनाम करण्याचा निश्चय केला.वेणांनी आपले निर्दोषत्व अनेक परींनी सांगण्याचा प्रयत्न केला. पण नाही.काही उपयोग झाला नाही. गोपजींवर लोक दडपण आणायला लागले. आणि अखेर “मीराबाई प्रमाणे तूही विषाचा पेला पिऊन दाखव”अस म्हणून एक जण विषाचा पेला खरोखरच घेऊन आला. गोपजींनाही या बदनामीपेक्षा हिचे मरणे श्रेयस्कर वाटू लागले. वेणाबाईंनाही खोट्या जगात रहाण्यापेक्षा परमेश्वरचरणी जाणे योग्य वाटायला लागले. त्यांनी श्रीरामाचे आणि स्वामी समर्थांचे स्मरण केले. हातात विषाचा पेला घेतला. रामनाम घेताघेता वीष पिऊन टाकले.
तास, दोन तास, तीन तास गेले. पण वेणाबाईंवर त्याचा काही परिणाम झाला नाही. फक्त कातडी काळी ठिक्कर पडली. आता लोकही घाबरले.”आमच्याकडून अपराध झाला आहे”असे म्हणून क्षमायाचना करु लागले. आई वडील तिला घरात आत घेऊन जायला लागले. पण तिने उत्तर दिले तुम्ही मला वीष दिलेत, तेव्हाच मी तुमची उरले नाही. तुमची वेणा मेली.आता वीष पिऊन जिवंत झाली. ती आता प्रभू रामाची दासी झाली आहे.
क्रमशः….
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
बुधगावकर मळा रस्ता, मिरज.
मो. ९४०३५७०९८७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈