सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
विविधा
☆ संत वेणास्वामी – भाग -3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
(सूर्याच्या लेकी या महाग्रंथासाठी निवड झालेला सौ.पुष्पा प्रभूदेसाई यांचा संत वेणास्वामी हा लेख क्रमशः ई-अभिव्यक्ती च्या वाचकांसाठी:
इतक्यात समर्थ श्लोक म्हणत, म्हणत आले. समर्थाचिया सेवका वक्र पाहे. असा भूमंडळी कोण आहे? जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही. उपेक्षिकदा रामदासाभिमानी. निंदा करणारे लोकही, समर्थांचा जयजयकार करायला लागले. समर्थांनी वेणाबाईंच्या अंगावरुन काठी फिरवली. वेणाबाईंचे आई-वडील “भिक्षा तरी घ्या,” असे म्हणत होते. तेव्हा समर्थ म्हणाले,” जी गोष्ट तुम्हाला नको ती मला द्या. उद्या चाफळला आम्ही वेणा बाईंना बरोबर घेऊन जाऊ.” दुसरे दिवशी सकाळी समर्थ, शिष्यगण यांच्यासह वेणाबाई चाफळला निघाल्या.
सामाजिक जीवनातील कोंडमार्यातून त्या आता मुक्त झाल्या .चाफळ चे निसर्गसौंदर्य, मोकळी हवा, राम सीतेच्या चैतन्यमय मूर्ती, आणि पवित्र वातावरणाने त्या प्रसन्न आणि तृप्त झाल्या. चाफळला राहिलेल्या आक्कास्वामी त्यांना मोठ्या बहिणी सारख्या होत्या. तेथे राहून दासबोधाचे अध्ययन, रामचरितमानस वाचण्यात त्या रंगून जायला लागल्या. त्या नंतर त्या स्वतःही काव्य करायला लागल्या. समर्थ सर्वत्र फिरता-फिरता जेव्हा चाफळला येत ,तेव्हा त्यांच्या निरूपण आणि कीर्तनात त्या तल्लीन होऊन जात असत. हळूहळू स्वतः काव्य करून रामासमोर कीर्तन करायला लागल्या. अनेकदा भिक्षाटनासाठी जाताना समर्थां बरोबर वेणाबाईही जात असत. त्यांची किर्तनाची कला पाहून, लोक प्रभावित होत असत. त्यांच्या रसाळ वाणीचे कीर्तन ऐकण्यासाठी ,वामनपंडितां सारखे विचारवंतही येत. आणि प्रशंसा करत. अनेकदा वीणा घेऊन वेणास्वामीच्यामागे उभे रहात असत. अनेकदा लोक आपले धार्मिक अध्यात्मिक प्रश्न विचारण्यासाठी त्यांच्याकडे येत असत. तेव्हा वेणाबाई इतक्या चातुर्याने उत्तरं देत की स्वतः समर्थ ही खुष होत असत. एकदा काशीचे सुप्रसिद्ध गागाभट्ट रामदासांशी तत्वज्ञान विषयक चर्चा करण्यासाठी पंढरपूरला आले. रामदासांनी वेणाबाईंना बोलावून घेतले .दासबोधाच्या सहाय्याने, एक विश्व तत्त्वाची कल्पना ,गागाभट्टांना स्पष्ट करून सांगण्याची वेणाबाईंना आज्ञा झाली .वेणाबाईंच्या विद्वतप्रचुर विवेचनाने गागाभट्ट खुश झाले. आता त्या खऱ्या अर्थाने वेणास्वामी झाल्या. त्यांनी रचलेल्या एका पदात, शिवराज्याभिषेकाचे वर्णन आहे. त्यावरून शिवराज्याभिषेकाच्या त्या साक्षीदार होत्या असे म्हणता येईल .भक्त जन संत सज्जन। गोब्राम्हण प्रतिपाळाचे करती स्तवन ।अनंत कोटी ब्रम्हांड भूपाळ जमले। वेणी सोहळा पाहती । (श्री वेणी कवन आणि पंचीकरण पद – 24 ).
क्रमशः….
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
बुधगावकर मळा रस्ता, मिरज.
मो. ९४०३५७०९८७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈