श्री राजीव पुरुषोत्तम दिवाण
☆ विविधा : सागरतीरी – श्री राजीव पुरुषोत्तम दिवाण ☆
“सागरकिनारी”
मी परवा असाच एकटा समुद्राकाठी बसलो होतो. आजूबाजूला बरेचजणं होते,कोणी खेळत होते, हातात हात घेऊन एकमेकांच्या प्रेमात गुंतून गेले होते, कोणी भेळ खात होते वगैरे वगैरे !!!
जवळच एक जोडपं बसलं होतं,एकमेकांपासून बर्या पैकी अंतरावर…..बहूधा नवविवाहित आणि तेही arranged marriage वालं असावं. तो बोलत असताना तिची मान खाली आणि ती बोलत असताना त्याचे डोळे तिच्या चेहर्यावर थबकलेले.
थोड्या वेळाने दोघांनी एकमेकांकडे पहात पहात वाळूवर एकमेकांची नावे कोरली आणि पहात राहीले…. तो तिच्या नावाकडे आणि ती त्याच्या…..दोघेही भावी आयुष्यातील स्वप्नात जणू बुडून गेले होते. आजूबाजूला काय घडतंय याची त्यांना जाणीवही नव्हती….. असाच बराच वेळ झाला….आणि दोघेही अचानक भानावर आले………भरतीच्या लाटेनं कधी गाठलं ते कळलंच नाही. त्याच लाटेनं त्या जोडप्यानं कोरलेली नांवेही पुसून टाकली. दोघेही सावकाश उठले. हातात हात गुंफले… ती त्याच्या दंडावर डोकं टेकवून बिलगली आणि दोघंही चालू लागले.
मी मात्र सुन्न झालो होतो नि संतापलो समुद्राच्या या कृतघ्नपणाला…..खरंतर ते दोघेही माझे कोणीही नव्हते….तरीही मला वाटलं..त्या दोघांच्या नाजूक भावनांशी खेळायचा समुद्राला काय अधिकार???? आणि थेट समुद्रालाच तो सवाल ठोकला……
समुद्राला खळाळून हासू फुटलं….. आणि मला उत्तरला……अरे वेड्या, हे तुझ्या मनाचे खेळ आहेत. तुला काय वाटलं त्यांनी कोरलेली नावं माझ्या लाटेनं पुसून टाकली?? अरे, ते दोघे इथून जाताना पाहीलं नाहीस????
त्याने तीचा हात हाती घेतला….प्रेमानं आणि तीही त्याच्या दंडावर विसावली….विश्वासानं. यालाच संसार म्हणतात,हेच खरं प्रेम असतं,यातंच सार्या आयुष्याचं सुख दडलेलं असतं. तुला वाटत असेल माझी लाट भुसभूशीत वाळूवर रेखाटलेली नावं पुसून टाकते. अरे हट… इथून जाणारं प्रत्येक जोडपं घेऊन जातं असं प्रेम कि जे माझ्यासारखं अथांग आहे, तितकंच गहीरं आहे……ऊथळ नाही. काही कालानंतर हेच जोडपं पुन्हा इथं येईल, ते आपल्या चिमुकल्याला घेवून. त्यावेळी ते बांधतील वाळूत एक चिमुकलं घर….पुन्हा माझी लाट ते घर माझ्यात सामावून घेईल….पण ते आईबाबा नाराज नाही होणार कारण त्यांनी केलेलं घर विश्वास आणि प्रेमाच्या धाग्यांत घट्ट आहे. कोणतीही लाट ते उध्वस्त नाही करू शकणार……
पायावर आलेल्या लाटेच्या स्पर्शाने मी भानावर आलो…..खूप खूप सुखावलो…..आणि लक्षात आलं……समुद्र कधीच काहीच उध्वस्त करत नाही……उध्वस्त करतात ती माणसांना न कळलेली एकमेकांची मनं!!!!! आणि इतके दिवस जे मला वाटतं होतं कि कांहीतरी चुकतंय माझ …..आज अचानक मला जाणवलं….कांही नावं पुसून टाकण्यांन सुखाच्या लाटा आयुष्यात येत असतात.
हे सागरा…..शतशः धन्यवाद!!!
© राजीव पुरुषोत्तम दिवाण
बदलापूर(ठाणे)
फोन:९६१९४२५१५१
वॉट्स ऍप :८२०८५६७०४०
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈