सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
विविधा
☆ संत वेणास्वामी – भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
(सूर्याच्या लेकी या महाग्रंथासाठी निवड झालेला सौ.पुष्पा प्रभूदेसाई यांचा संत वेणास्वामी हा लेख क्रमशः ई-अभिव्यक्ती च्या वाचकांसाठी:)
गुरूंकडून संकेत मिळताच, वेणास्वामी कीर्तनासाठी उभ्या राहिल्या .समर्थांनी स्त्रियांपैकी, फक्त वेणास्वामींनाच, उभे राहून कीर्तन करण्याची आज्ञा दिली होती. वेणास्वामींनी आपल्या गुरुंना ,रामपंचायतन यांना वंदन केले .आणि आता झांजा वाजवायला सुरुवात केली. कीर्तनाचा पुर्वरंग सुरू झाला. श्रीराम जय राम जय जय राम. सियावर रामचंद्र की जय. मैंने राम रतन धन पायो।। वस्तू अमोलिक दी मेरे सतगुरू, करि करपा अपनायौ।। जनम जनमकी पूंजी पायी जगमे सबै खोवाऔ ।।
सद्गुरूंनी मला अमूल्य वस्तू दिली आहे. राम नाम रुपी रत्न हा जन्मजन्मांतरीचा ठेवा आहे. कीर्तन चालू असताना, समोर रामचंद्र आणि सद्गुरु दोघेही आहेत. सद्गुरूनी रामाची ओळख करून दिली ,त्यामुळे त्यांनी प्रथम गुरुदेवांना वंदन केले. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु ।।गुरूचा महिमा असा की त्याच्यासारखा सख्खा सोयरा कोणी नाही. त्यांच्याच कृपेने, रामनामाची अपार संपत्ती मला मिळाली आहे. ती अखंड अक्षय कुंभा सारखी आहे. पुढे कीर्तनात वेणास्वामींनी एक गोष्ट सांगितली. एक साधू बाबा होते .दुःखी लोक त्याच्याकडे येत. तेव्हा ते कागदावर राम नाम लिहून देत. व तो कागद पाण्यात घोळवून, आजाऱ्याला द्यायला सांगत. एकदा साधू नसताना त्यांच्या शिष्याने त्याप्रमाणे उपाय केला. साधू परत आले .त्यांना ही गोष्ट कळली .आणि राग आला. त्या साधूने शिष्याला सांगितले की, कोपऱ्यातला रंगीत दगड घे.इ आणि बाजारात जाऊन किंमत कर. एका बाईने, दोन मेथीच्या जुड्या ,बनिया ने एक रुपया, सोनाराने एक हजार रुपये, एका जवाहिऱ्याने एक लाख रुपये, दुसऱ्याने पाच कोटी, आणि राजाचा रत्नपारख्याने सारे राज्य अशी किंमत केली. अखेर त्या दगडाने लोखंडाचे सोने व्हायला लागले. साधूने सांगितले, तो पारसमणि आहे .त्याची किंमत कशी करता येणार! तसेच रामाचे नाम हे भव रोगाला नष्ट करणारे आहे .राम नाम मणि दीप धरू,जीह देहरी द्वार । तुलसी भीतर–बाहरी जो चाहसी उजियार ।।रामनामाचा दीप जिभेवर ठेवला तर आत बाहेर सर्वत्र प्रकाश पसरेल, असे तुळशीदास म्हणतात .कीर्तनाचा पूर्वार्ध संपला. समर्थांनी स्वतः वेणास्वामींना बुक्का लावला. आणि हार घातला .श्रीराम जय राम जय जय राम.
त्यांनी स्वतः विपुल काव्य रचना केलेली आहे. त्यांनी चार पाच पदे हिंदीतही केलेली आहेत. उत्तर भारतात ,आपल्या यात्रेत, हिंदुस्थानी भाषेत कीर्तन करून, अगणित लोकांना राम भक्ती मध्ये दीक्षित केले होते .त्यांनी मराठीमध्ये सीतास्वयंवर सारखे खंडकाव्य लिहिले आहे. भारतीय भक्ती साहित्यामध्ये खंड काव्याची रचना करणाऱ्या त्या प्रथम स्त्री साहित्यिक होत. इतकच काय तर त्यांनी मंगल, संकेत ,लवकुश, सुंदर, शब्द व भाषा नावाची सात रामायणे लिहिलेली आहेत. त्यांनी गुहाख्यान व कौल अशी आख्या नात्मक काव्येही लिहिली आहेत. कौल ही राम कथेमधील नवीन कल्पना आहे. त्यामध्ये त्यांची अनन्य भक्ती ,अध्यात्मिक उंची, तत्वज्ञानातील हुषारी, आणि सुरू दयता दिसून येते. यांच्या कीर्तनाचा उत्तररंग सुरू झाला. उत्तर रंगात सीतास्वयंवराचे वर्णन केले आहे. विश्वामित्रांचा यज्ञ यशस्वी होण्यासाठी, राम लक्ष्मण यांना ते घेऊन जातात, येथून सुरुवात केली आहे. वाटेत त्राटिका वध, अहिल्येचा उद्धार, मिथिले चे वर्णन ,आणि जनकाच्या दरबारातील शिवधनुष्य उचलण्याचा रामाचा पराक्रम या सर्व गोष्टी वेणा स्वामींनी ओघवती काव्यात लिहिल्या आहेत. ते वर्णन वाचताना डोळ्यासमोर सर्व गोष्टी उभ्या राहतात. स्वयंवराचे वर्णन तर अप्रतिम केले आहे. मंगल वाद्ये, वधू-वरांचे हळदी लावून स्नान ,नाना प्रकारची पक्वान्ने, फळांचे रस, वेगवेगळ्या वस्त्रालंकारांनी नटून आलेली सभा मंडळी, देवी, देवता ,वराती सह श्रीराम रथावर होते हे सांगताना त्या म्हणतात, ते कनक मणीची मिथिलापुरी। शृंगारिलिसे बहुपरी । राम पहाया नरनारी । मंदिर मस्तकी दुभागी ।। (सी. स्व ९..६६ ). शुभ प्रसंगी विवाह झाला. अगदी प्रत्येक घटनेचे वर्णन वेणास्वामिनी अत्यंत सुंदर शब्दात केले आहे .तीन दिवसांच्या पाहुणचारा नंतर एकमेकांना मोठमोठे आहेर दिले गेले .जनक पत्नी सुमेधा हिने विरहाने अश्रू पुसत, सीतेला उपदेश केला. सर्वांचे रथ आयोध्ये ला आले. आयोध्या नगरीचे वर्णनही खूप छान केले आहे. वेणास्वामी संपूर्ण वर्णन करण्यात रममाण झाल्या. त्या अखेर म्हणाल्या, या रामकथेचा कर्ता रामच आहे, हे गुह्य मी स्वतःच जाणते.” हे बोलणे येथार्थ । कर्ता राम याचा समर्थ । कोणा सांगो हा गुह्मार्थ । माझा मीच जाणे। ( सी. स्व. १४..१४९ ) . हे राघवाची कथा । कर्ता मी नव्हे सर्वथा । सत्य आवडले समर्था । ग्रंथ प्रसिद्धी पावला ।। (सी. स्व.१४..१५० ).
वेडा स्वामींनी गर्जना केली, “जय जय रघुवीर समर्थ “आणि “श्रीराम जय राम जय जय राम” असा जप करत त्या तल्लीन होऊन नाचू लागल्या. डोळे मिटले. पखवाली च्या तालावर त्यांची गती वाढू लागली. राम नाम घुमू लागले. स्वतःला त्या विसरून गेल्या. थकून खाली कोसळल्या. त्या जागी समर्थांचे चरण होते. आपले प्राण गुरुदेवांच्या चरणी अर्पण केले. मावळत्या सूर्याच्या साक्षीने, आत्मा परमात्म्यात मिळून गेला. सीतास्वयंवराच्या अख्ख्यानाच्या कीर्तनाचा पूर्णविराम झाला. ( चैत्र वद्य १४ शालिवाहन शके १६०० इसवी सन १६७८ )श्री समर्थांनी वेणास्वामींच्या देहास अग्नी दिला.
संत वेणास्वामी लेखमाला
समाप्त
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
बुधगावकर मळा रस्ता, मिरज.
मो. ९४०३५७०९८७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈