सौ. दीपा नारायण पुजारी
विविधा
☆ सामान्यातील असामान्यत्व ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆
काल मी कृष्णा काकांकडं गेले होते. काका काकू बाहेर जाण्याची तयारी करत होते. त्यांची लगबग बघून मी न राहवून चौकशी केलीच. काका काकू चिनूच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनाथाश्रमात मुलांना लाडू वाटायला चालले होते.
नोकरी च्या निमित्तानं परदेशी राहणाऱ्या नातवाचा वाढदिवस साजरा करण्याची ही कल्पनाच किती अभिनव आहे, नाही का ? आमच्या काका काकूंनी मुलगा जवळ नसताना सुद्धा वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला. कितीतरी जणांच्या चेहऱ्यावर तो परावर्तित झालेला बघितला!
पुण्यातील एक सद्गृहस्थ आपल्या मुलाच्या निधनाचं दु:ख विसरून अनेक अनाथ मुलांना आपलं घर देतात, त्यांना आश्रय देतात. अशी माणसं मला सामान्य असूनही असामान्य वाटतात. या देवदूतांना प्रसिध्दी नको असते. हारतुरे नको असतात. पेपर मध्ये फोटो किंवा बातमी नको असते. त्यांना फक्त आनंद वाटायचा असतो. समाधान पेरायचं असते. स्वतः बरोबर आजूबाजूला सुख पसरवायचं असतं. प्रसिध्दी, पैसा, अहंकार मोठेपणा त्यांच्या आजूबाजूला फिरकतही नाहीत. या सगळ्या पलिकडं ते पोचलेले असतात. म्हणूनच इतरांपेक्षा वेगळे दिसतात.
असामान्य होण्यासाठी मोठं कार्यच करायला पाहिजे असं नसतं हं. मोठेपण अंगी बाणवायला यातना ही सोसाव्या लागतात. ती असामान्य व्यक्तिमत्वं लाभलेली माणसं तुमच्या आमच्यासारखी असूनही वेगळी असतात.ते सगळ्यांना शक्य नसतं. परंतु छोट्या छोट्या गोष्टीतून आपण कुणालातरी मदत करु शकतो. कुणाला तरी हसवू शकतो, उदास मनाला आनंद देऊ शकतो. बघा हं. अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत. आपल्या बहुतेकांच्या घरी खूपसा खाऊ असतो, नको असलेले जास्तीचे कपडे असतात. हेल्थ कॉन्शस असलेले आपण इतका खाऊ संपवू शकत नाही. काकूंच्या प्रमाणं मुद्दाम करुन नाही जमणार कदाचित, पण असा जास्तीचा खाऊ ; ताजा, चांगला असतानाच गरजूंना का वाटू नये बरं? जसं खाण्याच्या पदार्थांचं, तसंच कपड्यांचं! आजकाल कपाटात मावत नाहीत एवढे कपडे असतात नं बहुतेकांच्या जवळ! ते जुने होण्यापूर्वी, फाटण्यापूर्वी दिले गरजूंना तर? अगदी सुधा मूर्तीं इतका साधेपणा नाही जमला तरी , त्यांचं थोडंसं अनुकरण करायला काय हरकत आहे? बघा बरं, अशा वागण्यानं कसं समाधान मिळतं ते. आनंद, समाधान, या भावना संसर्गजन्य आहेत. त्या परावर्तीत होतात. आणि त्या परावर्तनाचा एक सूक्ष्मसा किरण आपल्याला होता आलं पाहिजे.
आनंदाचे डोही आनंद तरंग. अंतर्मनात जेंव्हा असा आनंद भरलेला असतो, मनाचा डोह आनंद गान गात असतो तेंव्हा अगदी सहजपणं आनंद तरंग उठत असतात. त्यांचा भवताल ही आनंदानं डोलत राहतो.
निर्व्याज समाधान मिळवण्यासाठी पैसे खर्च लागत नाहीत. असं सिद्ध करणारे अनेक सामान्य लोक या जगात आहेत. एक भांडी घासणाऱ्या बाई आपल्या झोपडीवजा घरात दहा बारा अनाथ मुलांच संगोपन करतात. त्यांच्या शिक्षणासाठी धडपडतात. त्यांना एकवेळेला पोटभर खाऊपिऊ घालतात.मग ती साधी चटणी भाकरी का असेना. एवढा उदात्तपणा राजेशाही बंगल्यात राहणाऱ्या श्रीमंतांच्या कडंही नसतो.अशी अनेक उदाहरणे आहेत जी सहजपणे समाजकार्य करतात. उजव्या हाताने केलेली मदत डाव्या हाताला कळूही न देता अविरतपणे घेतला वसा सुरू ठेवतात. या सर्वांना माझे दंडवत. साने गुरूजींच्या या धर्माचे आचरण करण्याचा निदान एक लहानसा का होईना प्रयत्न अवश्य करुया. . . . . .
जगी जे दीन पद दलीत
जगी जे हीन अतीपतीत
तया जाऊन ऊठवावे
जगाला प्रेम अर्पावे
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
© सौ. दीपा नारायण पुजारी
इचलकरंजी
9665669148
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈