? विविधा ?

☆ सद्गुरू कशासाठी हवा? ☆ संकलन – श्री मनोज लिंग्रस ☆

सद्गुरू कशासाठी हवा ?

महाभारतातलीच एक कथा आहे.

द्रौपदी स्वयंवरात सर्व राजे, युवराज आपापलं कौशल्य पणाला लावून मत्स्यभेद करण्याची पराकाष्ठा करीत होते.

पणही विलक्षणच होता!

उंच छताला एक चक्र फिरत राहणार. त्याच्या एका आरीवर लाकडी मासा बांधलेला. ते चक्र फिरत असतांना नेम साधून त्या माशाच्या डोळ्याचा भेद करायचा.

उ:! एवढंच?

नाही! ते तर कुणीही करेल! इथे तर एकाहून एक निष्णात धनुर्धर उपस्थित होते!

अन् स्वयंवर साक्षात याज्ञसेनीचं! सर्वच प्रतिस्पर्धी इरेस पेटलेले!

पऱंतु खरी मेख पुढेच होती!!

नेम सरळ माशाकडे बघून धरायचा नव्हता. खाली भलंमोठं तसराळं पाणी भरून ठेवलं होतं. वर मासा लावलेलं चक्र फिरत असतांना खाली तसराळ्यात बघून नेम धरायचा होता अन् माशाच्या डोळ्याचा वेध घ्यायचा होता!

इथेच सर्वांचा हिरमोड झाला होता. नीट नेम धरणारे भले भले पाण्याच्या तरंगांमुळे चक्क पराभूत झाले होते. एकेक धुरंधर हताश होऊन परतलेत.

लक्ष्यभेद करायला अर्जुन पुढे सरसावला. एक क्षण त्याने कृष्णाकडे बघितलं.

कृष्णानी खूण करून त्याला निकट बोलावलं.

सूचना केली,

“हे बघ, मन शांत ठेव.

नीट वीरासन घाल. धनुष्यावर बाण चढव, प्रत्यंचा ओढल्यावर हात स्थिर ठेव. पापणी सुध्दा लवू देऊ नकोस! नेमक्या क्षणी तीर सोड – बाकी मी पाहून घेईन.”

अर्जुन हासला.

“काय झालं? कां हसलास?”

“कृष्णा, वीरासन मी घालणार, नेम मी धरणार, तीर पण मीच सोडणार. तुला करायला बाकी उरलं काय रे?”

आता स्वत: कृष्ण हसलेत.

“पार्थ, हे सर्व तुलाच करायचंय. मी फक्त तेवढंच करणारे जे तुला नाही जमणार.”

“हु:! अन् ते काय असणारे?”

“सांगू? जमेल तुला?”

“सांग बघु…”

“त्या तसराळ्यातलं पाणी स्थीर ठेवण्याचं काम माझं”

एक क्षण विचार केल्याबरोब्बर अर्जुन शहारला! सावध झाला!

दुस-याच क्षणी डोळे मिटले. मनोमन कृष्णाला वंदन करून पण जिंकायला आत्मविश्वासाने पुढे सरसावला. पुढे काय झालं सर्वांनाच माहितीये!

हरिकृपेचा महिमाच असा असतो! त्याची सोबत होती म्हणुन पाचांच्या केसालाही धक्का लागला नाही. अन् त्याचीच सोबत नव्हती, तर शंभरातला एकही वाचला नाही…………

संकलन – मनोज लिंग्रस

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments