सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ सण,परंपरा आणि वर्तमान… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

काल हरतालिकेचा सण होता. हे दिवसच मुळी उत्साहाने सणवार साजरे करण्याचे. हरतालिका असूनही बँकेला सुट्टी नसल्याने घरचं आवरुन,पुजा ,नमस्कार,नैवेद्य आटोपून बँकेला निघाले. परंतु मस्त सणाचा दिवस असूनही समोरचे दृश्य बघून मनं खट्टू झालं, वाईट वाटलं,खरचं शिक्षणाने,प्रगतीने माणसात सुधारणा होण्याऐवजी तो अधिकाधिक बिघडतच चालला आहे हे समोरचे दृश्य बघून लगेच लक्षात आलं.

आमच्या काँलनीमध्ये बरीच झाडं आहे. त्यामध्ये फुलझाडांचा सुद्धा समावेश आहे. मग हरतालिकेच्या पूजेचे निमित्त करून काही स्त्रिया आणि मुली अक्षरशः पत्री आणि फुलं ह्यासाठी अख्खी झाडच्या झाडं ओरबाडीत होत्या. बर चार शब्द समजावण्याचा प्रयत्न केलाही असता जर त्या स्त्रिया काँलनीतील वा पाहणीतील असत्या तर. खरचं जिवंत झाडांना रक्तबंबाळ करून स्वतःवर फुलं,पत्री वाहून घेणं देवाला तरी आवडेल का हो ?

मी तरी स्वतः नियम घालून घेतला आहे फक्त एक बिल्वपत्र  आणि एक फूल सगळ्या पूजांच्या वेळी वहायचं.मला खात्री आहे माझा महादेव हा एकशे आठ बिल्वपत्रांपेक्षाही माझ्या एका बिल्वपत्रातच संतोष पावेल.

काळ बदलला की सुधारणा ह्या होतात. पण सुधारणा ह्या फक्त हक्क मागणं,बरोबरी करणं, अरेतुरे संबोधणं, न बघणेबल वस्त्र परिधान करणं, व्यसनांमध्ये पुरुषांच्या वरचढ होऊ बघणं, स्वातंत्र्याचा गैरवापराने वरचढ स्थान मिळवणं ह्या नसून आपल्या मानसिकते मध्ये चांगला,सकारात्मक बदल करणं,काळ बदलला की थोडाबहुत चांगला बदल करणं, स्वतःची सामाजिक उन्नती, उत्कर्ष ह्याकडे लक्ष देणं ह्याला सुधारणा म्हणावं हे समजायला हवं.  पण कुठल्याही व्यक्तीने बदलेल्या काळाचा, झालेल्या बदलांचा, सोयीस्कर सुधारणा हे लेबल वापरण्याचा जर आपल्या सोयीचा अर्थ लावून आपल्या सवयी सुरू ठेवल्या तर समाजाचा -हास,अनर्थ हा अटळ.

काही मुली म्हणतात हे पूजेला पत्री,फुलं तोडणं जुन्या पिढीकडूनच आम्ही शिकल़ो तर ह्यावर उत्तर असं, जुना काळच वेगळा, झाडांच्या रुपात तेव्हा विपुल नैसर्गिक संपत्ती होती, शिक्षणाचा अभाव होता, वेळेची मुबलकता होती आणि मुख्य म्हणजे ह्या निमित्ताने त्या स्त्रियांना चार भिंतीबाहेर पडायला मिळायचे.

उपवासांचे ही तसेच. पुर्वी मनावर धार्मिक रुढींचा खूप पगडा होता. अंधश्रद्धेच जाळं खूप फोफावलं असायचं, स्त्रिया स्वतःच्या प्रकृती विषयी काळजी न घेता त्याबद्दल अनास्था बाळगतं. साधकबाधक आहार, प्रकृती ह्या विषयी अज्ञान होतं .पण आता काळ बदललायं. स्त्रियांना शिक्षणामुळे आहार, प्रकृती ह्याविषयी माहिती उपलब्ध होते.त्यामुळे आपल्या वयानुसार  प्रकृती ला, झेपतील त्या पद्धतीने उपवास करावेत.

ह्या सणांच्या निमित्ताने जपल्या जाणाऱ्या परंपरा व आधुनिक धार्मिकता ह्यामध्ये सांधून पण कुठलेही टोक न गाठता सुवर्णमध्य साधला जाऊ शकतो ह्याचं भान आलं खरं.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments