सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
विविधा
☆ सावधानता… भाग ४ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
प्राणी मात्रांच्या सावधपणाची किती उदाहरणे द्यवी तितकी कमीच आहेत. त्सुनामी आली ,त्यावेळी प्राण्यांना त्सुनामीची आधी जाणीव झाली होती. भूकंप होणार याची जाणीव मानवाच्याही आधी जंगली प्राण्यांना, पशूपक्ष्यांना आगोदर होते. त्यांचे वर्तन बदलते. पाऊस येणार असल्याची जाणीव पतंग किड्यांना आगोदर होते. बर्याच संख्येने ते दिव्याजवळ येतात .निसर्गात प्राणी आणि पक्षी सावध असतातच.पण झाडांना देखील सावधपणा असतो. संवेदना असतात.हे प्रयोगाने सिद्ध झाले आहे.
हे सगळं लिहीत असताना मला घरातलेच अनुभव आठवले. आमच घर शेतात एकाकी अस होत.टाँमी आणि बंड्या असे दोन कुत्रे, एक जयू गाय,टिट्या, गोट्या असे दोन भाऊ भाऊ बोके,पोपट आणि आम्ही असे आमचे कुटुंब होते. बर्याच वेळा शेजारच्या पोल्ट्रीतील खाद्य खाण्यासाठी उंदीर यायचे.आणि उंदरांना धरण्यासाठी सापही यायचे. साप आला की, कोंबड्या सावध व्हायच्या.कोंबड्यांचा आरडाओरडा आणि फडफडाट चालू व्हायचा. आणि आम्हाला सापाची जाणीव करून द्यायच्या.भोवती शेती असल्याने साप, विंचू, सरडे, मुंगूस ही असायचे. आमचे दोन्ही कुत्रे साप दिसला की वेगळा आवाज काढायचे. चोर दिसला की वेगळा आवाज काढायचे. त्यांच्या टोनिंग वरुन आम्हाला सावध करायचे. दोन्ही बोके कुठेतरी दबा धरून बसलेले दिसले की, ओळखावे. इथे पाल, उंदीर काहीतरी नक्की आहे. कठून शिकले असतील हा सावधपणा?कित्येकदा घरात माझ बाळ रडत असलं तरी आमचा टाँमी मला कूं कूं करून सांगायचा .सावध करायचा.”लक्ष्य आहे की नाही, बाळ रडतय”.बाळाला तिर्हाइतानं कुणी घेतलेल त्याला आजिबात आवडायचं नाही. परका कोणी घेतो की काय ,याबाबत तो फार सावध असायचा.त्याच्या सावधपणाचे किती कौतुक करावे, आणि किती अनुभव सांगावेत, तितके कमीच आहेत. आयुष्यभर त्यांच्या उपकाराची फेड होणार नाही.
अनेक उपकरणे, अनुभव, प्रयोग यांच्या सहाय्याने प्राणी वर्तन, त्यांच्यातील सजगता, सावधानता यांचा अभ्यास करता येऊ लागला आहे. व प्राण्यांचे मानसशास्त्र ही एक नवीन शास्त्रशाखा उदयाला आली आहे. याचा प्रत्येकाने जरूर अभ्यास करावा,असे वाटते.
– समाप्त –
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
बुधगावकर मळा रस्ता, मिरज.
मो. ९४०३५७०९८७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈