सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)
विविधा
☆ ☘️ ही तर निसर्ग पूजा 🌿 ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆
विविध रंगांच्या आतषबाजीने, रंगलेली, प्रकाशलेली दीपावली हा प्रकाशाचा सण संपत आलेला. आता त्याची गडबड संपलेली. तिखट गोड पदार्थांची सुस्ती जाणवते. आज दुपारीच मी तुळशी वृंदावन साफसूफ करून थोडं पाणी घातलं आणि वृंदावनही रंगून ठेवलं.तसं तर वसुबारसे पासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत दिवाळी असते.या दीपोत्सवाची तेव्हाच सांगता होते . कार्तिक शुद्ध एकादशी पासून तुलसी विवाह सुरू होतात ते पौर्णिमेपर्यंत. त्यानंतर लग्नाचे मुहूर्त असतात .आधी देवाचं लग्न त्यासाठी तर वृंदावन छान रंगवलं.ऊसाचे खांब करुन,मांडव सजवायचा आणि छान आरास करायची .तोरण बांधायचं. देव्हाऱ्यातला बाळकृष्ण वृंदावनात तुळशीजवळ ठेवायचा. तुळशीची , बाळ कृष्णाची पूजा करायची पण त्याआधी सुपारीच्या गणपतीच प्रथम पूजन!
तुळशीला, बाळ कृष्णाला नवीन वस्त्र वस्त्र घालायची तुळशीच्या हातात म्हणजे फांद्यांना हिरव्यागार बांगड्या घालायच्या. मंगलाष्टक म्हणून अक्षदा वहायच्या की झालं तुळशीचं लग्न. मग फटाके उडवायचे वाजंत्री म्हणून. मणी मंगळसूत्र तुळशीला वहायच.म्हणजे फांदीवर अडकवायचे.फणी करंडा, आरसा ,खण पुढे ठेवायचा.तुळशीची ओटी भरायची.आरती करायची.मनोभावे नमस्कार करायचा.असा हा विवाह सोहळा म्हणजे आनंदोत्सवच! जणू घरच्या लेकीचा विवाहसोहळा.
आमच्या लहानपणी तुळशीचं लग्न लावायला भटजी यायचे. दादा म्हणजे माझे वडील रेशमी कद नेसून तर आई रेशमी जरीची साडी दागिने घालून नटायची .जणू त्यांच्याच लेकीचं लग्न आणि करवली म्हणजे मी नटून थटून तबकात तेवत्या निरांजनांचा. करादिवा घेऊन वृंदावनाच्या मागे उभी राहायची. भटजी अंतर पाठ धरायचे अन मंगलाष्टक म्हणायचे .आईची नैवेद्याची धांदल ,भावंड नव्या कपड्यात ,झाडं-चक्र,अशा आतषबाजीच्या तयारीत असायची.
शेजारचे सगळे यायचे ते व-हाडी म्हणूनच. धुमधडाक्यात, फटाक्यांच्या आवाजात तुलसी विवाह व्हायचा. बायकांना हळदी कुंकू द्यायचे .सर्वांना साखर खोबऱ्याचा, पेढ्याचा प्रसाद वाटायचा. पान सुपारी द्यायची. ते दिवस वेगळेच होते.
लग्नानंतर आम्ही दारातल्या तुळशीचं लग्न कधी चुकवलं नाही ,घरच्या घरी लग्न लावायचो.आमची लेक करवली व्हायची .हा दिवस साधून सगळ्यांना फराळाचं आमंत्रण करायचो.
आता काळ काम वेगाच्या चक्रात सगळ्यांना हे एवढं जमतच असं नाही हे मात्र खर आहे.
आपले सगळे सण उत्सव धार्मिक असले तरी शास्त्रीय तत्वावर आधारलेले असतात .ओटी भरायची तुळशीची तीही चिंचा, आवळे ,बोरं अशा मोसमी फळांनी. आता तुळशीच पहा, पानं , खोड ,मंजि-या या सगळ्यांचे आयुर्वेदात औषधी गुणधर्म आहेत.या विवाह सोहळ्यामुळे आपण तुळशीजवळ किती वेळ बसतो मनांपासून सगळी पूजा करतो . ही मनाची प्रसन्नता आपल्या आरोग्याला पोषकच आहे.
विवाह सोहळा संपन्न झाला आणि नातवंडांनी फटाक्यांची माळ लावली.
खरंच दिव्यांच्या रोषणाईत उसाच्या मांडवात विवाह वेदीवरील अंगभर मंजिऱ्यांनी डवरलेली तुळस कशी साजरी दिसत होती. अगदी नव्या नवरी सारखी..! हळदी कुंकू आणि नंतर प्रसाद वाटप झालं.बाळकृष्ण- तुळशीला नमस्कार करताना नकळत डोळे ओलावले. आज केवळ वेळ नसला तरी कुंडीतल्या तुळशीजवळ देव्हाऱ्यातला बाळकृष्ण ठेवून नुसतं हळदीकुंकू वहावं.अक्षता टाकाव्यात. सौभाग्याचं म्हणजे केवळ सुवासिनीचंच असं नाही संपन्नतेच भाग्याचं दान मागाव. श्रद्धेन एवढं जरी केलं तरी ही हरिप्रिया नक्कीच प्रसन्न होईल आरोग्याचं वरदानही देईल.
© शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड-पुणे.३८.
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈