मराठी साहित्य – विविधा ☆ ‘ हाव ‘. . . एक बांडगूळ. . ! ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆  ‘ हाव ‘. . . एक बांडगूळ. . ! ☆ श्री अरविंद लिमये ☆

हाव. दिसायला दोन अक्षरी एक साधा शब्द, पण त्यात नकारात्मक अर्थांचे विविध छटांचे रंग ठासून भरलेले. . ! कांही हवं असणं आपण समजू शकतो, पण अंत नसलेलं ‘आणखी हवं’ ही उध्वस्ततेची सुरुवात ठरते. आणखी हवं असणं म्हणजे हव्यास. हव्यास म्हणजे विध्वंसाची ठिणगीच जणू. कारण कोणत्याही हव्यासाचं असणं परोपकारासाठी, जनसुखाय -जनहिताय कधीच नसतं. ते तसं असूच शकत नाही. ते असतं स्वत:साठी, . . स्वार्थासाठी. ! म्हणूनहव्यासाची परिणती अर्थातच विनाश हेअपरिहार्यच. खरं तर विश्व निर्माण झालं तेव्हाच निसर्गनियमही अस्तित्वात आले. हे नियम निसर्गातले सर्व घटक काटेकोरपणे पाळत असतात. अपवाद फक्त माणसाचा.  पैसा, पद, प्रतिष्ठा, सुख यांच्या हव्यासापायी निसर्गाचे सगळे नियम धाब्यावर बसवण्याच्या सुरुवातीचा पहिला क्षणच विनाशकाले विपरीत बुध्दी ठरला.  आपलं जगण्याचं निसर्गाला अपेक्षितच नव्हे तर अभिप्रेतही असलेलं प्रयोजनच माणूस विसरुन गेला आणि विनाशाच्या दिशेने त्याचा प्रवास सुरु झाला.

निसर्गाने माणूस निर्माण केला आणि त्याला बुध्दीचं वरदान दिलं. त्या बुध्दीचा  सर्व निसर्गघटकांच्या हितासाठी त्याने योग्य उपयोग करणे अपेक्षित होते. पण हव्यासाच्या अतिरेकामुळे सुखासमाधानाच्या मृगजळामागे धावता धावता निसर्गानेच दिलेलं बुध्दीमत्तेचं कोलीत हातात घेऊन सर्वाना प्रकाश दाखवणे अपेक्षित असताना अतिरेकी हव्यासामुळे माणूस ते क़ोलीत घेऊन सगळा निसर्गच जाळत सुटलाय.

माणसाचं हे अनैसर्गिक जगणंच त्याला आज विनाशाच्या अखेरच्या वाटेवर घेऊन आलंय.

निसर्गाला अपेक्षित असणारं  माणसाचं ‘ जगणं’ हे एका अतिशय सुखी, समाधानी, समृध्द,  सुंदर अशा जगाच्या निर्मितीला निमित्त झालं असतं.  एरवी अगदी सहज वास्तवात येऊ शकलं असतं असं ते सुंदर जग आज माझ्या मनात मला स्वच्छ दिसतंय, पण. . स्वप्नवतच.  म्हणूनच ते रुखरूख वाढवणारं ठरतंय. काहीतरी निसटून गेल्याची रुखरुख.  निसर्गाला अभिप्रेत असलेल्या त्या सुंदर जगाचं दर्शन   तुमच्याही मनात ती रुखरुख निर्माण करेल आणि कदाचित नव्या वाटा शोधण्याची असोशीही. . . . !

कसं आहे हे हवंहवंस जग?हे जग आणि अर्थातंच इथलं जगणंही अतिशय निरामय

आणि  सुंदर आहे. या जगात माणुसकी हा एकच धर्म अस्तित्वात आहे. ॐकार हाच प्रत्येकाचा देव आहे. घरं मंदिरासारखी पवित्र आहेत आणि त्या घरांऐवजी प्रत्येकाच्या मनामधे देव्हारे आहेत. त्या देव्हार्यात ॐकाराची पूजा नित्यनेमाने होते. नीतिनियमांनुसार आचार हे प्रत्येकाचे व्रत, आणि त्यातून मिळणारं समाधान हा पूजेचा प्रसाद. . !निसर्गाचे सर्व नियम इथे सर्वानी मनापासून स्विकारलेत. त्यामुळे निसर्गालाही कृतकृत्य वाटतेय. त्यामुळे निसर्ग छान खुललाय. फुललाय. निसर्गचक्राचा स्वत:चा ताल, वेग सर्वांसाठीच हवाहवासा, आनंददायी ठरतो आहे. निसर्ग प्रसन्न आहे, त्यामुळे माणसेच नव्हे, तर मनुष्येतर प्राणीही अतिशय समाधानी आहेत. माणसांनी त्याना अभयारण्यांऐवजी अभयच देऊ केल्यामुळे मानवाचा अधिकार त्यानीही मनापासून स्विकारलाय आणि स्वत:च्या अरण्यकक्षेत ते आनंदाने जगतायत. माणसांचं नागरी जीवन त्यामुळे भयमुक्त आणि श्वासोच्छवासासारखं सहजसुंदर आहे. पृथ्वीच्या अंगाखांद्यावरचं जनसंख्येचं अतिरिक्त ओझं आता कमी झालंय. त्यामुळे पृथ्वीसुध्दा निरोगी आणि नीतिमान माणसांचं आस्तित्व अलंकारांसारखं मिरवतेय. . . !

या जगात प्रत्येकजण सुखी आहे आणि समाधानीही. . !

प्रत्येकाला स्वत:च्या कुटुंबाचं असं घर आहे. ते एकमजलीच आहे. घरापुढे प्रशस्त अंगण आहे आणि फुललेली हसरी बागही. त्या बागेतल्या गोड,  रसाळ फळांसारखाच प्रत्येकाचा संसार आहे.

रस्तेआहेत आणि ते स्वच्छ, चकचकीत आहेत. पादचार्यांसाठी खास अभयरस्ते आहेत. वाहनांसाठी अर्थातच वहातुकीचे वेगळे रस्ते. त्यामुळे रस्त्यातून चालणं आणि वहान चालवणंही आनंददायी आणि निश्चिंत आहे.

एकमजली बैठ्या घरांमुळे सूर्यही प्रसन्न आहे. त्याच्या आनंदप्रकाशी किरणांतून पसरणार्या प्रकाशाची कोणत्याही अडसरावीना आता मुक्त उधळण होऊ शकतेय. त्यामुळे या वातावरणात भरुन राहिलेल्या सौरशक्तीवरच सर्व वाहने चालतायत. त्यामुळे संपूर्ण निसर्गच प्रदूषण, धुराचा वास, आणि सहवास यापासून पूर्णपणे मुक्त आहे. शाळा आहेतच, त्याना प्रशस्त पटांगणेही आहेत. घरांसारख्या शाळाही नैसर्गिक संस्कारकेंद्रे आहेत. मुलं फुलांसारखी सुंदर आहेत. त्याना शाळा घरांइतक्याच प्रिय आहेत. . !

कौटुंबिक पार्श्वभूमीवर श्रमविभागणी आहे. नेमून दिलेली सर्व कामे प्रत्येकालाच आळीपाळीने करावी लागतात. तिथे स्त्री, पुरुष, मुलगा, मुलगी याऐवजी प्रत्येकाचा एक व्यक्ती म्हणूनच विचार होत असल्याने सर्वानाच सर्वप्रकारच्या कामांचं कौशल्य अंगी बाणवणं शक्य होतं. या जगात वृध्दांचं वार्धक्य तरुणांच्या निगराणीखाली कृतार्थ आहे. . !इथे मरणही आहेच, आणि ते  जगण्याइतकंच सुंदरही आहे. कारण ते भयमुक्त आहे. निसर्गनियमांनुसार योग्यवेळी येणारा हा मृत्यू अट्टाहासाने कांहीही करून जगण्याचा हव्यास नसल्याने कृतार्थही आहे. आणि म्हणूनच पुन्हा सळसळत्या जीवनाचा उपभोग घेण्यासाठी टाकल्या जाणार्या कातीसारखि तो सहजसुंदर आहे.

हे स्वप्नवत वाटेल सगळं, पण हे वास्तवात उतरणं अशक्य नसणारं स्वप्न आहे. मात्र सर्व स्तरांवर फोफावलेल्या हव्यासांची बांडगुऴं हाच यातला एकमेव अडसर आहे. . !त्या बांडगुळाचा नाश करायचा की फक्त जिवंत रहाण्यासाठी घुसमटत जगायचं या प्रश्नाचं योग्य उत्तर शोधता आलं,  तरच स्वप्न आणि वास्तवातली सीमारेषा पुसली जाईल. . !

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈