सौ. शशी नाईक-नाडकर्णी
☆ विविधा ☆ हे चित्र आणि ते चित्र ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆
मला लग्न जमवायची आवड बरीचशी नात्यांतली लग्न मी जमवली.
मी आणि ती जोडपी पण यशस्वी झाली.आनंदी सुखी समाधानाने नांदतात. हे मैत्रिणीकडून कळल्यावर मीराताई त्यांच्या दोन्ही मुलांचे फोटो, जुजबी माहिती घेऊन माझ्याकडे आल्या
म्हणाल्या, “आमच्या मधुरासाठीं चांगलेसे स्थळ सांग बाई. माझी लाडांत वाढलेली लेक, करियरवाली, हुशार आहे थोडी गहुवर्णी आहे. पण स्मार्ट आहे. उंचीला कमी आहे पण बुटक्यातली नाही. हिल्स घालून काय चालते ती टकाटक. आमच्या फार काही अपेक्षा नाहीत. पण तिला अनुरुप, हुशार, तिच्यापेक्षा जास्त शिकलेला. जास्त मिळकत असलेला. ह्या तर किमान सगळ्याच मुलींच्या अपेक्षा असतात. पण मुख्य म्हणजे त्याचा स्वतःचा मोठा फ्लॅट पाहिजे. घरी माणसांचा त्यातून वयस्कर माणसांचा फाफट पसारा नको. सासू सासरे असतील तर चालतील. पण कसे दुसरीकडे रहाणारे असले तर बरे म्हणजे वेळा काळाला एकमेकांना उपयोग होतो हो. पुढे बाळंतपण, लहान मुलांच्या कुरबुरी, आजारपण हल्लीच्या आईवडिलांना कुठे जमतयं त्यांच्या नोकरीधंद्यात. शिवाय नातंवंडावर प्रेमं, संस्कार आजीआजोबाच चांगले करतात. पुन्हा दोन्ही पिढ्या वेगळ्या रहात असल्या की बरं. बरं आपापल्या घरी आनंदात रहातील. एकमेकांना बंधन नाही. भांड्याला भांडं नको लागायला. असं आपलं मला वाटतं.
माझ्या मधुरेनी साडी कधीच नेसली नाही आणि नेसणार पण नाही म्हणते जीन्स आणि टॉप कसे सोईस्कर वाटतात. तशाच मॉड विचाराची माणसं पाहिजेत बाई. मग वाद नकोत. तसेच तिला रोजच्या स्वयंपाक बनवण्याची आवड नाही. आणि येत पण नाही. कारण आमच्याकडे स्वयंपाकाच्या काकू आज किती वर्ष तरी आहेत. त्यामुळे हिच्यावर कधी वेळच आली नाही. आता सासरी हल्ली काय सगळ्याकडेचं नोकरचाकर असतात. आणि हल्ली मुलांना काय ग पिझ्झा, बर्गर झिंदाबाद. मधुराचे डीटेल्स तुला सांगितले. अनुरुप असाच मुलगा बघ बाई माझ्या मधुरासाठी”.
“बरं तिचा फोटो, डिटेल्स मला व्हाट्सेप वर फॉरवर्ड करा. मी बघते.” मी म्हटलं
“बरं आता दुसरं म्हणजे माझ्या मानस साठी पण एक चांगलीशी मुलगी बघ. तिच्याबद्दल पण आमच्या काही फार अपेक्षा नाहीत. अगदी चार चौघांसारख्या माफक.
माझा मानस तू बघितला आहेस. हँण्डसम, शिकलेला, नम्र. तशीच सुंदर, शिकलेली, मनमिळाऊ, समजूती, स्मार्ट मुलगी त्याला बायको आणि आम्हाला सून म्हणून हवी.
आम्हाला माणसांची आवड आमच्याकडे माणसांचं येणंजाणं, असते. त्यांचं हसतमुखानं स्वागत, त्यांची उठबस करणारी पाहिजे. बरं माझ्या सासूबाई आता 80 वर्षाच्या आहेत. घरांत त्यांच्यासमोर तरी ती साडीत वावरली पाहिजे. बाहेर मानसबरोबर फिरताना काहीही घालू दे. माझं काहीही बंधन नाही. सासूबाईंच सोवळंओवळं कडक आतापर्यंत मी सांभाळले. पण आता बाई माझ्याच्यानं झेपत नाही. माझी सून आली म्हणजे कसं मी सुटले. ती हाताळेल ना सासूबाई प्रकरण. आणि त्याचं सोवळ॔ओवळं. हो आणि एक, अगदी सुगरण नसली तरी चालेल. पण रोजचा स्वयंपाक कधी, सणावारी गोडधोड करायला तिला आलं पाहिजे. ह्यांना, मानसला स्वयंपाकीण काकूंच्या हातचं आवडत नाही. दोघेही ते खाऊन खाऊन कंटाळले.सूनबाई आल्यावर कसं ती करेलच की शिवाय काकू हाताखाली आहेतच ग.मग काय मुख्य स्वयंपाकाला कितीशी मेहनत आणि वेळ लागतो. कधी संकष्टीला मोदक तर सणावाराला कधी पुरणपोळी. रविवारी चिकन किंवा चिंबो-या केल्या म्हणजे झालं. आता बाबा माझा किचनला रामराम.
तर अशी दोन माणसं जावई आणि सून मनासारखी मिळवून द्यायची जबाबदारी तुझी.
पाहिलंत ना. हे चित्र आणि ते चित्र.
© सौ. शशी नाईक-नाडकर्णी
फोन नं. 8425933533
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
शानदार व्यंग