श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “दुखणं… वैयक्तिक, कौटुंबिक, आणि राजकीय…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
दुखणं या बद्दल काय सांगायचं. समज आली की दुखणं जाणवतं. किंवा दुखणं जाणवायला लागलं की समज येते.
अनेक प्रकारची दुखणी आहेत. पण सण म्हटलं की गणपती, नवरात्र, दिवाळी हेच पहिल्यांदा डोळ्यासमोर येतात, तसंच दुखणं म्हटलं की पहिल्यांदा आठवते ती डोकेदुखी किंवा पोटदुखी.
दुखण्यांची मेरिट लिस्ट केली तर डोकेदुखी आणि पोटदुखी कायम लिस्ट मध्ये वरच्या नंबरवर येतील.
हि दोन्ही दुखणी शारीरिक असतात तशीच ती मानसिक सुद्धा असतात.
नवरा बायको या नात्यात हे कधीकधी जुळ्याच दुखणं असतं. म्हणजे बायकोने काही (मनाला न पटणारं) केलं तर ती नवऱ्याची डोकेदुखी असते. तर नवऱ्याने काही (मनाविरुद्ध) केलं तर ती बायकोची पोटदुखी. कोणाही एकाला एक दुखण आल, तर दुसऱ्याला दुसर आपोआप येत.
अर्थात मनाविरुद्ध काही झाल्यावर होणारी डोकेदुखी आणि पोटदुखी नवरा बायको सोडून बाहेर, आजुबाजुला, समाजात, राजकारणात सुध्दा असते. पण नवरा बायकोची जवळची आणि आपली असते.
सहज म्हणून फिरायला गेल्यावर सुध्दा रस्त्यावरच्या दुकानात मिळणाऱ्या भांड्याच्या घासणी पासून कपाळावरच्या टिकली पर्यंत बायकोचा खरेदीचा उत्साह हि नवऱ्याची डोकेदुखी असते. तर वीकएंडला मित्रांसोबत घालवलेला वेळ बायकोची पोटदुखी.
माॅलमध्ये गेल्यावर दोनच वस्तू घ्यायच्या असल्या तरी पाहिल्या जातात दहा ते बारा. अशा दुकानातल्या वस्तू पाहिल्यावर बायको उत्साहाने विचारते सुध्दा ……. घ्यायच्या का?… त्यावर नवरा तेच शब्द पण वेगळ्या पद्धतीने बायकोलाच विचारतो….. घ्यायच्या?….. का?…. शब्द तेच असतात पण अर्थ……
बायकोच्या अशा विचारण्यात उत्साहाच्या फुग्यात आनंदाची हवा असते. तर नवऱ्याच्या विचारण्याने तिचा फुगा फुटतो….. आणि असा संवाद मग मानसिक डोकेदुखी आणि पोटदुखी यांना आमंत्रण देतो. आणि अशा आमंत्रणाची वाट बघत हि दुखणी डोक्याजवळ, आणि पोटाजवळच घुटमळत असतात.
अशावेळी बाम कामाला येत नाही. आणि हिंग लावायलाही कोणी विचारत नाही…… अशा दुखण्यानंतर वाचला, सांगितला जातो तो फक्त एकमेकांचा इतिहास….
हि दुखणी वैयक्तिक, सामुदायिक आणि राजकीय सुद्धा असतात. या तिन्ही ठिकाणी वेळ, वय यांच बंधन न पाळता मुक्त संचार करण्याचा मक्ता यांच्याकडे आहे.
नको असलेल्या माणसांची जवळीक डोकेदुखी असते. तर आपल्या माणसांनी दुसऱ्यांशी साधलेली जवळीक पोटदुखी असते.
राजकारणात मला मिळत नाही, किंवा मिळणार नाही. या भीतीनेच या दुखण्यांचा उगम, प्रसार, आणि वाढ होते.
राजकारणात वातावरण बदललं की अशी दुखणी येतात. तर घरामध्ये अशा दुखण्यांची जाणीव झाली की वातावरण बदलायचे संकेत मिळतात. हि दुखणी सहसा संपत नाही. ती एकाकडून दुसऱ्याकडे जातात.
अशा कौटुंबिक पण शारीरिक दुखण्यावर बाम किंवा चुर्ण काम करतं. तर मानसिक दुखण्यावर बाहेर खाणे, पिणे, फिरणे, आणि मजा करणे हेच औषध आहे.
राजकारणात मात्र यावर फोडा आणि जोडा याच औषधाचा वापर होतो. आणि या औषधासाठी साम, दाम, दंड, भेद याचा आधार घेतला जातो.
राजकारणातील हि दुखणी काही वेळा बोलून दाखवली जातात. पण घरातल्या या दुखण्यावर न बोलण्याचा निश्चय होतो….. पण दोन्ही ठिकाणी चेहऱ्यावर दिसतातच.
हि दुखणी घरातली असतील तर, आता वयोमानाचा विचार करा आणि तसा योग्य निर्णय घ्या…. असा सल्ला मिळतो…. तेव्हा जबाबदारी घ्या….. असा सुर असतो.
पण हिचं दुखणी राजकीय असतील तर सल्ला तोच असतो. पण नेतृत्व आता तरुणांना द्या….. आणि जबाबदारी सोडा…. असा सुर असतो.
म्हणजे दुखणं सारखच पण एका ठिकाणी जबाबदारी घ्या. असा सुर. तर दुसरीकडे जबाबदारी द्या. असं सांगायचा प्रयत्न.
बऱ्याचदा घरातल्या या दुखण्यावर औषध घेतल जातं, तर इतर बाबतीत ते दिल जात.
मंगेश पाडगावकर यांची एक कविता आहे……
प्रेम म्हणजे प्रेम असत……
तुमचं आणि आमचं सेम असतं……
तसच दुखण्याच सुद्धा आहे………
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈