सौ.ज्योत्स्ना तानवडे
विविधा
☆ “नेत्रदान श्रेष्ठ दान” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
दृष्टीदान हे मला लाभता फिटे पारणे नेत्रांचे
डोळ्यापुढती उजळून येती रंग सुखाच्या दुनियेचे ||
नेत्रदानामुळे दृष्टी लाभ घडलेल्या एका छोट्या मुलीचा निरागस आनंदी चेहरा आणि बाजूला असंख्य रंगांची सरमिसळ अशा एका चित्राला समर्पक अशा या दोन ओळी मी लिहिल्या आणि मनात विचार आला, खरंच त्या मुलीच्या आयुष्यातील हा केवढा आनंदाचा, भाग्याचा, क्रांतिकारी क्षण आहे ! त्याने तिचे आयुष्य पूर्ण बदलून गेले. तिला दृष्टी लाभली. ती स्वतःच्या डोळ्यांनी हे जग पाहू लागली. कल्पना करा मीट्ट काळोखात चार पावले चालताना सुद्धा भीतीने आपल्याला धडकी भरते. इथे तर अवघ्या आयुष्याचा प्रश्न आहे.
अंधत्व ही आजकालच्या अनेक समस्यांपैकी एक गंभीर समस्या आहे. अंधत्व येण्याची वेगवेगळी कारणे आहेत. डोळ्याच्या बुबुळांच्या आजारामुळे येणारे अंधत्व ( कॉर्निया ब्लाइंडनेस ) हा यातीलच एक प्रकार. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाने यावर इलाज करता येतो. बुबुळ रोपण शस्त्रक्रिया करून या अंधत्वावर मात करता येते. या शस्त्रक्रियेने खराब झालेले बुबुळ ( कॉर्निया )काढून तिथे चांगले बसवितात.
पण यासाठी माणसाच्या शरीरातील नैसर्गिक बुबुळांची गरज असते. कारण अजून पर्यंत कृत्रिम बुबुळ बनविणे शक्य झालेले नाही. मृत व्यक्तीच्या नेत्रदानामुळे अशी निरोगी नैसर्गिक बुबुळे उपलब्ध होतात. यासाठी नेत्रदात्याच्या मृत्यूनंतर चार ते सहा तासापर्यंत त्याचे नेत्रदान करावे लागते. त्यामुळे मृत्यूनंतर लगेचच नेत्रपेढीला कळवावे लागते. नेत्रतज्ञ येईपर्यंत मृत व्यक्तीचे डोळे बंद करून त्यावर थंड पाण्याच्या घड्या ठेवाव्यात. डोक्याखाली उशी ठेवावी. खोलीतील पंखा बंद करावा. ए.सी असेल तर सुरू ठेवावा. डोळे कोरडे पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच मृत्यूचे प्रमाणपत्र तयार ठेवावे.
डॉक्टर मृत व्यक्तीच्या डोळ्यातील फक्त बुबुळाचा (नेत्रपटल) आवश्यक भाग काढून घेतात. त्याजागी कृत्रिम भिंग ठेवून डोळे व्यवस्थित बंद करतात. नेत्रदान केल्याचे लक्षातही येत नाही. चेहरा अजिबात विद्रुप होत नाही. काढून घेतलेली नेत्रपटले पुढील ७२ तासात उपयोगात आणता येतात. बुबुळ रोपणाने ज्यांना दृष्टी येऊ शकते अशा व्यक्तींना त्याचे रोपण केले जाते. हे नेत्रदानीत डोळे कुणाला बसवले ही माहिती गुप्त ठेवली जाते.
एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन जणांना दृष्टी येऊ शकते. कारण एका व्यक्तीस एकच बुबुळ बसवितात. तेव्हा मृत्यूनंतरही अत्यंत अनमोल असणारे डोळे शरीराबरोबर नष्ट न करता त्यांच्या दानाने दोघांची अंधारी आयुष्य प्रकाशमान होतात व जाता जाता एक मोठे पुण्यकर्म घडते. यासाठी कोणीही व्यक्ती कोणत्याही नेत्रपेढीकडे नेत्रदानासाठी आपले संमती पत्र/ इच्छापत्र भरून देऊ शकतात व या तपशिलाची नोंद केलेले कार्ड घरातल्यांच्या माहितीसाठी ठेवता येते. असे संमतीपत्र भरलेले नसले तरी चालते. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांच्या संमतीने सुद्धा नेत्रदान करता येते. कारण हे काम तर नातेवाईकांनी करावयाचे असते.
दरवर्षी साधारणपणे दोन लाखांच्या जवळपास नेत्र पटलांची आवश्यकता असताना केवळ चाळीस हजारांच्या आसपास नेत्र पटले उपलब्ध होतात. ही जी प्रचंड तफावत आहे ती दूर करण्यासाठी समाजाचे फार मोठे प्रबोधन होणे गरजेचे आहे. आपल्याकडे केवळ दीड टक्का लोक नेत्रदान करतात तर शेजारील श्रीलंकेत हे प्रमाण शंभर टक्के आहे. ‘नेत्र ही राष्ट्रीय संपत्ती आहे’ या दृष्टीने बघण्याची मानसिकता त्यांनी स्वीकारली आहे. म्हणूनच स्वतःच्या देशाची गरज भागवून ते आपल्यासह अनेक देशांना काॅर्निया पुरवतात.
नेत्रदानाच्या बाबतीत बरेच गैरसमज आहेत. शिवाय याविषयीचे अज्ञान किंवा अपुऱ्या माहितीमुळेही नेत्रदान केले जात नाही. ज्यांच्या घरातली व्यक्ती गेली असेल त्यांच्या जवळच्या व्यक्तींची मानसिक अवस्था अशी असते की, त्यांना त्यावेळी या इतर गोष्टी सुचणे शक्य नसते. अशावेळी इतर कोणीतरी सांत्वन करून त्यांना नेत्रदानाची आठवण करून देणे आवश्यक असते. यातूनच एक सत्कर्म घडून येते. म्हणून जास्तीत जास्त लोकांनी नेत्रमित्र बनून अशावेळी नेत्रदानासाठी आवाहन करायला हवे.
आम्ही या संदर्भात काम करायला सुरूवात केल्यावर अनेकांनी सांगितले,” नेत्रदान इतके सोपे असते याची कल्पनाच नव्हती. पुरेशी माहिती नव्हती नाहीतर यापूर्वीही घरातल्यांचे नेत्रदान केले असते. इथून पुढे आम्ही तर करूच पण इतरांनाही सुचवू.” यातूनच ही चळवळ व्यापक बनून अंधांची संख्या घटू शकेल. कोणतेही वय, लिंग, रक्तगट, धर्माची तसेच ब्लड प्रेशर, मधुमेह, अस्थमा, मोतीबिंदू, काचबिंदू झालेली व्यक्ती नेत्रदान करू शकते.
‘अ’ जीवनसत्वाचा अभाव, डोळ्याला मार लागणे, जंतुसंसर्ग, ॲसिड किंवा चुना डोळ्यात जाणे अशा कारणांनी बुबुळ पांढरे होते. यालाच ‘फुल पडणे’ असे म्हणतात. यामुळे अंधत्व येते. अशा लोकांना नेत्रदानामुळे दृष्टी परत मिळू शकते. तेव्हा समाजात अशी कोणी अंध व्यक्ती आढळल्यास त्यांना ही माहिती देऊन डॉक्टरांकडे पाठविणेही तितकेच आवश्यक आहे. ज्यांना नेत्रदानामुळे नजर येऊ शकते अशांची नाव नोंदणी केली जाते व नेत्रदान मिळाले की त्यांना बोलावले जाते.
नेत्रदान जागृतीसाठी २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर असा ‘राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा’ पाळला जातो. यावेळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही चळवळ पोहोचावी हे प्रयत्न केले जातात.
यासाठी प्रत्येकाने नेत्रदानाविषयी पूर्ण माहिती घ्यावी, शंका दूर कराव्यात, इतरांना आवाहन करावे. आपण समाजाचा एक घटक असल्याने समाज स्वास्थ्यासाठी शक्य तितके योगदान देऊन प्रत्येकाने आपली सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. यामुळे नेत्रदानाच्या या चळवळीस बळ मिळेल. यातूनच अनेक बांधवांना ‘अंधारातून प्रकाश वाट’ सापडेल.
नेत्रदानाचे संकल्प पूर्णत्वास न्यावे
मरावे परी नेत्ररूपी उरावे
© सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈