श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “त्या वयातले चंद्र(मुखी) अभियान…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
कसं आहे नं, आकाशातला चंद्र हा…. तो चंद्र असतो…….. पण भूतलावर आपल्याला आवडणारा चंद्र मात्र ती…… असते. त्याला चंद्रमूखी असंही म्हणतो……
भारतान आपल चंद्रयान ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरवल आणि इतिहास रचला. आणि यामुळेच याच्याही आधीचा आमच्या त्या वयातल्या अनेक (फसलेल्या) चंद्र(मूखी) अभियानांचा इतिहास आठवला. हा इतिहास माझ्यासह अनेकांचा आणि आपला असू शकतो.
म्हणूनच आमच्या अभियानाचा इतिहास असं म्हटलं. नाहीतर माझा इतिहास म्हटलं असतं.
चंद्रावर यान पाठवण्यासाठी इतर देशांनी जेवढे प्रयत्न केले असतील तितकेच, कदाचित त्यापेक्षा थोडे जास्तच प्रयत्न आम्ही आमच्या चंद्र अभियानासाठी केले असतील.
यात काही जणांच हे अभियान अगदी पहिल्या किंवा कमी प्रयत्नात यशस्वी झाल. काहींच्या अभियानाला (चंद्र) ग्रहण लागल. तर काहींना त्याच चंद्रमूखीच्या मुलांनी मामा…. मामा…. म्हणत त्यांच्या मनापासून केलेल्या अभियानाचा आणि त्यांचा अक्षरशः मामा केला.
भारताने ज्या चंद्रावर यान पाठवल त्याच चंद्रावर इतर देशांनी देखील आपल्या आधी आपल यान पाठवल आहे. काही पाठविण्याच्या तयारीत असतील. पण कोणीही हा चंद्र माझा….. असा हक्क सांगायचा प्रयत्न केला नाही. पण आमच्या या चंद्रमूखी अभियानात मात्र तो चंद्र (मिळाला तर……. ) माझाच राहिल असा हट्ट होता. कारण त्याच चंद्रासाठी इतरांच्या देखील मोहीम सुरू आहेत याची जाणीवच नाहीतर पक्की खात्री होती. आम्ही सोडून दुसऱ्यांच हे अभियान यशस्वी झाल तर मात्र आमचं ते अभियान तिथेच आणि लगेच थांबवाव लागत होत. एक मात्र होत………..
आकाशातला चंद्र एकच असल्याने आणि अजूनतरी कोणाचा त्यावर हक्क नसल्याने, देशांनी आखलेली चंद्र मोहीम सफल झाली नाही तरी दुसरी, तिसरी, किंवा पुढची प्रत्येक मोहीम ही त्याच चंद्रासाठी असते. आमच मात्र तस नव्हत. मोहीम अपयशी झाली तरीही आमचे पुढच्या मोहिमेसाठी अथक प्रयत्न सुरू असायचेच.. फक्त…….. या मोहिमेसाठी आम्ही चंद्रच बदलत होतो. कारण…. कारण दुसऱ्या चंद्राचे पर्याय होते.
सर सलामत तो पगडी पचास….. याच धर्तीवर “एक चंद्र मिळाला नाही तरी, होऊ नको हताश….. ” असा आशादायी कार्यक्रम होता.
कोणत्याही अभियानासाठी गरज असते ती मदतीची, आणि तिथल्या एकूण परिस्थितीच्या अभ्यासाची. मित्रांकडून मिळणारी मदत कमी नव्हती. तसच या बाबतीत आमचाही अभ्यास काही कमी नव्हता. किंबहुना याच अभ्यासाचा ध्यास होता.
या अभ्यासात आमच्या या चंद्राची भ्रमणवेळ, भ्रमणकालावधी, भ्रमण कक्षा यांची काटेकोर माहिती घेतली जात होती. तसेच त्या चंद्राच्या आजुबाजुला असणारी शक्ती स्थळ, परिणाम करणारे घटक (नातेवाईक, भाऊ, वडील), वातावरण यांचा योग्य तो अभ्यास झालेला असायचा. या त्याच्या भ्रमण काळात त्याच्या भ्रमण कक्षेत आमच यान (मित्राची काही वेळासाठी घेतलेली दुचाकी) साॅफ्ट लॅंडींग करु शकेल का? आणि चंद्राच्या जास्तीत जास्त जवळ जाता येइल का? याचाही अंदाज घेतला जात होता. यात बऱ्याचदा एक तर आमच यान वेळेच्या अगोदरच त्या कक्षेत प्रवेश करायच, आणि साॅफ्ट लॅंडींगच्या सुरक्षित जागेच्या शोधातच योग्य वेळ टळून गेलेली असायची. चंद्र आमच्या कक्षेच्या बाहेर गेलेला असायचा.
काही चंद्रांना याची जाणीव झाली असावी. कारण अचानक त्यांची भ्रमणवेळ, भ्रमण कक्षा, भ्रमण काळ बदलायचा. मग त्यांच्या भ्रमण मार्गाचा शोध घेतांना आमच्या यानातल इंधन (पेट्रोल) किंवा ठरलेली वेळ संपण्याच्या भितीने कक्षा सोडून परत फिराव लागायच.
चंद्राचे पर्याय असलेतरी काही चंद्र मात्र केव्हा, कुठे, आणि कितीवेळ दिसेल हे सांगता येत नव्हत. पण तो दिसलाच तर.. त्याची माहिती मात्र एकमेका साहाय्य करू…… या तत्वावर लगेच मिळत होती. किंवा दिली जात होती. अगदी त्या वेळी मोबाईल नसतांना सुध्दा. यात आपापसात स्पर्धा नव्हती.
अशा या चंद्र मोहिमेसाठी काहीवेळा गरज नसताना बाजारात गेलो. न आवडणाऱ्या कार्यक्रमांना सुध्दा हसत मुखाने हजेरी लावली. पण वेळ वाया गेल्याचच लक्षात आल. कारण नेमकं कोणीतरी मधे असायचं आणि चंद्र झाकला जायचा. आणि संपर्क करण्यात अडचण व्हायची. यासाठी गरज नसतांना लायब्ररी किंवा काॅलेजच्या रीडिंग रुम मध्ये मुक्काम ठोकला. आर्टस्, सायन्स, काॅमर्स अशा सगळ्या विभागातून फिरलो…….
आशी मोहीम काही काळ सुरुच होती. (आता ही मोहीम केव्हा थांबवली हे मात्र विचारु नका. पण ती केव्हाच आणि कायमची थांबली आहे हे खरं आहे. ) त्यातलेच काही चंद्र आता मात्र चंद्रकोर न राहता पौर्णिमेच्या चंद्रासारखे गोल गोल झाले आहेत. एखाद छान शिल्प किंवा चित्र ज्या बारकाईने पहाव तस ज्यांना पूर्वी बघत होतो तेच चंद्र आता पुस्तकाची पानं चाळल्यासारख (दिसले तरच) वर वर चाळले जातात. आता ते डोळ्यांना दिसले नाही तरी फरक पडत नाही. काही तर अमावस्येच्या चंद्रासारखे लुप्त झाले आहेत. पण त्यासाठी कोणतही अभियान नाही.
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈