श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “भांडणाच बदलत रुप…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
घरात भांडण असत का? होत का? हा वेगळा प्रश्न आहे. भांडण नकोच. पण सध्याच्या धकाधकीच्या जीवनात भांडण झालं, तर त्याच स्वरूप सुध्दा बदललं आहे. याला कारण असणारा आणि मिळणारा वेळ.
आजकाल क्रिकेटच्या खेळात जसं टी २०, वन डे, किंवा टेस्ट मॅच असते. तसंच भांडणाचही झाल आहे.
क्रिकेट मॅच कशा वेगवेगळ्या कारणांनी असतात, अगदी एखाद्या स्थानिक नेत्याच्या वाढदिवसापासून वर्ल्ड कप पर्यंत. तसंच करावसं वाटलं, तर भांडणाला कोणतही कारण चालतं, पण वेळेचं बंधन मात्र असत. कारण दोघांनाही कामावर वेळेवर जायचं असतं.
देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय असे सामने असतात. तशीच भांडणाची कारणं सुध्दा घरगुती, आणि बाहेरची अशी असू शकतात.
आता कारण काय….. अगदी सकाळी दुध ऊतू गेल्यापासून रात्री बाथरुमचा लाईट तसाच राहिला या पर्यंत, किंवा जागा सोडून ठेवलेली टुथपेस्ट, शेव्हिंग क्रीम, व आंघोळीनंतर हाॅलमध्ये अस्ताव्यस्त पडलेल्या टाॅवेल पासून, रात्री पसरवून ठेवलेला पेपर. किंवा जागा दिसेल तिथे ठेवलेला रिमोट. किंवा वागण्यावरून, आपलं वय किती? मुलं मोठी झाली आहेत. चार लोकांत कसं राहिलं पाहिजे? या सारखं कोणतही, छोटं मोठ कारण पण चालतं. कारण कोणतं, आणि आपल्याला वेळ किती, यावर भांडण करायचं का? आणि कसं करायचं? हे ठरतं.
आणि वेळेनुसार हे भांडण टी २०, वन डे, किंवा टेस्ट मॅच सारखं स्वरूप धारण करतं.
सकाळचं भांडण हे टी २० सारखं असतं. थोडक्यात आटपायच. ती डबा करण्याच्या गडबडीत असेल तर माझ्या दृष्टीने तो पावर प्ले असतो. कारण पावर प्ले मध्ये जसं एका ठराविक कक्षेच्या आतच बरेच खेळाडू लागतात. तसंच या काळात ती स्वयंपाक घराच्या कक्षेतच असते. अगदी मनात आलं तरी ती वेळेअभावी स्वयंपाक घराच्या कक्षेबाहेर येत नाही. या काळात मी थोडी रिस्क घेऊन (तोंडाने) फटकेबाजी करुन घेतो. आणि तिची डब्याची तयारी झाली असेल, आणि मी दाढी करत असेल तर…… तर मात्र तिचा पावर प्ले असतो. कारण मी आरशासमोरच्या कक्षेत असतो. आणि ती मनसोक्त फटके मारण्याचा प्रयत्न करते, अगदी क्रिज सोडून बाहेर येत फटके मारतात, तस ती स्वयंपाक घर सोडून बाहेर येत फटकारते. आणि बऱ्याचदा यशस्वी पण होते.
संध्याकाळच असेल तर मात्र वन डे स्टाईल त्यातही डे नाईट असतं. म्हणजे वेळेनुसार संध्याकाळी सुरू झालेलं हे रात्री झोपण्याच्या वेळी पर्यंत चालतं. यात जेवणाच्या वेळी ब्रेक असतो. मग जेऊन ताजेतवाने होऊन परत आपला मोर्चा सांभाळतात.
पण विकेंड, किंवा त्याला जोडून सुट्टी आली तर मात्र ते टेस्ट मॅच सारखं लांबत जात. यात मग काही वेळा कोणीतरी वरचढ ठरल्यामुळे लिड सुध्दा घेतं, मग आपली पडती बाजू पाहून दुसऱ्याला सावध पवित्रा घेत मॅच निर्णायक होण्याऐवजी बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न होतो.
मॅचमध्ये जसे काही उत्साही प्रेक्षक वाजवण्याची साधनं आणतात आणि वाजवत बसतात. तसे प्रेक्षक प्रत्यक्ष भांडणाच्या वेळी नसले तरी आवाजाची भर मिळेल त्या साधनाने पूर्ण करतो. मग यात सोयीनुसार भांड्यांचा आवाज, कटाची दारं वाजवीपेक्षा जोरात लाऊन येणारा आवाज, पाॅलीशची डबी, किंवा ब्रश हे मुद्दाम पाडून केलेला आवाज, मी लावलेल्या रेडिओ चा आवाज यांनी ती थोडीफार भरून निघते.
मॅचमध्ये थर्ड अंपायर असतो. तो निरीक्षण करून कोणाच्या तरी एकाच्या बाजूने निर्णय देतो. पण या अशा आपल्या भांडणात मात्र असा अंपायर नसावा असं दोघांनाही वाटतं. (किती समजूतदार पणा…..)
अस आहे हे भांडणाच बदलतं रूप……
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈