सौ. रेणुका धनंजय मार्डीकर
🌸 विविधा 🌸
☆ “चला आजोळी जाऊया!…” ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆
☆ चला आजोळी जाऊया! ☆
☆☆
“माझ्या मामाची रंगीत गाडी हो
त्याला खिल्लाऱ्या बैलाची जोडी हो
कशी दौडत दौडत येई हो
मला आजोळी घेऊन जाई हो
नाही बिकट घाट
सारी सपाट वाट
मऊ गालीचे ठायी ठायी हो”
आजोळ!!
किती प्रेम, किती जिव्हाळा आहे ना या शब्दामध्ये. ग. ह. पाटलांची ही कविता ऐकली की परत एकदा फिरून आजोळी जावसं वाटतं. आजोळ म्हणजे प्रत्येकाच्या आईचं माहेर. मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा शाळेला कधी एकदा सुट्टी लागते आणि आपण आजोळी जातो अशी ओढ या बाल मनाला लागलेली असते. ही ओढ अजोळामध्ये मिळणाऱ्या प्रेमामुळे, लाडामुळे, आपुलकीमुळे असते.
माझी मुले छोटी होती तेव्हाची एक गोष्ट आठवते. दोन्ही मुलं रोज शाळेला स्कूल बसने जायची. स्कूल बसमध्ये एक शाळेतलाच माणूस मुलांना सोडायला यायचा. शेवटच्या दिवशी त्याने माझ्या मुलांना विचारले,
“अरे बच्चों, इस बार कहॉं जानेवाले हो छुट्टीयोंमे?”
त्यावर माझ्या छोट्या मुलाने क्षणभरही विचार न करता पटकन उत्तर दिले होते,
“मायके”
सगळेजण त्याच्या उत्तराने हसू लागली आणि त्याला विचारू लागली,
“अरे, किसके मायके जाने वाले हो?”तेव्हा देखील तो धीटपणे म्हणाला.
“मम्मी के मायके जानेवाले हैं।”
तेव्हा तो अगदी छोटा होता. दुसरीच्या वर्गात. पण तेव्हा मुलांना माझ्यापेक्षाही आधी आजोळी जायची ओढ असायची.नातवाला आजोळ विषयी वाटणारी ओढ किती छान काव्यरूप केली आहे बघा ग. ह. पाटलांनी.
“कोण कानोसा घेऊन पाही हो
कोण लगबग धावून येई हो
गहिवरून धरून पोटी हो
माझे आजोबा चुंबन घेती हो
लेक एकुलती
नातू एकुलता
किती कौतुक कौतुक होई हो”
आजोळी इसाई देवीच्या यात्रेला जाताना,महानंदीने छान शाकारलेल्या, त्यावर ताडपत्रीचे छत घातलेल्या बैलगाडीला चंगाळ्या(पितळी घुंगरांच्या गळ्यात घातलेल्या माळा) गळ्यात घालून जेव्हा लाल्या- झुब्या जुंपले जायचे, तेव्हा त्यांच्या दुडक्या चालीने चालताना बैलगाडीमध्ये बसणाऱ्या माणसांना आणि मुलांना जी मजा यायची ती दुसऱ्या कुठल्याही गाडीमध्ये येणार नाही. यात्रेत जाऊन आजोबांच्या मागे लागून लागून प्रत्येक रहाट पाळण्यात बसायचे. आजोबांनी मात्र ‘जावयाचं पोरं’ म्हणून काळजीने आणि ‘लेकीचे लेकरू’ म्हणून दुधावरच्या साईच्या प्रेमाने त्याचे सगळे लाड पुरवायचे.
चिंचेच्या दिवसात अंगणात पन्नास पोते चिंच येऊन पडायची. ती फोडण्यासाठी अंगणभर छत केलं जायचं आणि सगळी गल्लीतील मुलं, मुली, बायका येऊन चिंचा फोडायला बसायचे. नातवांसाठी तर हे औषधचं. आजीच्या मागे लागून हळूच चिंचेचे चोकणे करून घ्यायचे. आईला नकळत गुपचूप ते गट्टम देखील करायचे.
आंब्याच्या दिवसातली मजा तर काही औरचं. आढीतले पिकलेले आंबे टोपलं भरून आजोबांनी काढून आणायचे. नातवांना अंगातले बनियन सुद्धा काढून टोपल्या भोवती बसवायचे आणि मग बाळकृष्ण जसा लोणी खाताना सगळ्या अंगावर लोणी सांडायचा तसे हे दोन नातू आंबे खाताना सगळ्या अंगावर आंब्याचा रस सांडायचे. काय गोड चित्र असायचं ते.
आमच्या आजोळची दिवाळी अजूनही आठवते. दिवाळीत जवळजवळ पन्नास माणसं आजोबांच्या घरात असायची. घरामध्ये सगळ्या आज्ज्या, माम्या, मावश्या, आई सर्वजण मिळून कामं करायची. पाहुणे आलेत म्हटलं की कुठे ऑर्डर द्यायला जायची वेळ यायची नाही. सगळ्याजणी मिळून साग्रसंगीत स्वयंपाक बनवायच्या. गोड पदार्थ करताना तर आजोबा स्वतः होऊन हातभार लावायचे.पन्नास माणसांसाठी फ्रुटसलाड केलेलं मला आठवतं एक मोठा पाण्याचा बंब भरून सर्व फळे, ड्रायफ्रूट्स एकत्र करून, दूध घालून हलवत असलेले आजोबा अजूनही आठवतात. चुलत, मावस, सख्खे असा काहीही भेदभाव तेव्हा नसायचा. सर्वजण एकत्र येऊन अगदी गुण्यागोविंदाने रहायचे. कारण घराची सत्ता ही एका कर्त्या पुरुषाकडेच असायची त्यामुळे घरे एकसंध होती. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहणाऱ्यांना आजोळचा आनंद माहिती असणार.
माझ्या आईच्या आजोळच्या आठवणी ती मला सांगते. तिच्या सगळ्या मावश्यांची मुलं, मामांची मुलं, आणि माझ्या आईची भावंड सगळी उन्हाळ्यात एकत्र आजोळी जायची. ती सर्व मिळून पंधरा वीस जण व्हायची. एवढ्यांना मेजवानी खाऊ घालण्यासाठी माझ्या आईचं आजोळ काही श्रीमंत नव्हतं पण प्रेमळ होतं. तिची आजी रोज सकाळी सकाळी गरम गरम वरण, भाकरी सगळ्या नातवंडांना खाऊ घालायची आणि आई सांगते, “आजीच्या हातची गरम गरम वरण भाकरी त्यासोबत एक लिंबाच्या लोणच्याची फोड आणि त्यानंतर वाचायला मिळणारा गावकरी हा पेपर म्हणजे आमच्यासाठी (आईसाठी) स्वर्गसुख होतं.” आजच्या काळातल्या मुलांना रूचेल का हो ही सुखाची कल्पना?
आम्ही आजोळी गेलो की सर्वांना मदत करू लागायचो. पडतील ती कामे करायचो. आताच्या पिढीच्या सुखाच्या कल्पनाच बदलल्या आहेत. फोरव्हिलर मध्ये सुद्धा आताच्या सुखासीन झालेल्या मुलांना थोडीशी अडचण झाली तर सहन होत नाही. मग ती बैलगाडी मध्ये कशी काय बसणार त्यामुळे आपोआपच बैलगाडी संपुष्टात येऊन तिची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. काळाचा महिमा अजून काय…
मी लहान असताना आमच्या घरी तर उन्हाळ्यात असंख्य नातलग
यायचे. शेतात आमराई त्यामुळे घरात आंबेचं आंबे. माझ्या बाबांचे सख्खे, चुलत, सावत्र, आते, मामे, मावस, सगळी भावंडे यायची आणि भाच्चे,भाच्च्या देखील यायच्या. सर्वजण मिळून रहायची, खायची, धमाल करून जायची. सर्वांसाठी खुलं असलेलं माझ्या आई बाबांचं घर. माझ्या आत्याची मुलं तर माझ्या आई बाबांनी स्वतःच्या मुलांसारखी सांभाळली. प्रेम होते म्हणून आपुलकी होती. आपुलकी होती म्हणून आजोळ होतं आणि आहे.
आज जरी विभक्त कुटुंब पद्धती झाली असेल तरी देखील खूप ठिकाणी अजूनही आजोळचं प्रेम पाहायला मिळतं. माझ्याच घरी माझ्या सासूबाई वारल्या, सासरे आता थकले आहेत. पण सर्व नातवंडांसाठी,भाचऱ्यांसाठी आणि नातलगांसाठी माझं घर स्वागताला नेहमी आतुर असतं. सर्वजण येऊन राहतात भरभरून आनंद घेतात.
“आनंदाचा गोड ठेवा
आजोळच्या आठवणी
चला आजोळला जाऊ
भेटे सुखाची पर्वणी
*
आजी आजोबाची माया
भेटे तिथे गेल्यावर
आशीर्वाद खूप सारे
आणि प्रेम निरंतर”
© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर
औसा.
मोबा. नं. ८८५५९१७९१८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈