सुश्री नीता कुलकर्णी
विविधा
☆ “अखेरची आस…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
आयुष्याची संध्याकाळ झालेली आहे. वय उताराकडे चाललेले आहे. अशावेळी आपलं पुढच आयुष्य कसं जगायचं?…
याचा विचार करता करता आपल्या मृत्यूनंतर चा विचारही मनात यायला लागलेला आहे. मृत्यू अटळ आहे… आजारी पडलो तर.. बोलणेच बंद झाले तर…
मग ठरवलं..
यावर आपल्या मनात जे विचार आहेत ते लिहून ठेवायचे. म्हणजे मुलांना सोपं होईल.
व्हेंटिलेटर वर ठेवायची वेळ आली तर तो किती दिवस ठेवायचा?
कारण व्हेंटिलेटर” काढा “असं कोणी कसं म्हणायचं…. हा मोठा प्रश्न असतो…
एकदम आठवण आली भाचे सुनेच्या वडिलांची. वय वर्ष 85…
दवाखान्यात ठेवल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटर लावायची वेळ आली. ते बोलू शकत होते. त्यांनी दोन दिवसांनी व्हेंटिलेटर काढायला स्वतःच सांगितले. त्यानंतर ते अनेक जणांशी बोलले त्यांना लोक भेटायला आले.
चार दिवसांनी शांतपणे त्यांची जीवन यात्रा संपली.
हे खरं तर अवघड आहे पण करायचं म्हटलं तर शक्य पण आहे.
देहदान… नेत्रदान करायचं मनात आहे अस आपण म्हणतो. पण त्यासाठी आधी तयारी करावी लागते.
नलू ताई म्हणजे माझी नणंद. यांनी देहदानाचा फॉर्म भरला होता. त्यांचा मृत्यू मध्यरात्री झाला. पुढे काय करायचे ?हे आम्हाला कोणालाच माहिती नव्हते. फारच गोंधळ सुरू झाला.
बहिणीचा मुलगा डॉक्टर श्रीपाद पुजारी हा दीनानाथ हॉस्पिटलमध्ये आहे. त्यांनी सर्व मदत केली म्हणून नलू ताईंची अंतिम देहदानआणि नेत्रदानाची इच्छा पूर्ण करता आली.
काही लोक यासाठी काम करत आहेत. त्यांचे फोन नंबर आपण घेऊन ठेवले पाहिजेत.
पुण्यात श्रीयुत खाडीलकर हे यासाठी काम करत आहेत. कोणाला त्यांचा फोन नंबर हवा असेल तर मी जरूर देईन.
माझी मैत्रीण हेमा. तिच्या वडिलांनी तीस वर्षांपूर्वी सांगितले होते की मी गेल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवसापासून तुमच्या उद्योगाला लागा. असेही आदर्श आपल्यासमोर आहेत.
घरात कोणाचा मृत्यू झाला की मन भावुक, हळवे आणि कातर झालेले असते.
त्यात लोक काय म्हणतील ही ही भीती असते. त्यामुळे काही लोक कर्ज काढून दहावा बारावा करतात. मोठ्या जेवणावळी घालतात.
प्रसादाला आलेले लोक टॉवेल, टोपी, शर्टपीस असा आहेर घेऊन येतात.
पाठीवर टॉवेल घालण्यापेक्षा मी तुझ्या पाठीशी आहे. काही लागलं तर मला सांग.. मी मदत करीन अस पाठीवर हात ठेवून म्हटलं आणि तसं वागलं तर ते योग्य ठरेल.
एखाद्या सवाष्ण स्त्रीचे निधन झालं तर लोक पाच जणींना साडी, चोळी सौभाग्य अलंकार देतात. भरमसाठ खर्च करतात. ऐपत नसेल तर कर्ज काढतात. आधीच घरातली स्त्री गेली असेल तर घराची घडी विस्कटलेली असते. त्यात हा अमाप खर्च…
घरातले दुःखी कष्टी असतात. त्यावेळेस एखादी बाई किंवा पुरुष ही सूत्र हातात घेतात. हे केल पाहिजे, ते आणलं पाहिजे… अस म्हणतात. त्यावेळेस त्यांना विरोध करता येत नाही.
हे कितपत योग्य आहे ?
याचाही विचार करा. काहीजणांना मनात नसतानाही हा खर्च करावा लागतो.
शिवाय आपण हे केल नाही तर काय होईल ही भीती असतेच….
मृत्यूनंतर भाषण देण्यापेक्षा ती व्यक्ती जिवंत असताना बोलून घ्या. भेटून घ्या. तिचं कौतुक करा.
काळानुरूप आपण आपले विचार, रूढी, परंपरा यात बदल करायला हवा आहे. आणि तो आपणच करायचा आहे.
अर्थातच हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे ज्याला जे वाटेल ते त्यांनी करावे.
आता शांतपणे लिहायला बसले की असे काही काही विषय सुचतात. खरंतर अशा विषयांवर कोणी स्पष्टपणे बोलत नाही.
पण ठरवलं…
लेखणीतून तुमच्याशी बोलावं.
त्यातून तुम्ही काही सांगता.. सूचना करता…. मलाच नाही तर इतरांनाही त्याची मदत होते. माहिती समजते.
वाचता वाचता आज फार गंभीर झालात का ?
असू दे एखादा दिवस असा…
पण खरंच…
अंध माणसांकडे एकदा बघा..
तुम्ही नेत्रदान केले तर दोन जणांना दृष्टी येणार आहे याचाही विचार करा.
© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈