सौ. रेणुका धनंजय मार्डीकर
🌸 विविधा 🌸
☆ “अक्षय्य तृतीया मुहूर्त खास…” ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆
विशाखा नक्षत्र येई पौर्णिमा
आला पहा वैशाख मास हा
साडेतीन मुहूर्तातील एक
अक्षय्य तृतीया मुहूर्त खास हा
अक्षय्य तृतीया, पितृ, देव व शुभ तिथी, वसंतोत्सव, दोलोत्सव चंदन यात्रा दिन, अखतारी, आखिती व आख्यातरी (गुजरात) अशा अनेक नावाने परिचित असलेला हा सण भारतातील प्रत्येक घरात संपन्न केला जातो.
या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असे म्हणतात. या दिवशी आपण ज्या वस्तूंचे दान करतो त्या अक्षय प्रमाणात म्हणजेच विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात म्हणून अक्षय तृतीयेचे विशेष महत्त्व समजले जाते. वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय्य तृतीया म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या प्राचीन संस्कृती, परंपरांमध्ये साडेतीन मुहूर्त अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहेत. त्यापैकी एक अक्षय्य तृतीया असल्यामुळे यालाही अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की, या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही म्हणून ही तिथी अक्षय मानली गेली आहे. हे सांगताना श्रीकृष्णाने युधिष्ठिराला अक्षय्य तृतीयेचे व्रत सांगितले.
शाकल नावाच्या नगरात ‘सुनिर्मल’ वाण्याने हे व्रत केल्याने दुसऱ्या जन्मात तो ‘कुशावती’ नगरीचा राजा झाला अशी एक कथा आहे. ‘नाभी’ व ‘मरुदेव’ यांचे पुत्र ऋषभदेव हे भगवान विष्णूचे अवतार होते. त्यांची परीक्षा पाहण्यासाठी इंद्राने धरतीवर पाऊस पाडला नाही. तेव्हा ऋषभदेवाने आत्मसामर्थ्याने पाऊस पाडून धरती सुजलाम-सुफलाम केली. तेव्हा प्रभावित होऊन इंद्राने आपली कन्या ‘जयंती’ हिचा ऋषभदेवांबरोबर विवाह लावून दिला. ऋषभदेवांना शंभर मुले झाली. गंगा, यमुनेच्या मधल्या भूमीचा राजा व ऋषभदेवांचा मुलगा ‘ब्रह्मावर्त’ याला त्यांनी जो आध्यात्मिक उपदेश केला तो विश्व प्रसिद्ध आहे. ज्येष्ठ पुत्र ‘भरत’ याच्या स्वाधीन राज्यसत्ता देऊन त्यांनी विदेही अवस्थेत कोंक, कुटक, कर्नाटक या दक्षिणेकडील प्रदेशात बराच प्रवास केला. एकदा ते अक्षय्य तृतीयेच्या दिवशी हस्तिनापूरचा राजा ‘श्रेवांस’ याच्या घरी गेले. तेव्हा राजाने त्यांना ऊसाचा रस पिण्यास दिला त्यामुळे त्यांच्या भोजनशाळेतील अन्नदेवता व हस्तिनापूरचे ऐश्वर्य अक्षय्य टिकले म्हणून आजही हस्तिनापूर उर्फ दिल्ली शहर संपन्न राजधानीचे ठिकाण आहे.
देव आणि पूर्वज यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय्य (अविनाशी) होते. जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो सर्व पापांतून मुक्त होतो, अशी मान्यता आहे. या दिवशी विष्णूंचा सहावा अवतार परशुराम यांची पूजा करून त्यांना अर्घ्य दिले जाते.
अक्षय्य तृतीयेपासून त्रेतायुगाचा प्रारंभ झाला, असे मानले जाते. अक्षय्य तृतीयेपासून चारधाम मानल्या गेलेल्या बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीची द्वारे खुली केली जातात. याच दिवशी नर-नारायण यांचे अवतरण झाले होते अशी मान्यता आहे. त्रेतायुगातच महाभारत घडले होते. याच युगात जगत्कल्याणासाठी भगवान विष्णू श्रीकृष्ण अवतारात प्रगट झाले आणि कालातीत असलेल्या भगवद्गीतेची अमृतवाणी संसाराला प्राप्त झाली. त्याचप्रमाणे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी हयग्रीव आणि बसवेश्वर यांचा जन्म झाला होता.
विविध राज्यांमध्ये अक्षय्य तृतीया वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. या दिवशी ओरिसा व बंगाल प्रांतात परस्परांना चंदनाचे तेल लावून तीन आठवडे चालणाऱ्या ‘चंदनयात्रा’ या उत्सवाची सांगता करतात. जगन्नाथ पुरीला मदनमोहनाच्या मूर्तीला चंदनाचे तेल लावून शोभायात्रेने नरेंद्र तलावात नौकाविहार करतात. गुजरातमध्ये द्वितीयेला गावाबाहेर धान्य, कापूस व साखर या वस्तुंचे एक नगर तयार करतात. त्यामध्ये एक तांब्याचे नाणे ठेवून त्याला ‘राजा’ व त्याच्याजवळ एक सुपारी ठेवून तिला ‘दिवाण’ असे म्हणतात. गावातील सर्व लोक हे नगर पाहण्यासाठी जातात. या नगरीतील जे धान्य मुंग्यांनी वाहून नेले असेल ते धान्य महागणार किंवा त्याचे पीक चांगले येणार नाही असे भाकीत केले जाते व ज्या दिशेला मुंग्या कापूस घेऊन जातात त्या दिशेला कापसाची निर्यात करतात.
राजस्थानातील शहरी आणि ग्रामीण भागात या दिवशी विवाह करण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रातील खान्देश मध्ये अक्षय तृतीयेच्या सणाला ‘आखाजी’ म्हणून ओळखले जाते. खान्देशात आखाजीचा हा सण दीपावली इतकाच महत्त्वाचा गणला जातो.
अक्षय्य तृतीया सागर भरती
नौकाविहारा कोणी न जाती
उसळो ना सागर, रहावी शांती
सागरोत्सव अक्षय्य संपन्न करती
अक्षय्यतृतीया ते श्रावण पौर्णिमेपर्यंत समुद्र खवळलेला असतो म्हणून या महिन्यात समुद्रपर्यटनाला कोणीही जाऊ नये. या काळात सागराने त्रास देऊ नये म्हणून अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गुजरातमध्ये सागराची पूजा करण्यासाठी ‘सागरोत्सव’ संपन्न केला जातो.
कोकणात कुमारीकांना घरी आमंत्रित करून त्यांच्या अंगाला चंदनाचे उटणे लावून शिरा असलेला शंख फिरवितात व पाद्यपूजा करून कैरीचे किंवा दाह कमी करून पचनशक्ती वाढविणारे कोकमचे सरबत पिण्यास देऊन गुलकंद व मोरावळा खाण्यास देतात. या दिवशी शेतीच्या कामाला प्रारंभ केला जातो.
साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी व्यवसायास प्रारंभ करतात. आपल्या पूर्वजांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला पूर्वजांच्या स्मरणार्थ पूजा करून, त्यांना प्रथम आमरसाचे जेवण देऊन मगच आंब्याचा रस सेवन केला जातो अशी प्रथा, परंपरा आहे.
अक्षय तृतीया दिन भाग्याचा
अक्षय घट तो भरू पाण्याचा
पलाशपत्रे रास गव्हाची
आंबे ठेवून पूजा त्यांची
कुंभार वाड्यातून मातीचा कलश आणून पळसाच्या पत्रावळीवर गव्हाची रास घालून त्यावर कलश ठेवून त्यात पाणी भरावे व आपल्या पूर्वजांसाठी तीळ तर्पणविधी करून ते कलश आमंत्रित केलेल्या व्यक्तिला दक्षिणेसहित दान देऊन आंब्याच्या रसाचे जेवण घालावे.आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ देह, नेत्र, रक्त, वस्त्र, धन, जमीन, विद्या, पायातील जोडा, छत्री, जलकुंभ, पंखा, विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य दान करावे. अक्षय तृतीयेला सत्य, कृत व त्रेता या युगांचा प्रारंभ झाला असून नर-नारायण, हयग्रीव व परशुराम यांचे जयंती उत्सव संपन्न करून, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाने चैत्रगौरी उत्सवाच्या सांगतेबरोबर अक्षय्य तृतीया हा सण संपन्न करतात.
वैशाख महिना हा अत्यंत उष्ण असतो. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या निमित्याने मातीचे माठ किंवा रांजण दान करावे. मातीच्या माठातील पाणी आरोग्यासाठी उत्तम असते, तसेच फळांचा राजा आंबा प्रामुख्याने अक्षय तृतीयेपासून खाण्यास सुरुवात होते. अक्षय्य तृतीयेला केलेले नामस्मरण किंवा मंत्र पठण अखंड टिकून राहते अशा मान्यता आहेत. याशिवाय अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा देवी प्रकट झाली होती, असेही सांगितले जाते.
कृतज्ञता पितरांच्या प्रती
आशीर्वच भरभरून देती
कृपाच त्यांची मिळण्या यशप्राप्ती
अक्षय अखंड अक्षय्य तृतीया ती
*
पूर्वज सांगून गेले आम्हा
परंपरा साऱ्या येतील कामा
पाऊलखुणांवर आम्ही चालतो
अक्षय्यदिनी या पूर्वजास स्मरतो
☆
© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर
औसा.
मोबा. नं. ८८५५९१७९१८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈