सौ. अर्चना सुरेश देशपांडे
विविधा
☆ “रफू” ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆
काल दुपारी मी टॅक्सीने माहीमहून सिटीलाईटला चालले होते. शोभा हॉटेलच्या सिग्नलला माझी टॅक्सी थांबली.. तेव्हा माझे लक्ष साडीच्या दुकानाच्या बाहेर बसलेल्या रफफू वाल्याकडे गेले. तो बऱ्याच कलरचे कापडाचे कापलेले छोटे छोटे तुकडे एकत्र बांधलेल्या गठ्ठ्यातून उलट सुलट करून शोधत होता. तो बहुदा रफू करायला मॅचिंग कापड शोधत असावा. आत्तापर्यंत मी रस्त्यावर रफू करताना पाहिले होते पण का कोणास ठाऊक आज माझ्या डोक्यात एक विचार येऊन गेला की खरंच एखादी साडी ड्रेस पॅन्ट किंवा कोणत्याही चांगल्या कपड्याला हा रफूवाला किती सफाईने पडलेले छिद्र अशाप्रकारे दुरुस्त करतो की आपल्याला कळत पण नाही की अगोदर इथे फाटले होते आणि आपण ते वस्त्र वापरू शकतो.
एखाद्या नवीन कपड्याला छोटेसे भोक पडले तर आपला जीव चुटपुटतो, आपल्याला ते वस्त्र वापरतायेणार नाही याचे वाईट वाटते.. रफू वाल्याच्या हातातल्या कलेने आपण ते वस्त्र वापरू शकतो मग मनात विचार आला की कधीकधी आपल्या एवढ्या मौल्यवान आयुष्यात एखादे नाते खराब झाले तर आपण दुखावतो ,कधी कधी ते नाते संपुष्टात येते. एखादा बॅड पॅच आला तर निराश होतो. मग अशावेळी आपण रफूवाला का होत नाही? तेवढाच पॅच रफू करून परत नव्याने जीवनाकडे पहात तो पॅच विसरून जात नाही . अशावेळी रफूवालयाचे तंत्र आपणआत्मसात केले पाहिजे, अशावेळी कोणती सुई कोणत्या रंगाचे धागे मिक्स करून वापरायचे व पॅच भरून काढायचा व नव्याने सुरुवात करायची हे पाहायला हवे. थोडासा पॅच दिसेल पण परत नव्याने ते वस्त्र वापरू शकतो यासाठी फक्त हवे असते छोट्या छोट्या रंगीत आठवणींचे गाठोडे आणि प्रेमाची सुई. कोणास ठाऊक कोणत्या वेळी कोणते चांगले क्षण दुखावलेले नाते रफू करायला उपयोगी पडेल व आपण आनंदी होऊ.
चला तर मग या नवीन वर्षात छोट्या छोट्या जुन्या चांगल्या आठवणी मनाच्या कप्प्यात जपून ठेवूया आणि वेळ पडेल तेव्हा रफू वाला होऊया.
लेखक – अज्ञात.
प्रस्तुती – सौ. अर्चना सुरेश देशपांडे
पुणे
मो. ९९६०२१९८३६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈