श्री संभाजी बबन गायके
विविधा
☆ निर्भयाचे नाव काय ? ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
उत्सुकता सर्वच जीवांचे वैशिष्ट्य आहे. नाक नावाचा अवयव हा श्वास घेण्यास दिला गेला असला तरी खुपसण्यास जास्त वापरला जातो. आपले झाकून ठेवताना दुसऱ्याचे वाकून पाहण्यासाठी डोळे आहेतच. तोंड तर free to air वृत्तवाहिनी! बघ्यांचे डोळे म्हणजे सीसीटिव्ही… खरं तर शी!शी! टीव्ही!
जंगलात झाडांच्या फांद्या उभ्या कापण्याचे काम करीत असलेल्या कारागिरांचे काम एक माकड पहात होते… आणि ते लोक नेमकं काय करत आहेत? याची त्याला उत्सुकता होतीच. पण एवढ्यावरच त्याने थांबले पाहिजे होते. करवतीने फांदीच्या मध्ये काप घेत असताना जर कापणे मध्येच थांबवले तर करवत लाकडाच्या दाबाखाली येऊन अडकून बसते आणि मग ती निरुपयोगी ठरते. म्हणून ती काढून घेण्याआधी कापलेल्या भागाच्या आत लाकडाचा एक उभट तुकडा ठेवला जातो.. त्याला पाचर म्हणतात! कारागीर जेवण करण्यास निघून जाताना त्यांनी ही पाचर नीट मारली होती… पण ती काढली तर काय होईल? हा प्रश्न माकडाला सतावत होता. त्याने ती पाचर काढण्याचा प्रयत्न केला.. ती निघालीही… पण त्याची शेपटी कापलेल्या झाडाच्या मध्ये अडकली… आणि मग कारागिरांनी माकडास बेदम झोडपून काढले! ही गोष्ट तशी लोकांच्या माहितीची आहे!
गोष्ट राहू द्या… कारण ते तर माकड होते! पण माणसांना कायदा ठावूक नसावा हे फार झाले!
एकतर हल्ली फेसबुक हे बातमीपत्र बनले आहे. स्वयंघोषित बातमीदार बऱ्याच लोकांना आधीच माहीत झालेल्या सबसे तेज बातम्या सांगण्या, दाखवण्यात धन्यता मानतात!
कोलकाता येथील महिला डॉक्टरवर आलेला प्रसंग शत्रूवर ही येऊ नये. मुळात बलात्कार हा खुनापेक्षाही गंभीर गुन्हा आहे. यात पीडित व्यक्ती सर्वाधिक त्रास सहन करते. त्यामागे आपली सामाजिक मानसिकता मोठी भूमिका बजावते. गुन्हेगार उजळ तोंडाने आणि पीडित तोंड झाकून फिरतात.. असे दृश्य आहे. उपचार म्हणून पोलिस गुन्हेगारांची थोबाडं पिशव्यांनी झाकण्याचा प्रयत्न करतात हे ही खरे. पण ते चेहरे लोकांनी आधीच पाहून ठेवलेले आणि कॅमेऱ्यात कैद करून ठेवलेले असतात. पण हे चेहरे झाकण्यामागे न्यायालयीन प्रक्रियेतला एक महत्वाचा उद्देश दडलेला असतो.
बलात्कार, लैंगिक अत्याचार सारख्या खटल्यातील सुनावण्या in camera अर्थात अतिशय मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत घेतल्या जातात. पण हल्ली लोकांना सर्वच on camera पाहिजे असते! अपघात, हल्ले, आत्महत्या यांत dead झालेल्या लोकांची live चलतचित्रे जास्त पसंत केली जातात. यात खूप पैसे मिळत असल्याने हे प्रदर्शन विशेष लक्ष देऊन केले जाते!
एका तथाकथित शैक्षणिक चित्रपटात बलात्कार शब्दाच्या मदतीने विनोद निर्मितीचा चमत्कार खूप गाजला. पण तो चित्रपट गाजत असताना आणि आजवरही त्यातील बलात्कार – चमत्कार शब्दाच्या वापराबाबत, त्याच्या दुष्परिणामांबाबत कसे कुणाला काही वाटले नाही, याचे आश्चर्य वाटते! लहान मुले या दृश्याचा आनंद घेत असताना पाहणं ही खूप दुःखाची बाब म्हणावी लागेल!
खूप काम पडल्यावर एका सुमार अभिनेत्याने मला माझ्यावर सामूहिक बलात्कार झाल्यासारखे वाटते! अशी प्रतिक्रिया देणे सुद्धा अनेकांच्या कानांतून सुटून गेले! अनेक चित्रपटात बलात्काराच्या प्रसंगात उत्तम अभिनय करणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्याने सुद्धा ” मी आताच दोन बलात्कार करून आलो.. असे वाक्य फेकून मित्रमंडळींना हसवले होते, असे ऐकिवात आहे. यातून बलात्कार शब्दास एक सहजपणा प्राप्त होत जातो, हे समाजाच्या मानसास कधी समजेल? …. हाच समाज The Rape of the lock नावाच्या इंग्रजी नाटकाच्या मुखपृष्ठावरील rape हा शब्द वाचून तुमच्याकडे तुम्ही अश्लील वाचता आहात, अशा नजरेने पाहू शकतो! असो.
बलात्कार पीडितेचे नाव, छायाचित्र इत्यादी माहिती प्रसिद्ध करू नये, असा न्यायालयाचा आदेश असताना काही अज्ञानी लोक नेमके असेच का करत सुटलेत? हा कायदेभंग केल्यास तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे, याचे अज्ञान हा बचाव ठरणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यापेक्षाही सदर पीडित आपलीच कुणी सख्खी असती तर आपण अशी प्रसिद्धी दिली असती का? हाही विचार व्हावा! उलट कायद्याच्या तरतुदींना अधीन राहून गुन्हेगारांच्या कृत्यांना, अर्थात त्यांची भलावण होणार नाही अशा पद्धतीने प्रसिद्धी देण्याचं जमते का ते पाहावे! यात मग.. त्याचा गुन्हा कुठे सिद्ध झालाय अजून? असे cross जाण्याची गरज नाही!
जिचा काहीच गुन्हा नाही तिला जिवंतपणी आणि मरणानंतर शिक्षा का देता?
आणि माननीय न्यायालयाने याबाबतीत वेळोवेळी तसा आदेश दिलेला असतानाही लोकांनी असेच वागावे, याला काही अर्थ?
काही वर्षांपूर्वी एक मोठी अभिनेत्री इमारतीवरून पडून गतप्राण झाली होती.. त्यात तिचे शरीर अनावृत होते… ते ‘ पाहण्या ‘ साठी मुंबईमध्ये हजारो लोक जमले होते!
काय झाकून ठेवायचे आणि काय वाकून बघायचे यातील विवेक कुणी कुणाला शिकवावा? हाच प्रश्न आहे!
बाकी एक महिला जिवानिशी गेली… तिच्या प्रकरणात कोलकात्यात जो हैदोस सुरू आहे.. ते पाहून डोळे, कान आणि मनाचे दरवाजे बंद करून बसावे, असे वाटते!
… ती मेली आणि तिला मारणारे अजून काही वर्षे जगणार आहेत, व्यवस्था त्यांना जगवणार आहे हे चित्र भयावह आहे.. की हेच आपले प्राक्तन आहे, न कळे!
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈