सौ. अलका ओमप्रकाश माळी
विविधा
☆ – कुठे चाललोय आपण? – ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆
कुठे चाललोय आपण? काय साध्य करायचंय? विनाशाची सुरुवात तर नसेल ना ही? कलियुग कलियुग म्हणतात ते हेच का? गेल्या आठवड्या भरापासून ज्या बातम्या येतायत त्या वाचून ऐकून मन सुन्न होऊन गेलंय.. रात्रीची झोप उडालीय… घरात लाडो ला वावरताना बघून अजून काळजी वाढतीय… प्रेगन्सी मध्ये अगदी नवस केल्यासारखं मुलगी मागितली होती आज मात्र भीती वाटतीय.. ज्या समाजात स्त्रियांना देवी समजून पूजा केली जाते तिथेच स्त्रियांची होणारी अमानुष, पाशवी, वासनांध विकृतीने किळसवाणी हत्या पाहुन अंगावर शहारा येतोय.. गेल्या आठवड्यात कोलकत्यात घडलेली घटना अजून जिवंत असताना कालच्या बदलापूर येथील घटनेने बधीर व्हायला झालंय… एका मुलीची आई होण किती कठीण आहे ह्याची जाणीव व्हायला लागलीय.. काल बदलापूर घटनेने आतून हादरून गेलीय.. साडेतीन वर्षांची ती बाळी, ती लाडो न पाहता सुद्धा डोळ्यासमोर येतेय.. एक ओळखीचा चेहरा घेऊन…कोणती विकृती आहे ही? वासनांध विकृती पाहून मनाचा थरकाप होतोय… प्रत्येक वेळी मुलींना संस्काराचे धडे देणारा समाज मुलगा वंशाचा दिवा काजळत चालला आहे ह्याकडे लक्ष देत नाहीय का? मुलीनी अमुक कपडे घातले, उत्तान, सेक्सी वाटणारे कपडे घातले, लली लिपस्टिक लावली मग अस होणारच ना ही असली मल्लिनाथी करणारी मंडळी आता कुठल्या बिळात जाऊन बसलीयेत.. शाळेत जाणारी ती चिमुकली युनिफॉर्म मध्ये होती ओ… ना प्रक्षोभक कपडे होते ना सेक्सि हिंट देत होती.. तरीही तिच्यावर अत्याचार झाले एक कळी फुलण्या आधीच कुस्करली गेली पुन्हा एकदा राक्षसी वासनांध मनोवृत्तीची शिकार झाली.. आता ह्यात दोष कोणाचा? दोष फक्त इतकाच तिच्या स्त्री असण्याचा.. तीस बत्तीस तासाची ड्युटी करून थकलेल्या डॉक्टर मुलीवर तिच्याच सोबत काम करणाऱ्या नराधमाने अमानुष बलात्कार केला ज्यातक तिच्या शरीरावर ११४ चावे होते, तिच्या डोळ्यात काचा खुपसल्या गेल्या आणि अजून जे किळसावाणे प्रकार झाले ते तर लिहण्याची ही हिम्मत होत नाहीय माझी.. आणि हे सगळं होत असताना ह्यात स्त्रियांचा ही समावेश होता हे वाचून तर तळ पायाची आग मस्तकात गेलीय…
कानावर येणाऱ्या हया अशा अनेक घटना पाहून आणि आपल्या ही घरी एक लाडो वाढते आहे हे पाहून मन सुन्न होतंय.. मुलींना फक्त गुड टच बॅड टच समजावून तिच्यावर संस्काराचे ओझे लादून हा प्रश्न सुटेल अस मुळीच वाटतं नाहीय.. साडेतीन वर्षाचे ते लेकरू काय प्रतिकार करणार ओ.. वासनांध झालेल्या राक्षसापुढे तिचा काय निभाव लागणार ओ.. नुसत्या कल्पनेने ही अंगावर शहारा येतोय.. आता काही दिवस हया सगळ्याची खूप चर्चा होईल, मोर्चे निघतील, निषेध होतील, कँडल मार्च निघेल आणि पुन्हा काही दिवसांनी अशाच बातम्या कानावर येतच राहतील.. जोपर्यंत स्त्री आहे तोपर्यंत हे असंच होत राहणार… कोर्टात केसेस वाढत राहणार एकेक अपराधी जेल मध्ये मजेत तीनवेळा मिळणारं फुकटच अन्न खात मजेत जगणारं आणि इकडे जिच्यावर अत्याचार झाला ती झोपेत ही दचकून उठणार तिच्या मनावर आयुष्यभरासाठी असंख्य ओरखडे उठणारं.. आपली न्याय व्यवस्था अशीच हतबल होत राहणार.. आणि तुम्ही आम्ही हे उघड्या डोळ्यांनी पाहत राहणार..
ही सगळी परिस्थिती पाहून मन खचून जातंय.. स्त्रिया कुठेच सुरक्षित नाहीत हे सतत त्रासदायक होतेय.. घरट्यात असूदे, शाळेत असुदे, ट्रेन, बस, रस्ता, ऑफिस कुठे ही जा ही वखवखलेली नजर स्त्रियांचा पाठलाग करतच राहणार.. हया परिस्थितीवर आपण फक्त आणि फक्त उद्विग्न होऊन निषेध करत राहणार का? आपल्या लाडोला कसे वाढवणार आपण.. तीन चार वर्षाच्या मुलीना पेपर स्प्रे आणि कराटे क्लासेस वाचवू शकतात का? ही सगळी परिस्थिती पाहून अस्वथपणा वाढत जातोय मन सुन्न होतेय हे कसे बदलणार की आपण फक्त मुलीनी घातलेल्या कपड्यावर चर्चा करत राहणार.. छे हया अनेक प्रश्नांची उत्तर माझ्याकडे तर नाहीत तुम्हाला सुचत असतील तर सांगा मला ही कारण मी ही एक स्त्री आहे आणि एका लाडोची आई ही… 😭
© सौ. अलका ओमप्रकाश माळी
मोब. 8149121976
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈